केजीएफमध्ये दाखवलाय तसलाच स्ट्रगल रॉकीनं खऱ्या आयुष्यातही केलाय…

सगळं थिएटर हाऊसफुल होतं. परमिशन दिली असती, तर पोरं पायऱ्यांवर पण बसली असती. परत परत पिक्चर बघणाऱ्या पोरांची, पोरींची संख्या पण लई होती. त्या पिक्चरचं येडच तसं होतं. तेवढ्यात सगळ्या थिएटरमध्ये शांतता पसरली. पडद्यावरचा हिरो गुडघ्यावर बसला आणि त्यानं पावाचा तुकडा उचलून समोरच्या बाईला दिला आणि मग ती शांतता भेदत एक डायलॉग आला…

इस दुनिया में सबसे बडा योद्धा माँ होती है…

सगळ्या थिएटरमध्ये जल्लोष, टाळ्या, शिट्ट्या आणि आरडाओरडा. तेवढ्यात पुन्हा शांतता पसरली आणि एका भावानं पडद्यावर नाणी फेकली. आजवर रजनीकांतला एवढं प्रेम मिळताना पाहिलं होतं, पण आजचा सुपरस्टार होता रॉकिंग स्टार यश.

आज यशचा बड्डे आणि सोबतच KGF Chapter 3 चित्रपटाची घोषणा. 

रॉकी भाईचे चाहते KGF च्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.  आपल्या महाराष्ट्रातही कन्नड पिक्चर पाहिले जातात. पण कॉलीवूडमधलं एखादं पोरगं सगळ्या भारताचं सुपरस्टार होईल असं लय कमी लोकांना वाटलं असेल. पण ते बदलायचं काम केलं यशनं. आज केजीएफचा रॉकी म्हणून कित्येकांच्या स्टेटसला असणाऱ्या यशचा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

त्याचं खरं नाव आहे, नवीन कुमार गौडा. यश हे त्याचं स्टेज नेम. कर्नाटकमधल्या एका खेड्यात यशचा जन्म झाला. त्याचे वडील साधे बस ड्रायव्हर होते. यशला लहानपणापासूनच ॲक्टिंगची मजबूत आवड. शाळेतल्या कार्यक्रमांमध्ये छोटी-मोठी नाटकं करणं, डान्स करणं हे भावाचं आवडतं काम. त्यामागचं कारणही तसंच होतं. त्यानं अगदी लहानपणी डोक्यात पक्कं केलं होतं, आपल्याला पुढं जाऊन सुपरस्टार व्हायचंय.

केजीएफमध्ये पोलिसांचा कुत्थुन मार खाल्लेल्या पोराला ‘क्या चाहिये रे तेरेको?’ असं विचारलं जातं तेव्हा त्याचं उत्तर येतं…

‘दुनिया’

यशची स्टोरी पण सेम टू सेम अशीच. भावाला सुपरस्टार तर बनायचं होतं, पण खिशात ना पैसे, ना घरच्यांचा पाठिंबा. त्यांच्या घरच्यांना वाटत होतं की पोरानं, हा अभिनयाचा नाद सोडून द्यावा आणि स्टेबल करिअर करावं. पण…

दुवा है उसके सर पे…

असं म्हणत यश खिशात फक्त ३०० रुपये घेऊन बँगलोरला आला. आता अभिनय फक्त स्ट्रगलच्या जोरावर जमत नाही म्हणून भावानं एक नाट्यसंस्था जॉईन केली. तिथं अभिनयाचे धडे गिरवले. यशच्या डोक्यात आणखी एक गोष्ट फिक्स होती, आपल्याला सिरीअल-बिरीअलमध्ये कामच नाही करायचंय, आपल्याला थेट सुपरस्टार व्हायचंय.

पण त्याला पहिला ब्रेक दिला तो टीव्ही सिरीअलनंच. ते काम स्वीकारण्यामागंही कारण होतं. त्याचं कुटुंब बँगलोरमध्ये आलेलं आणि त्यांचा खर्च पेलवण्यासाठी त्याला नाटकांमध्ये काम कळून मिळणारे पैसे पुरेसे नव्हते. म्हणून त्यानं सीरिअलमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला, पण याच सीरिअलनं त्याच्यासाठी पिक्चरचे दरवाजे उघडले. सिरीयलमधून मिळालेल्या पैशांमधला एक हिस्सा तो घरी द्यायचा आणि उरलेल्या पैशांचे कपडे घ्यायचा. भावानं काटकसर करत दिवस पुढे ढकलले, पण या सगळ्याचं फळ आज त्याला मिळतंय.

२००८ मध्ये मोग्गीना मानासु नावाच्या चित्रपटात त्याला काम मिळालं, पण त्यात भाऊ हिरो नव्हता. त्याचवर्षी त्याचा आणखी एक पिक्चर आला, त्यात तो हिरो होता. पिक्चरचं आणि त्याच्या कॅरॅक्टरचं नाव सेमच होतं… रॉकी. त्या पिक्चरनं यशला जबरदस्त ग्लॅमर दिलं. पुढं बरोबर १० वर्षांनी त्याचा आणखी एक पिक्चर आला, केजीएफ. ज्यात त्यानं व्हिलनला हाणलं की गाणं वाजायचं…

सलाम रॉकी भाई.

केजीएफ आणि त्यातला रॉकी जबरदस्त सुपरहिट ठरला. भारतातल्या जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात हा पिक्चर गाजला आणि पिक्चरनं जबरदस्त कमाईही केली. आता पिक्चरचा पुढचा पार्ट येणारे आणि त्याचीही खुंखार उत्सुकता आहे.

त्यादिवशी एका कट्ट्यावर केजीएफची चर्चा सुरु होती, आम्ही पण कान देऊन ऐकत होतो. तेव्हा कानावर पडलेलं ज्ञान आता तुम्हाला सांगतो.

“केजीएफमध्ये रॉकीभाई लय अशक्य गोष्टी करतो. वीस-वीस लोकांना एकटा मारतो. उचलू उचलू आपटतो. त्या गरुडाच्या राज्यात जाऊन त्याचा गेम वाजवतो. आपल्याला हे माहितीये की हे काय खऱ्या आयुष्यात होऊ शकत नाही. पण आपण रॉकीच्या जागी स्वतःला इमॅजिन करतो. त्याच्यासारखी तब्येत कमवावी वाटते. तो एवढ्या लडतरी करुन मोठा माणूस बनतोय तसं आपल्याला पण बनावं वाटतंय. तो त्याच्या आईचं स्वप्न पूर्ण करणार म्हणून आपण खुश होतोय, कारण आपल्यालाही आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचंच असतंय. आणि कसंय माहिती का, पिक्चरमध्ये कितीही मारहाण पाहिली तरी आपल्या डोक्यात एकच गोष्ट फिट बसतेय…

इस दुनिया में सबसे बडा योद्धा माँ होती है…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.