बोर्डाच्या पेपरपासून पहिल्या लव्हलेटरपर्यंत, ट्रायमॅक्स पेन आपला खरा जिगरी होता…
आमच्या चाळीत रम्या नावाचं पोरगंय. सचिन तेंडुलकरनी बॉलर्सला, सलमान खाननं फिजिक्सच्या नियमांना आणि लफडं घरी घावल्यावर बापानं पोराला जितकं तुडवलं नसेल, तितकं रम्याच्या आईनं रम्याला तुडवलंय. रम्याची आई डब्ल्यूडब्ल्यूएफ खेळली असती, तर इतके पैशे आले असते की आलेल्या पैशातून चाळीतले सगळे संडास नीट झाले असते.
तर हा, रम्या आयुष्यात फक्त एकाच प्रसंगी खुश होता, बारावीच्या पेपरला जाताना. पेपर आहेत म्हणून रम्याच्या मदरनी हात आखडता घेतला होता, बारावी आहे म्हणून रम्यानं पण लडतरी बंद केलेल्या. जया बच्च्चन-अभिषेक बच्चन शांत असलेल्या रम्याचे फादर म्हणजेच स्वस्तातले बच्चन यांनी रम्याला एक गिफ्ट दिलेलं… ट्रायमॅक्सचा पेन.
ट्रायमॅक्स म्हणजे संपूर्ण निळा किंवा काळा रंग, त्याच्यावर ग्राफिक्स, टोपणाला सिल्व्हर पट्टी, पेनाचा लय वांड बॉक्स आणि त्याच्या जोडीला रिफील. आपण शाळेत हा पेन घेऊन गेलो की आपली हवा. पहिल्या बाकावरच्या ‘गृहपाठ चेक केला नाहीत बाई’ सांगणाऱ्या पोरांकडे ट्रायमॅक्स फिक्स असायचा.
मधली फळी ट्रायमॅक्स आणून त्यांच्या कंपूत घुसायचा प्रयत्न करायची. पण मागच्या १० बाकांवरच्या २० पोरांपैकी किमान १५ जण स्वतःचा पेन आणायची नाहीत. आज जगाला उधाऱ्या देणारी ही पोरं, तेव्हा उधारीतला पेन वापरण्याला शान समजायची. पण वर्षभर पेन नाय नेला, तरी चालत असलं तरी बोर्डाच्या परीक्षेला नवा पेन पाहिजे म्हणजे पाहिजेच.
पांढरी बॉडी आणि निळ्या झाकण्याचा पाच वाल्या रेनॉल्ड्सनं किंवा लेक्सीनं कितीही वह्या खरडल्या, तरी बोर्डाच्या पेपरला सगळ्या बाकांवर ट्रायमॅक्सचा बॉक्स आणि त्याच्याशेजारी एक रिफील. कारणं विचाराल तर लई आहेत… आधी जरा इतिहास बघू.
तर ट्रायमॅक्स पेन मार्केटमध्ये आणलं रेनॉल्ड्सनं. रेनॉल्ड्स ही कंपनी सुरू केली मार्केटमध्ये पहिलं बॉल पॉईंट पेन आणणाऱ्या मिल्टन रेनॉल्ड्स यांनी. २९ ऑक्टोबर १९४५ ला, पहिल्या वहिल्या रेनॉल्ड्स पेननं न्यूयॉर्कमधून मार्केटमध्ये एंट्री मारली, त्यावेळी ते पेन घ्यायला जवळपास पाच हजार लोकं आली होती. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर असली खुंखार गर्दी झाली होती, की ती कंट्रोल करायला पोलिसांना बोलवावं लागलं होतं.
तेव्हापासून मग रेनॉल्ड्स हळूहळू सगळ्या जगभरातल्या मार्केटमध्ये पसरला. भारतात १९८० च्या दशकात रेनॉल्ड्सचे पेन आले. त्या काळात पेन वैगेरे वापरणं म्हणजे लई मोठ्या लोकांची गोष्ट झाली, पण हळूहळू रेनॉल्ड्सनं इंडियन मार्केटमध्ये जम बसवला.
चेन्नईच्या जी. एम. पेन्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडं रेनॉल्ड्स बनवायचं लायसन्स होतं.
पुढं या कंपनीनं शाळकरी आणि कॉलेजला जाणाऱ्या पोरांना हेरलं, पांढरी बॉडी आणि दातांनी चाऊन चोथा होणारं निळं टोपण या पेनपासून रेनॉल्ड्सशी दोस्ती झाली, ती लय वेळ टिकली. पण या दोस्तीला चार चाँद कुणी लावले तर रेसर जेल आणि आपला जिगरी असणाऱ्या ट्रायमॅक्सनं.
कित्येक पोरांसाठी ट्रायमॅक्स हा रेग्युलर वापरण्याचा पेन नव्हताच. कारण म्हणजे त्याची किंमत असायची ३५ ते ४० रुपये. बरं हे झालं साध्या ट्रायमॅक्सचं, लय हुशार किंवा लय पैशेवाल्या पोरांकडं गोल्ड ट्रायमॅक्स असायचा. आहाहा त्याची तर शानच वेगळी. तो काढून नुसता बेंचवर जरी ठेवला, तरी सुपरव्हायझरला वाटणार ‘हा गडी सज्जनाय, खिशे तपासायला नको.’
परीक्षेच्या काळात ट्रायमॅक्स मुन्नाभैय्या व्हायचा, जलवा है हमारा यहा म्हणत.
कित्येक पोरं-पोरी पेपरला यायचे, बॅगेतून ट्रायमॅक्स काढायचे, मग अगदी प्रेमानं कुठल्यातरी कागदावर देवाचं नाव लिहिणार, शुभशुकन ओ दुसरं काय. मग पेपर लिहायला घेतला की, पहिल्या पानावर अगदी नक्षीदार अक्षर. हजारवेळा पेन फुटतोय का, मागच्या पानावर नक्षी उठतीये का हे चेक करायचं.
हा डाउट, पहिलं पान आणि अर्धा पाऊण तास एकत्रच संपायचे, मग सगळ्यांची पेनं उसेन बोल्टगत सनासना पळायची. हात दुखला की, पेन… सॉरी सॉरी ट्रायमॅक्स साईडला ठेवून हात झटकायचा. शाई उडायला नको…
आता शिक्षकांनी कानात येऊन उत्तरं सांगितली असती, तरी आपल्याकडून पेपरची १६ पानं भरली नसती, तरी पोरं एक्स्ट्रा रिफील घेऊन यायची, उगा लागली वैगरे तर. दहावीच्या पेपरनंतर जसं दप्तर आणि वह्या गुल झाल्या तसंच ट्रायमॅक्सचं पेनही.
अकरावीत सिरियसली कॉलेज करणारी पोरंच किती असणार, त्यामुळं कपाटातलं ट्रायमॅक्स काय बाहेर निघायचं नाही. त्याची आठवण याची कप्पा आवरताना.. नायतर प्रेमपत्रं लिहिताना. कारण कसंय, कागदाचा तुकडा माझं भविष्य ठरवू शकत नाय, हे वाक्य बोर्डाच्या परीक्षेत आणि पहिल्या लव्हलेटर वेळी एकदम फेल ठरतंय.
जीएम पेन वाल्यांनी ट्रायमॅक्सचं प्रॉडक्शन बंद केल्यावर रोरिटो कंपनी सुरू करुन टी-मॅक्स काढला, ट्रायमॅक्सची नक्कल करणारेही अनेक पेन आले… पण तो निवांत फ्लो, नक्षीदार डिझाईन असणारा ट्रायमॅक्सचा जगात नाद नाही… हे फिक्स.
पहिलं लव्ह लेटर लिहिताना, कित्येकांनी ट्रायमॅक्स काढला असेल. पेन फुटतंय का हे पाहिलं असेल अगदी हलक्या हातांनी लिहिलं असेल, प्रिय…. अगदी तसंच जसं पेपरच्या वेळी शुभशकुनाला देवाचं नाव लिहिलं असेल… दोन्ही वेळेस दुनिया बदललेली… एक गोष्ट मात्र कायम होती… आपल्या हातात असलेला ट्रायमॅक्ससारखा जिगरी दोस्त…
हे ही वाच भिडू:
- भारतात तयार झालेला जेल पेन हा जगभरातल्या ऑफिसमध्ये राज्य करतो.
- त्यावेळी वर्गात दोन गट होते, एक पेपरक्वीनवाल्यांचा आणि दुसरा चायना पेनवाल्यांचा..
- प्रेम हे अनेकवचनी असतं हे सांगणारा प्रेमम.