सचिनसोबत डेब्यू करणारा प्लेअर, दारुला हरवून सिलेक्शन कमिटीत पोहचलाय…

१५ नोव्हेंबर १९८९, हा दिवस कट्टर क्रिकेट चाहते कधीच विसरू शकत नाहीत. याच दिवशी कराचीमध्ये सचिन तेंडुलकर नावाच्या एका १६ वर्षांच्या मराठी पोरानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर सगळं क्रिकेटविश्व गाजवलं.

मात्र त्याच दिवशी आणखी एका मराठी पोरानं सचिनसोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सचिन मुंबईचा तर तसा हाही गडी मुंबईचा, पण मूळ गाव सोलापूर. वडील पोलिस होते, त्यामुळं हा मुंबईला आला आणि इथलाच झाला. याचं नाव सलील अंकोला.

दिसायला देखणा, धिप्पाड तब्येत, सुंदर वाटावा असा रनअप आणि बॉलला जबरदस्त स्पीड. शाळा-कॉलेजात असल्यापासूनचा सलील पोरींमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. तो नुसता मैदानावर उभा राहिला तरी बघायला गर्दी व्हायची.

मुंबईच्या क्रिकेटचा वारसा बघता, साधं त्यांच्या टीममध्ये जागा मिळवणंही कठीण होतं, मात्र सलीलचा फिटनेस आणि बॉलिंगमधला स्पीड, सातत्य पाहता त्याला ही गोष्ट काय फारशी कठीण गेली नाही. १९८८-८९ च्या सिझनमध्ये त्यानं मुंबईकडून पदार्पण केलं आणि पहिल्याच मॅचमध्ये हॅटट्रिक काढली. डेब्यू मॅचमध्ये इनिंगला सहा विकेट्स, एका सिझनला २७ विकेट्स अंकोलाची मजबूत हवा झाली होती.

पाकिस्तान दौऱ्यासाठी जेव्हा टीम जाहीर झाली तेव्हा त्यात सलील अंकोलाचं नाव त्यात होतं. पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेला सराव सामन्यानं सुरुवात झाली, त्यात त्यानं ७७ रन्स देत ६ विकेट्स खोलल्या. एवढा दमदार परफॉर्मन्स दिल्यानं त्याची पहिल्या टेस्टमध्ये निवड झाली.

मात्र त्याला फक्त २ विकेट्स घेता आल्या, पण फटके मात्र लई पडले. त्याच मॅचमध्ये त्याला दुखापत झाली आणि पुढच्या टेस्टमध्ये संधी गेली. वनडेमध्येही इम्रान खानची विकेट काढणं आणि त्याला एक सिक्स मारणं यापलीकडे त्याला काही विशेष करता आलं नाही.

टेस्ट टीमचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद झाले, वनडेमध्ये तो फक्त २० मॅचेस खेळू शकला. पण कित्येक वर्ष अंकोला फक्त पाणीवाटपाचंच काम करत होता. हळू हळू त्याला कळून चुकलं की इकडं आपलं गणित लागत नसतंय. त्यात दुखापती अधूनमधून डोकं वर काढायच्या, नवे पेस बॉलर्स येत गेले आणि अंकोलाच्या क्रिकेट करिअरला ब्रेक लागला तो लागलाच.

क्रिकेट थांबलं तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा हा प्रश्न होताच. सलील दिसायला देखणा होता, तब्येत बॉडीबिल्डरसाठी होती. साहजिकच त्याला मॉडेलिंग आणि फिल्मच्या ऑफर येऊ लागल्या आणि त्यानंही पैसे कमवण्यासाठी तो मार्ग आजमावायचा ठरवलं.

त्यानं सुरुवात केली टीव्ही सिरियल्सपासून. गाजलेल्या सीआयडी मालिकेतही तो दिसला, कुरुक्षेत्र पिक्चरमध्ये थेट संजय दत्त सोबत चमकला. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण २०१० पर्यंतच.

तिथून आला सलील अंकोलाच्या आयुष्यातला ट्विस्ट

२००४ पासूनच सलीलला दारू पिण्याची सवय लागली होती; ती सवय हळूहळू वाढत गेली. २०१० मध्ये तो आपल्या पहिल्या बायकोपासून वेगळा झाला, त्याची मुलं त्याला सोडून गेली, बँक अकाउंटमधले पैसे संपले, राहतं घरही गेलं. दिवस इतके खडतर होते की सलील मुंबईच्या रस्त्यांवर आपली गाडी पार्क करुन त्यामध्ये राहायचा.

क्रिकबझला दिलेल्या एका मुलाखतीत तो सांगतो, “माझी गाडी बघून पोलिस मला विचारायचे, अरे सलील भाऊ तुम्ही इथे कसे ? काही टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत, निवांत झोपा.”

पुढं कर्जाचा बोजा इतका वाढला की ज्या कारमध्ये तो राहायचा, ती कारही बँकवाले घेऊन गेले.

पण या सगळ्यातून बाहेर पडणंही तितकंच गरजेचं होतं. २०१२ मध्ये सलीलला फेसबुकवर एक मुलगी भेटली, रिया. दोन वर्ष या दोघांचं बोलणं सुरू होतं, रियानं त्याला अनेकदा रिहॅबमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता, पण गोष्ट जमून येत नव्हती.

२०१४ च्या व्हॅलेंटाईन्स डेला सलीलला पोलिसांनी नशेत गाडी चालवताना पकडलं, त्यावेळी तो इतका दारू पिला होता की तोंडातून रक्त येत होतं. त्यावेळी मात्र रियानं त्याला रिहॅबमध्ये टाकलंच. २०१२ ते २०१४ या काळात सलील जवळपास १० वेळा आयसीयुपर्यंत पोहोचला होता. पण यावेळी रिहॅब त्याच्या मदतीला धाऊन आलं.

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्यानं पहाटे ४.३० ला रियाला फोन केला आणि सांगितलं की, ‘यापुढं कधीच मी तुला दारू पिलेलो दिसणार नाही.’ त्यानं दारू सोडली, ती सोडलीच.

रिहॅबमधून बाहेर पडल्यावर त्यानं रियासोबत लग्न केलं, आता त्याचा सुखी संसार सुरू आहे. त्याचं फिल्म, सिरियल्समधलं कामही सुरू झालं, पण तरी आयुष्यात काहीतरी मिसिंग वाटत होतंच.

ती गोष्ट म्हणजे क्रिकेट, २००१ नंतर त्यानं क्रिकेटशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले होते. त्याचं हेच क्रिकेटप्रेम मिसिंग होतं. त्याच्या बायकोनं त्याला पुन्हा क्रिकेटची वाट धरण्याचा सल्ला दिला. 

क्रिकबझशी बोलताना तो सांगतो, कोचिंगमध्ये ट्राय करुन पाहण्यासाठी त्यानं NCA मध्ये अर्ज केला, राहुल द्रविडशीही बोलला, मात्र त्याला जाणीव झाली की आपल्याकडे पेशन्स नाहीत त्यामुळं आपण काही चांगले कोच होऊ शकणार नाही.

पण तरी मार्ग सापडलाच, मुंबई क्रिकेट बोर्डानं त्याला संधी दिली. तो मुंबईचा चीफ सिलेक्टर झाला, पुन्हा ग्राउंडवर आला, खेळाडूंसोबत मिसळला आणि त्यानं निवडलेल्या टीमनं २०२२ च्या रणजी ट्रॉफीची फायनलही गाठली.

आपण दारू सोडून किती वर्ष झाले हे आता सलीलला आठवत नाही. त्याचं करिअर पुन्हा मार्गी लागलं, पण महत्त्वाचं म्हणजे तो क्रिकेटच्या फिल्डवर आला. नुकतीच त्याची बीसीसीआयच्या चीफ सिलेक्शन कमिटीमध्येही निवड झाली, म्हणजेच तो आता भारताचा मुख्य संघ निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

आणखी एक गोष्ट टिकून राहिलीये, ती म्हणजे त्याचं सचिनवरचं प्रेम

सलीलनं अनेक वर्ष क्रिकेट बघणं सोडलं होतं, त्याला एकाच मॅचचा अपवाद होता ती मॅच म्हणजे २०११ ची वर्ल्डकप फायनल. आपल्या मित्राचं, सहकाऱ्याचं सचिनचं स्वप्न पूर्ण होताना त्यानं पाहिलं आणि सगळं काही नीट झाल्यावर सचिनला मेसेजही केला.

१९८९ मध्ये दोन मित्र मैदानावर एकत्र उतरले, आज एक वर्ल्ड चॅम्पियन आहे, ज्यानं बॉलर्सला हरवलं आणि दुसरा आहे, ज्यानं दारूला आणि संकटांना हरवलं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.