कितीही राग येत असला, तरी आफ्रिदीला खेळताना बघणं हा टेन्शनचा विषय होता…

आमच्या चाळीत एक रम्या नावाचं पोरगं होतं, तो गडी भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी उपास धरायचा. रम्याच्या आईचा आणि क्रिकेटचा तेवढाच संबंध होता, जेवढा विरेंद्र सेहवागचा बॅटिंगचं प्रेशर या गोष्टीशी. एका संध्याकाळी रम्याच्या आईच्या शिव्या कानावर पडल्या. या शिव्या दोघांना उद्देशून होत्या… एक रम्या आणि दुसरा शाहीद आफ्रिदी. आफ्रिदीनं भारताच्या खिशातली मॅच काढली आणि याच्यामुळं आपलं पोरगं जेवलं नाही, म्हणून रम्याची आई आफ्रिदीचं खानदान काढत होती.

क्रिकेट बघताना आपण सगळ्यांनीच रम्याची आई बनत कधी ना कधी आफ्रिदीला शिव्या घातल्यात. खोटं कशाला बोला? शिव्या घालायची कारणं तशी हजार असली, तरी आफ्रिदी मैदानात आला की त्याला बघणं हा लई भारी पण तितकाच टेन्शनचा विषय होता.. हे शंभर टक्के.

आपल्याकडं पाकिस्तानचा एखादा खेळाडू आवडतो म्हणलं, तरी लोकं रागानी बघतात. पण शोएब अख्तर, इंझमाम उल हक, जहीर अब्बास, सोहेल तन्वीर, युनूस खान आणि शाहिद आफ्रिदी यांचं क्रिकेट आपण एन्जॉय करायचो. त्यातल्या त्यात आफ्रिदीचा तर स्वॅगच वेगळा होता.

सगळ्या क्रिकेट जगतात लाला नावानं फेमस असलेला आफ्रिदी म्हणजे ६ फूट उंची, मानेवर रुळणारे लांब केस आणि काहीसं पुढं आलेलं पोट. लालानी कधी फिटनेस वैगरेकडे लक्ष दिलं असेल असं त्याच्या शरीराकडं बघून वाटायचं नाही, पण साहेब वयाच्या ४२ व्या वर्षीपर्यंत क्रिकेट खेळले, तेही ताकदीनं. यंदाच्या पीएसएलमध्येही आफ्रिदी खेळला, नशीब आमच्या रम्याच्या आईनं पाहिलं नाही…

खरंतर आफ्रिदी अंडर-१४ एजग्रुपमध्ये असताना फास्ट बॉलर होता. पुढं जाऊन त्यानं लेग स्पिनर म्हणून टीममध्ये जागा मिळवली. पण लालाचं खऱ्या अर्थानं नाव झालं, ते बॅटिंगमुळं. वनडे क्रिकेटमध्ये वयाच्या १६ व्या वर्षीच भावानं सेंच्युरी मारली. बॅटिंगमध्ये टेक्निक आणि टायमिंगच्या जोरावत बादशहा झालेले अनेकजण होते, आफ्रिदी ताकदीच्या जोरावर बादशहा झाला. एकवेळ आमिर सोहेल आणि सईद अन्वर परवडले, पण तरुणपणीचा आफ्रिदी म्हणजे नाद होता नाद.

सचिन म्हणलं की स्ट्रेट ड्राइव्ह आठवतो, विराट म्हणलं की कव्हर ड्राइव्ह… पण शाहिद आफ्रिदी म्हणलं की डायरेक्ट सिक्स आठवतात.

२०१४ चा आशिया कप. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच. पाकिस्तान चेस करत होती, अश्विन आणि अमित मिश्रानं त्यांचा बल्ल्या केला होता. नवंनवं क्रिकेट बघायला शिकलेली जनता हवेत होती, पण क्रिकेट खेळणारे गप्प. कारण ५ आऊट २०० वरुन पाकिस्तानला जिंकायचा चान्स होता कारण त्यांच्याकडे आफ्रिदी होता. त्यानं चोपाचोपी सुरू केली, पण दुसऱ्या बाजूनं टिपिकल पाकिस्तानी बॅटिंग सुरू होती. ४९ व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वरनं दोन विकेट काढल्या आणि शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अश्विननं सईद अजमलला गंडवलं. पाच बॉलमध्ये १० रन्स हवे होते आणि भारताला एक विकेट. जुनैद खाननं दुसऱ्या बॉलवर आफ्रिदीला स्ट्राईक दिली. प्रेशरची लेव्हल लय हाय होती. पण तिसरा बॉल सिक्स आणि चौथा बॉलही सिक्स. पाकिस्तान जिंकलं… १८ बॉलमध्ये ३४ मारलेल्या आफ्रिदीमुळं.

बरं हे एकदाच झालं असं पण नाही, कित्येकदा आफ्रिदी भारत आणि विजय यांच्यामध्ये उभा राहिला, कधी बॉलिंग एन्डला तर कधी बॅटिंग एन्डला.

आफ्रिदीच्या फिल्डिंगचा एक किस्सा तर सांगितलाच पाहिजे. २०११ वर्ल्डकप सेमीफायनल, भारत विरुद्ध पाकिस्तान. सचिन सनाट फॉर्ममध्ये खेळत होता, त्या मॅचमध्ये त्याचं शतक होईल असं फिक्स वाटत होतं, पाकिस्ताननं त्याचे ४ कॅच सोडलेले. सचिन ८५ वर होता आणि त्याचा पाचवा कॅच पकडला गेला, फिल्डर होता आफ्रिदी.

आफ्रिदीचा लेग स्पिन म्हणजे कला होती. त्याचा बॉल सपकन यायचा, स्पीड तर असायचाच पण मधून गपकन वळायचा, तेही हातभर. हे कमी की काय म्हणत मधूनच एखादा गुगली. लेग स्पिनर्सचा जन्म हा मार खाण्यासाठीच असतो, पण त्यातून विकेट काढणं हे स्कील असतंय. आफ्रिदी एखाद्या सिक्सचं गाजर खिलवून समोरच्याला गंडवायचा, विकेट काढल्यावर ते दोन्ही हात उंचावून असलेलं त्याचं सेलिब्रेशन पाहिलं की हमखास डोकं फिरायचं.

वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त सिक्स मारायचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे, वनडेमध्ये त्याला सगळ्यात जास्त रन्स मारलेले असले, तरी त्यानं ३९५ विकेट्सही काढल्यात. रिटायरमेंटवरुन कितीही ट्रॉल केलं, तरी त्याच्यामुळं क्रिकेट बघणं भारी झालं होतं हेही तितकंच खरंय. टी२० क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेटचा खऱ्या अर्थानं हिरो होता.

लोकांना त्याच्या आईचा उद्धार करण्याएवढा राग यायचा… कारण त्याचं खेळणं त्या दर्जाचं होतं. आजही भारत पाकिस्तानविरुद्ध हरला, की शिव्या आफ्रिदीला पडतात. कारण त्यानं दिलेल्या जखमा खोलवर रुजल्यात… लांब लांब मारलेल्या सिक्ससारख्या.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.