पैसा लावला सगळ्यांनी, पण क्रिकेटमधला धंदा फक्त शाहरुख खाननंच ओळखलाय

सध्या आयपीएलचा १५ वा सिझन सुरू आहे. सगळ्यात जास्त यशस्वी टीममध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा नंबर कदाचित तिसरा-चौथा येईल, यंदाच्या सिझनमध्ये ते कदाचित प्लेऑफ्सही गाठणार नाहीत, पण क्रिकेटच्या बिझनेसमध्ये घट्ट पाय रोवण्यात ‘बनिये का दिमाख’ कुणाचा चालला असेल, तर कोलकात्याच्या संघमालक शाहरुख खानचाच.     

नुकतीच एक बातमी आली की, शाहरुखनं युएई क्रिकेट लीगमध्ये अबुधाबीची टीम विकत घेतली आणि नाव दिलंय अबुधाबी नाईट रायडर्स. थोडक्यात कोलकाता नाईट रायडर्सची दुसरी ब्रँच. पण या आधी त्यानं वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या कॅरेबियन प्रिमीअर लीगमध्ये ट्रिनबॅगो नाईट रायडर्स नावाची एक टीम विकत घेतलेली.

इतकंच नाही तर, २०२० मध्ये त्यानं अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमध्ये लॉस एंजलिस नाईट रायडर्स ही टीम घेतल्याची बातमीही सुपरहिट झाली होती. सध्या ही टीम चर्चेत नसली तरी शाहरुख लॉस एंजलिसमध्ये स्टेडियम बांधतोय.

थोडक्यात काय, तर चारही ठिकाणच्या लीगमध्ये एकाच नावाची हवा होतीये, ‘नाईट रायडर्स.’

पण शाहरूख खान, त्याची रेड चिलीज एंटरटेन्मेन्ट, जुही चावला, जय मेहता आणि नाईट रायडर्सचा सीईओ वेंकी म्हैसूर यांनी हे साम्राज्य उभं का केलं? कसं केलं? याचा फायदा कसा होतो? हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

शाहरुख खान नावाचा ‘ब्रँड’ पाठीमागं असणं

वानखेडेमधला राडा असुद्यात, आर्यन खान प्रकरण असुद्यात किंवा पिक्चरमध्ये कमी झालेलं दिसणं असूद्यात… शाहरुखची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. आजही कोलकाता किंवा ट्रिनबॅगो नाईट रायडर्सचे कित्येक फॅन्स फक्त शाहरुख खान या एकाच नावामुळे आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स जेव्हा पहिल्यांदा मार्केटमध्ये आली, तेव्हा शाहरुखनं केलेलं गाणं, जाहिराती यामुळे टीमला ओळख मिळाली. कोलकात्याचं होम ग्राऊंड, ईडन गार्डन्स. स्वतः शाहरुख ईडन्सवर येणार हे समजलं की कितीही महाग तिकिटं हातोहात खपायची. जितकी जास्त तिकिटं विकली जाणार, तितका टीम ओनरला जास्त प्रॉफिट.

मैदानावरची ओळख

आयपीएलच्या पहिल्याच सिझनला कोलकात्यानं गांगुली आणि पॉन्टिंगला एकत्र खेळवलं. बरं इथंच विषय थांबला नाही तर शोएब अख्तरही त्यांच्याकडूनच खेळला. पुढं २०११ च्या वर्ल्डकप नंतर गौतम गंभीरची लोकप्रियता शिखरावर असताना तो कोलकात्याच्या कॅप्टन झाला आणि त्यानं टीमला दोनदा जिंकवूनही दिलं.

सध्याच्या टीममध्ये असलेली दोन महत्त्वाची नावं म्हणजे सुनील नरीन आणि आंद्रे रसेल. कुठल्याही क्षणी मॅच फिरवण्यात पटाईत असलेले हे दोघं म्हणजे, अनेकांनी मॅच बघण्याचं, मॅचला गर्दी करण्याचं कारण आहेत. चर्चेत राहणारे प्लेअर्स टीममध्ये ठेवत, भले रोहित-धोनी-कोहली नसले तरी कोलकाता हिट असतेच.

हेच ट्रिनबॅगो नाईट रायडर्समध्ये पोलार्ड, ब्राव्हो आणि नरीन एकत्र खेळतात. नुसती हाणामारी आणि नुसती गर्दी. सीईओ वेंकी म्हैसूर एका मुलाखतीत सांगतात, “ट्रिनबॅगो नाईट रायडर्समुळं भारतात सीपीएल बघणाऱ्यांची संख्या जवळपास चौपट झालीये.” थोडक्यात इकडचा पैसा तिकडं ओढायला लागलेत. 

हीच चार ठिकाणं का?

पैसाच लावायचा म्हणलं, तर तो कुठंही लावता आला असता. पण शाहरुख आणि रेड चिलीजनं भारत, वेस्ट इंडिज, युएई आणि अमेरिका या चार ठिकाणच्याच लीग्समध्ये पैसा लावण्यामागं पद्धतशीर स्ट्रॅटेजी आहे.

भारतात क्रिकेटला धर्म म्हणतात, इथं लोकप्रियता तर आहेच, पण अमाप पैसा आहे. इथं सगळी दुनिया बदलेल, पण लोकांचं क्रिकेटवर असलेलं प्रेम नाही. त्यामुळं आयपीएलमधली टीम म्हणजे सेट झालेला बिझनेस.

दुसरं ठिकाण वेस्ट इंडिज. कॅरेबियन बेटांवर क्रिकेट आधीपासून लोकप्रिय आहे, पण त्यांची सध्याची पिढी आणि प्लेअर्सही टेस्ट क्रिकेटपेक्षा जास्त प्राधान्य टी२० क्रिकेटला देतात. जगातल्या कुठल्याही लीगमध्ये विंडीजचे प्लेअर्स खेळत असतील, तर मॅच फिरवण्याची, हाणामारी करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून जास्त असते. आता त्यांचीच लीग म्हणल्यावर, हाण की बडिव, धुरळा उडीव.

तिसरं ठिकाण युएई. इथलं क्रिकेट वाढवण्यात भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांचा मोठा सहभाग आहे. नुसतं आयपीएल तुमच्याकडं घेऊ काय म्हणल्यावर, पायघड्या पडतात. त्यात शाहरुखची युएईमधली पॉप्युलॅरीटीही वेगळ्याच लेव्हलला आहे. 

टुरिझम, टॅक्सचे नियम, सोयी सुविधा आणि क्रिकेटची वाढती लोकप्रियता बघता… युएई काही दिवसात क्रिकेट हब बनणार हे जवळपास फिक्स आहे.

चौथं ठिकाण अमेरिका. बऱ्याच लोकांना माहीतपण नसतंय की अमेरिकेत क्रिकेट खेळतात. पण भावांनो तिथंही क्रिकेट गाजतंय. त्यांना देश म्हणून इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यात जेवढा इंटरेस्ट नाही, तेवढा आयपीएलसारख्या लीग खेळवण्यात आहे. 

२०२४ चा टी२० वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होतोय, नेमकं याचवेळी शाहरुख तिथं स्टेडियम बांधतोय. जिथं वर्ल्डकप मॅचेस होऊ शकतात. अमेरिकेतलं क्रिकेट जरा कुठं फॉर्मात यायला बघतंय आणि त्याचवेळी तिथलं मार्केट शाहरुख आणि नाईट रायडर्स आपल्या ताब्यात घेतायत.

चारही ठिकाणी नाईट रायडर्स हेच नाव कायम ठेवण्यामागंही एक साधं कारण आहे. कुठलीही लीग बघा, नाईट रायडर्सचं नाव दिसतं. आयपीएल संपली, तरी सीपीएल आहे, ती संपली की तिसरी. त्यामुळं नाईट रायडर्स हा ब्रँड फक्त एका लीग पुरता मर्यादित न राहता, ग्लोबल बनला. अमेरिका आणि युएईच्या मार्केटमध्ये क्रिकेटसोबतच मर्चन्डाईजचे, तिकीटाचे पैसे मॉप आहेत. जाहिरातीही भरपूर आहेत, सेलिब्रेटीजचा सहभाग झाला, तर सोने पे सुहागा आहेच.

जे ब्रँड आयपीएलमध्ये कोलकात्याला स्पॉनर करतायत, त्यांना इतर लीगमध्ये नाईट रायडर्सला स्पॉन्सरशिप देण्याचा पर्यायही असतो. याचा फायदा नाईट रायडर्सला तर होतोच पण सोबतच त्या ब्रँड्सनाही जगाच्या मार्केटमध्ये उडी मारता येऊ शकते.

ही नाय तर ती टीम खेळत असते आणि पैशाच्या मीटरमध्ये आकडे पडत जातात. जाहिराती, तिकिटं, लीगमधला शेअर असे टीममालकाला पैसे मिळवून देणारे हजार मार्ग असतात, त्यामुळं ही सायकल सुरूच राहते.

म्हणूनच चार लीग, चार टीम्स, एक नवं स्टेडियम… क्रिकेटमधला बिझनेस समजलाय तो फक्त शाहरुखलाच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.