आणि त्या दिवशी राम गोपाल वर्माला ‘भिकू म्हात्रे’ सापडला.

1990 नंतरचा काळ. बाॅलिवूड रोमँटीक सिनेमांत रमलं होतं. शाहरुख, सलमान, आमीर हे तीन खान बाॅलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करु पाहत होते. तिघांचे सिनेमे सुद्धा तुफान लोकप्रिय होते.

याच काळात 1994 साली शेखर कपूर यांनी ‘बँडीट क्वीन’ सिनेमा आणला. सीमा बिस्वास, गजराज राव, सौरभ शुक्ला, आदित्य श्रीवास्तव, मनोज बाजपेयी अशी स्टारकास्ट होती.

‘बँडीट क्वीन’ मुळे बाॅलिवूडचा रोमँटिसीझम काहीसा मोडीत निघाला.

हिच सुरुवात होती एका नव्या वळणाची.

‘बँडीट क्वीन’ नंतर त्यातील सगळ्या कलाकारांना हळूहळू मालिका, सिनेमांमध्ये कामं मिळू लागली होती. सौरभ शुक्ला मालिकांमध्ये व्यस्त झाले. सीमा बिस्वास यांना ‘खामोशी’ सिनेमा मिळाला. आदित्य श्रीवास्तवला ‘सी. आय. डी.’ या लोकप्रिय मालिकेतील इन्स्पेक्टर अभिजीत हि भूमिका मिळाली. पुढे या मालिकेचा इतिहास आपल्या सर्वांना ठाऊक आहेच.

‘बँडीट क्वीन’ मधला आणखी एक कलाकार होता त्याला मात्र कुठेच काही काम मिळत नव्हतं.

हा कलाकार म्हणजे मनोज बाजपेयी.

एके दिवशी राम गोपाल वर्मा यांच्या आगामी सिनेमाचा लेखक कनन अय्यर यांनी मनोज बाजपेयीला गाठलं. या सिनेमाचं नाव होतं ‘दौड’.

सिनेमात परेश रावल यांच्या राईट हँडच्या रोलसाठी कलाकारांची शोध सुरु होता. कनन अय्यरने इरफान खान, विनीत कुमार या कलाकारांसोबत मनोज बाजपेयीला सुद्धा सांगीतलं.

हा रोल जर मनोज बाजपेयीला मिळाला तर त्याला ३५००० रुपये मानधन मिळणार होतं.

भूमिका चांगली होतीच, शिवाय पैसे मिळाले तर घरभाडं सुद्धा सुटेल, या हेतूने मनोज बाजपेयी राम गोपाल वर्माच्या ऑफीसमध्ये गेला.

ऑफीसमध्ये पोहचल्यावर इरफान , विनीत कुमार आले होते. या दोघांशी बोलणं झाल्यावर मनोजला रामूने आतमध्ये बोलावलं.

याआधी कुठे काम केलंयस,

असं रामूने विचारताच मनोज बाजपयीने ‘बँडीट क्वीन’चा उल्लेख केला. तेव्हा रामूने मनोजला विचारलं.

‘मी दोन वेळा बँडीट क्वीन पाहिलाय तू कुठे त्यात दिसला नाहीस, कोणता रोल केलेलास’,

‘मानसिंग’ हा रोल केल्याचं मनोजने सांगीतलं.

हे ऐकताच राम गोपाल वर्मा आश्चर्यचकीत झाले. कारण ‘बँडीट क्वीन’ पाहिल्यापासून राम गोपाल वर्मा सिनेमात ‘मानसिंग’ ची भूमिका करणा-या कलाकाराला शोधत होते. ‘मानसिंग’ ची भूमिका करणा-या कलाकाराच्या अभिनयाने ते प्रभावित झाले होते.

तब्बल चार वर्ष त्यांचा हा शोध सुरु होता. आणि हाच कलाकार ऑफीसमध्ये त्यांच्या समोर बसला होता.

त्यांनी मनोजला हि गोष्ट सांगीतली. मनोजला यावर काय बोलावं सुचलं नाही.

‘तु ‘दौड’ साठी काम करु नकोस. हा रोल तुझ्यासारख्या कलाकारासाठी नाही. ‘दौड’ नंतर मी एक तेलगू सिनेमा बनवणार आहे आणि त्यानंतर एक हिंदी सिनेमा. त्या हिंदी सिनेमात तू प्रमुख भूमिका करशील’,

असं रामूने मनोजला सांगीतलं.

मनोज बाजपेयीचा तो स्ट्रगलचा काळ होता. पैशांची सुद्धा त्याला गरज होती.

आणि मुंबईच्या आजवरच्या प्रवासात अशाप्रकारे कामाची आश्वासनं देणारी माणसं त्याने खूप बघितली होती. त्यामुळे मनोजने सध्या ‘दौड’ मध्ये काम करण्याची इच्छा रामूंजवळ व्यक्त केली.

‘ठीकय! तुझा माझ्यावर विश्वास नाही. तु यात काम कर. पण मी ‘दौड’ नंतर बनवणारा तेलगू सिनेमा रद्द करतोय. आणि तुला घेऊन हिंदी सिनेमाच्या तयारीला लागेन’,

असं रामूने मनोज बाजपेयीला सांगीतलं.

दौड’ १९९७ ला रिलीज झाला. यात मनोज बाजपेयीने काम केलं.

लगेचच रामू ‘सत्या’ च्या तयारीला लागले. दिलेल्या शब्दाला जागून रामूने मनोज बाजपेयीला ‘सत्या’मधली ‘भिकू म्हात्रे’ हि भूमिका दिली.

जेव्हा ‘सत्या’ बनत होता तेव्हा मनोज बाजपेयीसह सर्वांना वाटत होतं, की हा सिनेमा फ्लाॅप होणार आणि आपल्याला हे क्षेत्र सोडून कुठेतरी छोटी-मोठी नोकरी बघावी लागणार.

३ जुलै १९९८ ला ‘सत्या’ रिलीज झाला.

पहिला एक आठवडा सिनेमाला प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद नव्हता. एक फ्लाॅप सिनेमा म्हणुन ‘सत्या’ ओळखला जाणार होता. परंतु अचानक दुस-या आठवड्यात ‘सत्या’ सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय झाला आणि सुपरहिट ठरला. एक ट्रेंडसेटर सिनेमा म्हणून ‘सत्या’ नावाजला गेला.

एकदा याच काळात मनोज बाजपेयी दादरच्या प्लाझा थिएटरला गेला असताना प्रेक्षकांनी त्याला एवढा गराडा घातला की त्या गर्दीतुन मनोजला बाहेर काढण्यासाठी चार सिक्युरीटी गार्ड मनोजच्या मदतीला धावले.

मनोज बाजपेयी या कलाकाराच्या लोकप्रियतेची हिच सुरुवात होती.

मनोज बाजपेयीने ‘सत्या’ नंतर अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. परंतु शर्टाची दोन बटणं उघडी सोडून एका वेगळ्याच स्टाईलमध्ये बोलणारा मनोज बाजपेयीचा ‘भिकू म्हात्रे’ प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत.

  • भिडू देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.