टॉलिवूडचे रिमेक बॉलिवूडला तारत होते, पण आता सगळं गणितच बदललंय…

बॉलिवूडचं कसंय एकदा एक फॉर्म्युला हिट झाला की, सगळे त्याच्याच मागे पळतात. आता रिमेक काय आज आलेला फॉर्म्युला नाहीये. रिमेक वर्षानुवर्ष फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर साऊथमध्ये पण होतायेत. रजनीकांतचे अनेक सिनेमे हे सरळ सरळ अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांचा रिमेक आहेत.

रजनीकांतचा थ्री होता दीवारचा रिमेक, बिल्ला होता डॉनचा रिमेक आणि ही यादी लई मोठी आहे. चला साऊथ वाल्यांनी बॉलिवूडचे सिनेमे उचलले आणि वापरले असं आपण म्हटलं तरी ते आपटले का ? हे पण पाहिलं पाहिजे. रजनीकांतसाठी बिल्ला सिनेमाने तेच केलं जे अमिताभसाठी डॉनने केलं. डॉन होता एकदम सुपरहिट. तसंच बिल्लाचं सुद्धा झालं. बिल्लामुळे रजनीकांतचं सुपरस्टारडम तयार झालं. रजनीकांतला अभिनय सोडायचा असताना त्याचा कमबॅक झाला तो बिल्लामुळेच. हा सिनेमा २५ आठवडे थिएटरवर चालला होता. 

१९८२ साली अमिताभ बच्चन स्मिता पाटील यांचा नमक हलाल सिनेमा हा १९८७ साली तामिळ भाषेत रिमेक झाला आणि रजनीकांत यांनी एकही पैसा न घेता हा सिनेमा केला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर एकदम हिट झाला. 

पण बॉलिवूडनी जेव्हा साउथ सिनेमे रिमेक करायला घेतले तेव्हा ते चालले का?

एक कबीर सिंग आला आणि तो तुफान चालला. पण साऊथचे सिनेमे बॉलिवूडमध्ये रिमेक करणं कधी सुरु झालं? याची सुरुवात साधारण ६० च्या दशकात झाली असं म्हणता येईल. १९६७ साली आलेला राम और श्याम हा सिनेमा हा एका तेलगू सिनेमाचा रिमेक होता. या दोन्ही सिनेमांचं दिग्दर्शन एकाच दिगदर्शकानं केलं होतं. 

तापी चाणक्य यांनी १९६४ मध्ये रामुदु भीमुदु नावाने सिनेमा केला आणि ३ वर्षांनी त्याचाच हिंदी रिमेक केला. मग बॉलिवूडमध्ये एंट्री झाली कमल हसनची. कमल हसन साऊथमध्ये बरेच प्रसिद्ध होते, पण त्यांना बॉलिवूडमध्ये खरं यश दिलं ते एक दुजे के लिये सिनेमाने. हा सिनेमा होता तमिळमधला मारो चरित्रा. हा सिनेमा के. बालाचंदर यांनी हिंदीत बनवला ज्यांनी ओरिजिनल तामिळ सिनेमा सुद्धा बनवला होता. 

कमल हसन श्रीदेवी यांचा न विसरता येणारा सिनेमा सदमा. हा संपूर्ण सिनेमा बघताना डोळ्यात अश्रू आले नाहीत असं होत नाही. हा सिनेमा सुद्धा आधी तामिळ भाषेत बनवला आणि तीच कास्ट, तेच कलाकार घेऊन हा सिनेमा हिंदीमध्ये बनवला गेला. 

साधारण २००० चं दशक सुरु झालं आणि रिमेकचा पूरच आला.

राजू, श्याम आणि बाबू भैय्याच्या हेरा फेरीचा कोणताही डायलॉग आपल्याला तोंडपाठ असतोय.  या सिनेमाचे दिग्दर्शक प्रियदर्शन एका मल्याळम सिनेमाने प्रभावित झालेले ज्याचं नाव होतं रामजी राव स्पिकिंग. हा सिनेमा मल्याळम सिनेमामध्ये क्लासिक समजला जातो.आणि हेरा फेरीचंही बॉलिवूडमध्ये तसंच झालं. आज हेरा फेरीचं नाव क्लासिक सिनेमांमध्ये घेतलं जातं.

त्यानंतर आर माधवनचे सलग दोन तामिळ सिनेमे बॉलिवूडमध्ये बनवले गेले. मिन्नले या सिनेमाचा रिमेक होता ‘रहना है तेरे दिल में’, ज्यात त्याने स्वतः काम केलं. दुसरा होता मनी रत्नम यांनी दिग्दर्शित केलेला ‘आलय पायते.’ २००२ मध्ये विवेक ओबेरॉय आणि राणी मुखर्जी यांची भूमिका असलेला साथिया हा आलय पायतेचा रिमेक होता.

हळूहळू हे सत्र वाढत गेलं आणि मग एंट्री झाली सलमान खानची.

त्याच्या ३४ वर्षाच्या करिअरमध्ये त्याच्या नावावर २६ रिमेक आहेत. सलमाननं पोकिरी नावाच्या तेलगू सिनेमाचा रिमेक केला ज्याचं नाव होतं वॉन्टेड. हा सिनेमा प्रचंड गाजला आणि ९३ कोटींची कमाई सुद्धा करून गेला. मग सलमानने रेडी, किक, बॉडीगार्ड, जय हो असे सिनेमे केले जे सुद्धा साऊथ सिनेमांचे रिमेक आहेत.

त्याच काळात आमिर खानचा गजनी सिनेमा आला. हा सिनेमा सुद्धा २००५ साली आलेल्या तमिळ सिनेमाचा रिमेक होता. तामिळ आणि हिंदी दोन्हीकडे हा सिनेमा एकाच नावाने रिलीज झाला. पण तामिळमधला हा सिनेमा ५० कोटींची कमाई करून गेला तर बॉलिवूडचा हा सिनेमा १०० कोटींचा आकडा पार करणारा पहिला सिनेमा ठरला.

 या बॅक टू बॅक यशामुळे बॉलिवूडमध्ये रिमेकचा पायंडाचाच पडला. 

त्याच काळात डब सिनेमाचं मार्केट उभं राहत होतं. टॉलिवूडमध्ये २००० च्या सुरुवातीच्या काळात एकदम ऍक्शनपॅक सिनेमे बनत होते आणि ते सिनेमे मराठी आणि हिंदी भाषिकांना कळतील म्हणून डब केले जात होते. मास, मारी, शिवाजी, आर्या असे साउथचे सिनेमे रिलीजनंतर हिंदीत डब व्हायचे आणि प्रेक्षकांना बघता यायचे. त्या काळात रिमेकवर त्याचा काही विशेष परिणाम झाला नाही.

सध्याच्या काही वर्षांचा विचार केला तर रिमेकचा नुसता भडीमार झालाय, कारण याच वर्षात असे चिक्कार सिनेमे आहेत जे बॉलिवूडमध्ये रिमेक झाल्यावर सपशेल आपटले. जर्सी, बच्चन पांडे, हिट- द फर्स्ट केस, तडप, विक्रम वेधा हे सिनेमे फार चांगली कामगिरी करू शकले नाहीत. 

हळूहळू या रिमेकच्या चक्रात स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरण्यात बॉलिवूडचे फिल्ममेकर कमी पडले, अशी टीका त्यांच्यावर होते. दुसऱ्या बाजूला साऊथच्या सिनेमांना कायम वरचा क्लास का समजलं जातं तर त्यांच्या क्रिएटिव्हिटीमुळे.

पुष्पा, RRR, KGF २ सारखे सिनेमे या वर्षात आणि मागच्या वर्षात बक्कळ कमाई करून गेले. हे सिनेमे हिंदी भाषेत डब होऊन रिलीज झाले, ज्यांनी करोडोंमध्ये कमाई केली. आत्ता KGF २ चं उदाहरण घेतलं तर त्याच्या हिंदी व्हर्जनने सुद्धा ४३३ कोटींची कमाई केली.

तसंच सध्या साऊथच्या सिनेमात दिसणारे बॉलिवूडचे कलाकार प्रेक्षकांना जास्त आकर्षित करतात. KGF २ मध्ये दिसलेली रविना टंडन, RRR मध्ये दिसलेली आलिया भट्ट, आणि सीतारामममध्ये दिसलेली मृणाल ठाकूर. 

तसंच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सध्या साऊथ इंडियन भाषेतले अनेक सिनेमे हिंदीमध्ये उपलब्ध असताना अशा सिनेमांचा हिंदी रिमेक झाला, तर तो बॉक्स ऑफिसवर चालणं सुद्धा अवघड होतं. आता अक्षय कुमारने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सोराई पोटरु सिनेमाचा रिमेक करणार असं जाहीर केलंय पण हा सिनेमा ओटीटीवर हिंदी भाषेत डब केलेला उपलब्ध आहे.

आता येत्या काळात दृश्यम २, मिली, शहजादा हे हिंदी सिनेमे आहेत जे साऊथच्या सिनेमांचा रिमेक असणार आहेत. बॉलिवूडवर आधीच बॉयकॉटच नवं संकट आहे त्यात येणाऱ्या काळात हे रिमेक बॉलिवूडला तारण्यासाठी मदत करणार का ? हे पाहावं लागेल.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.