अशी मॅच जिथं ओपनिंगला कपिल आणि ग्राऊंड सुकवायला हेलिकॉप्टर आलं होतं

१९९२ चा क्रिकेट वर्ल्डकप म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी लय भारी मेमरी. रंगीत कपड्यातला सगळ्यात पहिला वर्ल्डकप. इंग्लिश शाळांमध्ये हाऊसेसचे असतात तसले कपडे.. सगळ्यांची स्टाईल एकच, फक्त रंग वेगळा. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या या वर्ल्डकपच्या कित्येक आठवणी आजही ताज्या आहेत. जावेद मियाँदादच्या माकडउड्या, डकवर्थ लुईस नियमामुळं आफ्रिकेचा उठलेला बाजार, फ्लडलाईट्समध्ये झालेल्या मॅचेस असं बरंच काय काय आपल्या डोळ्यांसमोरुन जातं.

त्या दिवसातलं क्रिकेट लई भारी होतं. म्हणजे बघा, आपण नुकतंच श्रीलंकेला ३-० अशा फरकानं हरवलं, पण काय मजबूत आनंद झाला नाही. कारण आत्ताच्या लंकन टीममध्ये तेवढी दहशत नाहीये. पण ९२ ची लंकन टीम लय बेक्कार होती. जयसूर्या, रोशन महानमा, अर्जुना रणतुंगा आणि कॅप्टन अरविंदा डी सिल्व्हा असली बॅटिंग लाईनअप. भारताकडेही सरदारांची फौज होती, सचिनभाऊ तेंडुलकर, कपिलपाजी देव, हाणामारी स्पेशालिस्ट विनोद कांबळी, क्रिष्णमाचारीअण्णा श्रीकांत आणि कॅप्टन अझरुद्दीन, दोन्हीकडच्या प्लेअर्सची नावं वाचूनच सहज अंदाज येईल की या मॅचकडून काय अपेक्षा होती… धावांच्या पावसाची.

अपेक्षा ठेवायच्या नाहीत, अपेक्षा कायम दु:ख देतात, हे भिडूला ब्रेकअपच्या आधी या मॅचमुळं कळलं. भारत विरुद्ध श्रीलंका मॅचची आतुरता पार धुवून निघाली, पण या २८ फेब्रुवारी १९९२ ला झालेल्या या  मॅचमध्ये लय ऐतिहासिक घटना घडल्या, हे ही तितकंच खरं.

तर झालं असं, की ही मॅच आयोजित करण्यात आली ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँडमध्ये असलेल्या मकायमध्ये. तिथल्या रे मिशेल ओव्हल मैदानावर ही मॅच झाली.

आता मकाय हे ऑस्ट्रेलियातल्या साखर कारखानदारांचं आवडतं शहर. पण तिथं हवा फक्त साखरेचीच नाही, तर पावसाची पण आहे. तिकडं पूर-बिर येणं एकदम नॉर्मल. रे मिशेल ओव्हलचं मैदान शहरापासून इतकं लांब होतं की ही मॅच टीव्हीवर पण दाखवण्यात आली नाय आणि आपण इतिहास पाहायला मुकलो.

रे मिशेल ओव्हलवरची पहिलीच इंटरनॅशनल मॅच, दोन्ही टीम्स ग्राउंडवर आल्या आणि टॉसच्या आधीच पावसानं एंट्री मारली. बरं पाऊस पण किरकोळ नाय, फुल्ल धुव्वा. रपारप पाऊस पडत राहिला आणि लय वेळानं त्यानं ब्रेक घेतला. ब्रेक घेईपर्यंत ग्राऊंडचा जितका बाजार नव्हता उठायला पाहिजे तितका उठला होता, मॅच खेळायची म्हणल्यावर ग्राउंड कोरडं पाहिजे. 

आपल्या या ग्राऊंडवरची पहिली इंटरनॅशनल मॅच झालीच पाहिजे, असं म्हणत क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मैदान सुकवायला डायरेक्ट हेलिकॉप्टर आणलं. त्यांच्या वाऱ्यांनी फक्त पिच कोरडं झालं. मॅच बघायला दोन-तीन हजार लोकं आलेली, सचिन, कपिल, रणतुंगा, जयसूर्याची बॅटिंग बघायला आलेली ही लोकं पाऊस आणि हेलिकॉप्टर बघून वैतागलेली.

मॅच सुरू होईना, पण लंच ब्रेक जाहीर झाला. आपल्या कार्यकर्त्यांचं जेवण बहुतेक आधीच झालेलं असावं, कारण इंडियन टीमचे कार्यकर्ते मैदानावर व्यायाम करायला आले. अझरुद्दीनचं मनगट हलताना पाहायच्या ऐवजी लोकं सगळा अझरुद्दीन हलताना पाहत होते. मॅच घ्यायची म्हणजे घ्यायची असं ठरलं होतंच, त्यामुळं निर्णय झाला की टी२० मॅच होणार. म्हणजे वनडे मॅचपेक्षा जास्त हाणामारी होणार हे नक्की होतं.

टॉस जिंकलेल्या श्रीलंकेनं भारताला पहिली बॅटिंग दिली. अझरुद्दीन हा गडी प्रचंड हुशार होता, मोठा स्कोअर उभा करायचा म्हणून भावानं कृष्णमाचारी श्रीकांत सोबत ओपनिंगला आणखी एक स्फोटक फलंदाज पाठवला, कपिल देव. टीमचा संकटमोचक आणि फिनिशर कपिल ओपनिंगला येण्याची ती पहिलीच वेळ होती. फॉर्मातला धोनी ओपनिंगला आला, तर जसं वाटेल अगदी तसंच त्या दिवशी वाटत असणार.

पहिली ओव्हर टाकायला आला, चम्पका रामानायके. स्ट्राईकवर होता श्रीकांत, त्यानं पहिला बॉल डिफेन्ड केला आणि दुसऱ्या बॉलवर सिंगल काढली. कपिल क्रीझवर आणि पाऊस मैदानात एकत्रच आले. कपिल पळत पळत पॅव्हेलियनमध्ये गेला, पण पावसानं काय सुट्टी दिली नाही. इंडिया १-०, ओव्हर्स ०.२, कपिल ०*, श्रीकांत १*, रामानायके ०.२ एवढ्याच आकड्यांवर स्कोअरकार्ड संपलं. कपिलची ओपनर म्हणून, पहिली-वहिली टी२० मॅच म्हणून आणि रे मिशेल ओव्हलवरची पहिली इंटरनॅशल म्हणून लोकांच्या ज्या काय अपेक्षा होत्या, सगळ्यांनी दु:ख दिलं. पाऊस थांबलाच नाही आणि अखेर मॅच रद्द झाली.

रे मिशेल ओव्हलवर त्यानंतर एकही इंटरनॅशनल मॅच झाली नाही. फक्त दोन बॉल्स पडलेली ही मॅच आजही जगातली सगळ्यात छोटी वनडे मॅच म्हणून ओळखली जाते. त्यानंतर कपिल दोनदा ओपनिंगला आला, पण या मॅचसारखी आतुरता नव्हती. त्या मॅचनंतर ग्राऊंडवर हेलिकॉप्टर आलं तेव्हाही मॅच श्रीलंकेचीच होती. पण हेलिकॉप्टर आलेलं दहशतवादी हल्ल्यात अडकलेल्या श्रीलंकेच्या प्लेअर्सला वाचवायला. हे घडलं पाकिस्तानात, पण विषय कसा असतोय बघा… त्याच पाकिस्तानात पुन्हा एकदा मैदानात हेलिकॉप्टर आलं, ते पावसानं भिजलेलं पिच सुकवायला.

आता पुन्हा पाऊस पडला काय किंवा ग्राऊंडमध्ये हेलिकॉप्टर आलं काय, लय वाईट वाटणार नाही. पण या पावसामुळं कपिलला टी२० क्रिकेट खेळताना पाहणं राहिलं, ते राहिलंच…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.