युवराज सिंग २०११ चा वर्ल्डकप खेळला, तो सचिनचा फोटो बघून…

ही गोष्टच खरंतर फोटोंची आहे. २०११ चा वर्ल्डकप भारतानं जिंकला, तेव्हा चार फोटो अजरामर झाले. पहिला फोटो धोनीनं कुलसेखराला सिक्स मारला त्याचा, दुसरा युवराजनं धोनीला मिठी मारली त्याचा, तिसरा सचिनला खांद्यावर घेऊन विजयी फेरी मारतानाचा आणि चौथा…

जवळपास २२ वर्ष वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून क्रिकेटच्या मैदानात झुंजणाऱ्या सचिन तेंडुलकरनं लहान मुलासारखं रडत युवराज सिंगला मिठी मारली त्याचा.

२ एप्रिल २०११ ची ती रात्र कुठलाच भारतीय चाहता आयुष्यात विसरू शकत नाही. भारतानं जिंकावं असं प्रत्येकाला वाटत असलं, तरी ते जिंकणं कधीच सोपं नसतं. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातल्या भारतीय संघानं मात्र ते करुन दाखवलं होतं. २००७ च्या वर्ल्डकपनं भारतीय संघाची पार अब्रू काढली होती. ज्या सचिनला देव म्हणून पुजलं जातं, त्याचे पुतळे जाळतानाही भारतीय फॅन्सनी पुढे मागं पाहिलं नाही. मग भले टी२० वर्ल्डकपची ट्रॉफी आणि आयपीएलमुळं जखमेवर फुंकर मारली गेली. पण कसं असतं…

जो बुंदसे गयी, वो हौदसे नहीं आती…

२०११ चा वर्ल्डकप तर भारतीय उपखंडात होणार होता. आपल्याच अंगणात होणारी स्पर्धा, आपणच हरलो असतो, तर इज्जतीचा फालुदा झाला असता. सलग तीन वर्ल्डकप मारणाऱ्या ऑस्ट्रेलियानं सगळ्या जगाला एक गोष्ट शिकवली होती. कोणतीही मोठी स्पर्धा जिंकायची असेल, तर तुम्हाला एक-दोन प्लेअर्सवर अवलंबून चालत नाय, तुमची सगळी टीम खेळली तर तुमचा नंबर लागत असतोय. २०११ च्या वर्ल्डकपमध्ये भारताच्या बाबतीत हेच घडलं. सेहवाग, सचिन, गंभीरपासून नवखा कोहली, झहीर, भज्जी, श्रीसंत हे बॉलर्स भारताचे सगळे एक्के परफेक्ट चालत होते. सगळ्या स्पर्धेत न चाललेला धोनी फायनलमध्ये चालला. पण या सगळ्यात भारताचं हुकमाचं पान होतं, ते म्हणजे युवराज सिंग.

चार, पाच, सहा कुठल्याही नंबरला बॅटिंगला आला, तरी युवराज फिक्स तोडफोड करायचा. बॅटिंग पहिली आहे की दुसरी याच्याशी त्याला अजिबात देणंघेणं नसायचं, आपलं रन्स करण्याचं काम तो इमानइतबारे करत होता. फिल्डिंगला तर तो चित्ताच होता, राहिला प्रश्न बॉलिंगचा. युवी संघात असताना धोनीला एक बॉलर कमी खेळवता यायचा, कारण युवराज फक्त १० ओव्हर्स भरुन काढत नव्हता, तर जिथं कमी तिथं मी म्हणत विकेट्सही काढत होता. मग समोर ऑस्ट्रेलिया असो किंवा आर्यलँड.. सुट्टी नाहीच.

बरं हे सगळं करणं युवराजसाठी सोपं नव्हतं, स्पर्धेच्या आधीच त्याला त्रास होत होता. भर मैदानात त्याला उलट्या झाल्या हे तर सगळ्या जगानं पाहिलं. वर्ल्डकप खेळायचाच हे युवराजच्या मनात पक्कं होतं, पण त्याला मोटिवेशनचा स्पार्क सापडत नव्हता. त्याच्या शेरदिल डेरिंगच्या जिगसॉ पझलमधला एक तुकडा मिसिंग होता. तो मिळवण्यासाठी त्याला मदत केली, त्याच्या लाडक्या पाजींनी. सचिन तेंडुलकरनी.

सचिनमुळे २०११ ची वर्ल्डकप स्पर्धा युवराजसाठी फक्त एक स्पर्धा नाही, तर मिशन झाली होती. स्पर्धेआधी या दोघांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. सचिन युवीला मोटिव्हेशनचं इंजेक्शन देत होता. सचिन म्हणाला, ”हा वर्ल्डकप अशा कुणा व्यक्तीसाठी खेळ, ज्याच्यावर तुझं प्रेम आहे, ज्याचा तू फार आदर करतोस. अशी व्यक्ती जी तुझ्या आयुष्यात फार खास आहे, जिनं तुझ्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशी व्यक्ती जिचं तू काहीतरी देणं लागतोस. या वर्ल्डकपला त्या व्यक्तीचं कर्ज समज, जे तुला फेडायचं आहे.”

हे वाचताना तुम्ही स्वतःला युवराजच्या जागी ठेवलं असेल, तर तुमच्या डोक्यात कित्येक चेहरे आले असतील. आई-वडील, मित्र, बायको आणि आणखी कुणी. युवराजच्या डोक्यात फक्त एकच माणूस आला, सचिन तेंडुलकर.

युवराज सांगतो, ”हे सगळं ऐकताना मी स्वतःला सांगितलं हा वर्ल्डकप आपल्याला सचिनसाठी खेळायचाय. मी माझं बालपण सचिनचा खेळ बघण्यात घालवलं, त्याचा खेळ बघत मी मोठा झालो. मी त्याचं देणं लागतो.”

युवराजनं केनियाविरुद्धच्या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या मॅचमधलाच सचिनचा एक फोटो त्यानं आपल्या ‘कॉफीन’मध्ये (क्रिकेटर्स किटबॅगला कॉफीन म्हणतात) चिकटवला होता आणि त्याच फोटो शेजारी सेम सचिनसारखाच शॉट खेळणाऱ्या युवराजचाही फोटो होता. प्रत्येकवेळी तो किटबॅग उघडायचा, तेव्हा त्याला हे दोन्ही फोटो दिसायचे आणि वर्ल्डकप खेळण्याचं आणि जिंकण्यासाठी आपला जीव पणाला लावण्याचं कारण दिसायचं.

शरीर साथ देत नसतानाही युवराज झुंजला आणि त्यानं फक्त सचिनचंच नाही, तर कित्येक भारतीयांचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं. किटबॅगमधल्या फोटोपासून सुरु झालेला प्रवास… सचिन युवीच्या मिठीवाल्या फोटोनं पूर्ण झाला, तेही मनात समाधानाची भावना ठेवून!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.