श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला पण त्यांच्या कुटूंबातले 9 जण मंत्री आहेत..

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी अखेर राजीनामा दिला. गेल्या महिन्या दोन महिन्यांपासून आपणाला श्रीलंका आर्थिक डबघाईला आल्याच्या बातम्या वाचायला मिळत असतीलच.

त्याचाच परिणाम म्हणजे आज श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला.

आत्ता यातली गंमत म्हणजे त्यांनी आपला राजीनामा दिला तो राष्ट्राध्यक्ष गोटाबाया यांच्याकडे . आत्ता गोटाबाया आणि महिंदा राजपक्षे हे एकमेकांचे भाऊ आहेत आणि श्रीलंकेची सगळी सत्ता  चार भावांच्या हातातच एकवटली आहे

२०१९ मध्ये राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर गोटाबया राजपक्षे  यांनी पाहिलं आपला भाऊ महिंदा राजपक्षे याला पंतप्रधान केलं. मग या दोघांनी आपल्या उरलेल्या दोन भावंडांना पण मंत्रिमंडळात घेतलं. चमल राजपक्षे यांना पाटबंधारे मंत्रीपद तर बसिल रोहाना राजपक्षे यांनी अर्थमंत्री पद देण्यात आलं.

बरं हे एव्हढ्यावरचं थांबलेत असं नाहीये तर त्यांनी आपल्या पुढच्या पिढीचीही सोय लावायला सुरवात केली.

 

मंत्रिमंडळातील सर्वात तरुण राजपक्षे हे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे ३५ वर्षीय पुत्र नमल राजपक्षे. ते श्रीलंकेचे युवा आणि क्रीडा मंत्री आहेत. तर पाटबंधारे मंत्री चमल राजपक्षे यांचा शशीद्र राजपक्षे यालाही एक भलंमोठं राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. तो

“सेंद्रिय खत उत्पादन, पुरवठा आणि नियमन आणि धान आणि धान्य, सेंद्रिय अन्न, भाजीपाला, फळे, मिरची, कांदा आणि बटाटा लागवड प्रोत्साहन, बियाणे उत्पादन आणि कृषीसाठी प्रगत तंत्रज्ञान राज्यमंत्री” आहे. बरं हे भाऊ आपल्या बहिणीला पण विसरले नाहीयेत. राजपक्षे बहीण गांदीनी यांचा मुलगा निपुणा राणावाका हे खासदार आहेत.

राजपक्षे कुटुंबात एकूण नऊ मंत्रीपदे आहेत ज्यात श्रीलंका सरकारमध्ये सात कॅबिनेट पदांचा समावेश आहे.

काही अंदाजानुसार, श्रीलंकेच्या एकूण बजेटपैकी सुमारे ७५ टक्के थेट राजपक्षे सरकारमधील मंत्र्यांच्या अखत्यारीत आहे.

आत्त्ता सत्तेत एवढे मुरलेले राजपक्षे बंधूची हे पहिलीच पिढी राजकारणात नाहीये. श्रीलंकेच्या दक्षिणेकडील हंबनटोटा जिल्ह्यातील जमीनदार असलेले राजपक्षे अनेक दशकांपासून श्रीलंकेच्या राजकारणात आहेत. महिंदा आणि गोटाबया यांचे वडील, डॉन मॅथ्यू राजपक्षे, १९३६ मध्ये हंबनटोटा येथून श्रीलंकेच्या संसदेत  निवडून आले होते. पुढे मग एक दोन टर्मचा अपवाद सोडल्यास राजपक्षे राजकारणात सक्रिय राहिलेले आहेत.

पण घराण्याला सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर नेलं ते महिंदा राजपक्षे यांनी ज्यांनी २००५-१०१५ असं १० वर्षांसाठी श्रीलंकेचं प्रमुखपद  सांभाळलं. 

महिंदा राजपक्षे २००५ मध्ये सत्तेवर आले, प्रथम पंतप्रधान म्हणून आणि नंतर अध्यक्ष म्हणून. महिंदा अध्यक्ष असताना आणि त्यांचे भाऊ गोटाबाया संरक्षण मंत्री  तर चमल संसदेत सभापती होते तर बासिल सरकारमध्ये मंत्री होते.

२००७ मध्ये लिट्टेचा प्रश्न याच भावांनी कायमचा संपवून टाकला होता. 

त्यावेळी ज्या प्रकारे प्रभाकरन आणि त्याचा कुटुंबाला संपवण्यात आलं किंवा जाफनाच्या आजूबाजूला तामिळ जनतेवर जे अत्याचार करण्यात आले त्यावरून या भावांवर जोरदार टीका झाली होती. त्यांच्यावरील युद्ध गुन्हांची चौकशी करण्याची आजही मागणी करण्यात येते.

आणि आत जे श्रीलंकेतल्या लोकांचे खाण्यापिण्याचे वांदे झालेत त्यालाही हेच भाऊ जबाबदार आहेत असा सूर आता लंकेतल्या जनतेकडून निघू लागलाय.

मागच्या महिन्यात कोलंबोमध्ये निदर्शने झाली ज्यात १०,००० पेक्षा जास्त विरोधी समर्थक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी राष्ट्रअध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर जमले होते.

श्रीलंकेत आज महागाईचा दर १५% टक्यांच्या घरात गेला जो आशियातला सगळ्यात जास्त आहे. आज देशात अन्न धान्याची टंचाई आहे, परकीय चलनाचा खळखळाट आहे, देशातल्या मंत्र्यांना कर्जासाठी शेजारच्या देशांमध्ये वणवण करावी लागतेय या सर्व समस्यांना आज राजपक्षे बंधूच जबाबदार असल्याचं सांगण्यात येतंय.

तर राजपक्षे बंधूंचं देश हाकण्यात आलेलं अपयश जुनं आहे. पण याचे परिणाम दिसू लागले जेव्हा करोनामुळे अर्थव्यवस्था बंद पडली.

सुरवात झाली श्रीलंकेसाठी सगळ्यात महत्वाचं क्षेत्र असलेल्या पर्यटन क्षेत्रामुळे. 

आधी करोना आणि नंतर इस्टर ला झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात भेट देणाऱ्या परकीय नागरिकांची संख्या रोडावली आणि परिणामी हक्काचं परकीय चालन. यामुळे मोठय प्रमाणात बेरोजगारी पण तयार झाली हा मुद्दा वेगळाच.

त्यात भर पडली देशात ऑरगॅनिक शेती कंपलसरी करण्याचा निर्णय.

राजपक्षे काका पुतण्यांनी एका रात्रीत देशात रासायनिक खते आयात करण्यावर बंदी घातली आणि देशात १००% जैविक शेती करण्याचा निर्णय घेतला. आता एवढे मोठे निर्णय घेताना तज्ज्ञांचा, सल्लागारांचा सल्ला  विचारत घेणे क्रमप्राप्त होते. पण हं करें सो कायदा या अविर्भावात राज्यकारणाऱ्या राजपक्षेंनी तो निर्णय घेतला. आज यामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात अन्न धान्याची टंचाई निर्माण झालं आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

पण ही झाली तत्कालीन कारणं..

या सर्व अडचणींची पाळ-मुळ जातात २००७ मध्ये जेव्हा महिंदा राजपक्षे हे देशाचा गाढा हाकत होते.

देशात स्वतंत्र तमिळ राज्याची मागणी करणाऱ्या लिट्टेच्या बंडखोरांशी गृहयुद्ध चालू होतं. अर्थव्यवस्था खिळखिळी होत होती. मात्र राजपक्षेंना तमिळ टायगर्सचा विषय युद्ध करूनच संपवायचा होता. तेव्हा संरक्षण मंत्री असलेलेले गोटाबया सरळ जो आडवा येइल त्याला उडवत सुटले होते. शेवटी विषय संपला मात्र त्याचा खूप मोठा बोजा लंकेच्या एकॉनॉमीवर पडला. पण याबद्दल त्यांना कोणीच विचारणारे नव्हते उलट हे भाऊ मग स्वतःच एकमेकांची पाठ थोपटत बसले.

आणि मग राजपक्षे वळाले चीनकडे आणि ड्रॅगनने कर्जाचा असा काय वेढा टाकला की अजूनही लंकेला सोडवता आलेला नाही.

तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनीच चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्जे मिळवण्यास सुरुवात केली.  ज्यामुळे डिसेंबर २०१८ मध्ये मग तत्कालीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी  हंबनटोटा बंदर चीनच्या ताब्यात द्यावे लागले.

चीनचे कर्ज फेडण्यास असमर्थ, मागच्या श्रीलंकेच्या सरकारने हंबनटोटा बंदर ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर सुमारे $१.१ अब्ज डॉलर्सच्या बदल्यात चीनला देऊन टाकले. त्यात देशाचे सार्वभौमत्व वेशीवर टांगले गेले हा भाग वेगळा.

आणि यात भरास भर म्हणून की काय युक्रेन रशिया युद्धाचा मोठा परिणाम श्रीलंकेवर पडत आहे.

श्रीलंकेत यणारे ३०% पर्यटक हे रशिया, युक्रेन, पोलंड आणि बेलारूसचे होते. त्यात हे देश  श्रीलंकेच्या चहाचे पण मोठे व्यापारी होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लंका पण आपल्यासारखाच खनिज तेल आयात करणार देश आहे. आणि युद्धामुळे वाढणाऱ्या तेलांच्या किमतीमुळे लंकेचे अजूनच वंदे झालेत.

श्रीलंकेला २०२२मध्ये जवळपास $७ बिलिअनची देणी द्यायची आहेत. तर श्रीलंकेकडे फक्त $२ बिलियनचंच परकीय चलन आहे. त्यामुळे लंका कधीही दिवसळखोरीत निघू शकते अशी परिस्तिथी आहे.

याच पार्श्वभूमीवर बेसिल राजपक्षे यांनी आता भारताला भेट दिली होती.  हे संकट टाळण्यास मदत करण्यासाठी त्यांनी $१ अब्ज क्रेडिट लाइन सुरक्षित केली आहे. म्हणजे भारत आता लंकेला एवढ्या पैशांचं कर्ज देईल.

त्याचबरोबर आता लंकेने IMF सोबत पण वाटाघाटी चालू केली आहे.

मात्र एवढं होऊन पण राजपक्षे भाऊ सत्ता सोडायला तयार नव्हते. याउलट त्यांनी मीडिया, विरोधक यानांच दाबण्यास सुरवात केली होती. एका कुटुंबाच्या हाती सत्ता गेल्यानंतर वाताहात कशी होते याचं एक परफेक्ट उदाहरण श्रीलंका बनले आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.