भाजपचा बालेकिल्ला भेदणं काय सोपं काम नव्हतं, पण धंगेकरांनी करून दाखवलं…

रविवार पेठ हा पुण्याचा गजबजलेला दाटवस्तीचा भाग, इथंच सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांची दुकानं आहेत, जुने वाडे आहेत आणि अशाच गर्दीत एक जनसंपर्क कार्यालय आहे. जिथं कार्यकर्त्यांची कायम गर्दी असते, काम घेऊन नागरिक येतात रवीभाऊंना भेटायचंय असं सांगतात, ५ मिनिटात भेट होते आणि काम घेऊन आलेल्या माणसाच्या गाडीवर बसून किंवा त्याला आपल्या गाडीवर बसवून रवीभाऊ काम करायला जातात. मग हे काम ऍडमिशनचं असो, महापालिकेतलं असो किंवा हॉस्पिटलचं, भाऊ काम होईपर्यंत सोबतच.

कसब्यातली लोकं सांगतात, धंगेकरांना रात्री अपरात्री फोन केला तरी उचलला जातो. फोन करणारा माणूस आपल्या प्रभागातला नसला तरी खात्रीने मदत मिळते. या असल्या साध्या साध्या गोष्टींमधून कार्यकर्ते जमत गेले आणि धंगेकरांची ताकद वाढत गेली. याच ताकदीच्या जोरावर काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना या निर्णायक पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आणि धंगेकरांनी हि निवडणूक ११ हजारांच्या मताधिक्याने जिंकून आणली.

गेल्या ३० वर्षांपासून भाजपची सत्ता असलेला, भाजपचा सेफ मतदारसंघ आणि बालेकिल्ला खेचून आणणारे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आजच्या बातम्यांचा मथळा बनलेत.

भाजपमधली अंतर्गत नाराजी, गटतट, बापटांच्या अनुभवासोबतच, संघाची ताकद आणि ब्राह्मण मतदारांचा पाठिंबा या गोष्टी भाजपसाठी मायनसमध्ये गेल्या.

भाजपला जसा गटबाजीच्या राजकारणाचा फटका बसला, तसाच धंगेकरांचा राजकीय अनुभवही…

त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली ती शिवसैनिक म्हणून, त्यानंतर शाखाप्रमुख, ४ वेळा नगरसेवक आणि तिसऱ्यांदा आमदारकीचे उमेदवार अशी त्यांची कारकीर्द.

२००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले, राज ठाकरेंचा मनसे पक्ष नवा होता, समोर गिरीश बापटांसारखा उमेदवार, तरीही धंगेकरांनी ४६ हजार ८२० मतं मिळवली. काँग्रेसच्या रोहित टिळकांना त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर ढकललं. पराभव पत्करावा लागला असला, तरी कसब्यात एका नव्या पक्षाच्या उमेदवारानं ३० टक्के मतं घेणं हे लक्षवेधी ठरलेलं.

२०१४ मध्ये ते पुन्हा एकदा मनसेच्या तिकिटावरच उभे राहिले, सगळ्या राज्यात मोदी लाट होती, त्यात युती-आघाडीचं समीकरण नसल्यानं सगळेच पक्ष मैदानात उतरले. मतांचं विभाजन होणं निश्चितच होतं आणि झालंही तसंच. गिरीश बापटांना सर्वाधिक ४३ टक्के मतं मिळाली, पण उमेदवारांची गर्दी, मोदी लाट यातही धंगेकरांनी २५ हजार ९९८ मतं मिळवली होती. मनसेचा करिष्मा ओसरल्याची चर्चा असतानाही धंगेकर तिसऱ्या क्रमांकावर होते हे विशेष.

२०१७ ची महानगरपालिका निवडणूकही धंगेकरांच्या राजकीय कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा मानली जाते. 

त्याचवेळी धंगेकरांनी मनसेला जय महाराष्ट्र केला, प्रभागरचनेत रविवार पेठ-गणेश पेठ या त्यांच्या वॉर्डाचे तुकडे झाले, मग त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर मंगळवार-सोमवार-रास्ता पेठ या भागातून मैदानात उतरायचं निश्चित केलं, मात्र काँग्रेसचं चिन्ह त्यांना मिळालं नाही आणि छताचा पंखा या चिन्हावर धंगेकरांनी निवडणूक लढवली.

प्रतिस्पर्धी उमेदवार होते स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर. सोमवार पेठ-रास्ता पेठमध्ये बिडकरांचं आणि भाजपचं चांगलं वजन, पण वारं फिरलं आणि धंगेकरांनी मैदान मारलं. त्या निवडणुकीत धंगेकर जायंट किलर ठरले.

पुढे २०१८ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २०१९ मध्ये आमदारकीसाठी तिकीट मागितलं, मात्र पक्षात नवीन आल्यामुळं तिकीट हुकलं, तरीही धंगेकरांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदेंना तब्बल ४८ हजार मतं मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

अगदी सुरुवातीला आपल्या बहिणीला नगरसेवक म्हणून निवडून आणणं असेल, प्रतिस्पर्ध्यांचा बालेकिल्ला भेदत आपल्यासकट चारही नगरसेवकांचं पॅनल निवडून आणणं असेल आणि गिरीश बापटांसारख्या नेत्याला कसब्यात घाम फोडणं असेल, धंगेकरांनी आजपर्यंतच्या कारकिर्दीत या सगळ्या गोष्टी केल्यात. आज आमदारकीची निवडणूक जिंकत त्यांनी आणखी एक माईलस्टोन पार केलाय, एवढं नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.