म्हणून, शम्मी कपूरनं लिपस्टिकनं गीताबालीची मांग भरली…

हिंदी सिनेमाच्या दुनियेतील नायक नायकांच्या रुपेरी पडद्यावरील जोड्या आणि प्रत्यक्ष आयुष्यातील जोडीदार यांचं मोठं मजेदार समीकरण पाहायला मिळते. राज कपूर आणि नर्गिस ही जोडी तब्बल १६ चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली. रुपेरी पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रोमँटिक जोडी म्हणून पन्नासच्या दशकामध्ये त्यांचा बोलबाला होता, पण प्रत्यक्ष आयुष्यात नर्गीसने सुनील दत्त सोबत लग्न केले. सुनील दत्त आणि नर्गिस यांनी एकाही चित्रपटात हिरो-हिरॉईनची भूमिका केली नाही. 

दिलीपकुमार-मधुबाला तसेच देव आनंद-सुरैय्या या जोड्या पडद्यावर हिट ठरल्या. वैयक्तिक जीवनात देखील ते परस्परांच्या प्रेमात होते पण ते लग्न करू शकले नाही. दिलीपचे सायरा सोबत लग्न झाले पण रुपेरी पडद्यावर तिचा नायक म्हणून तो काही शोभला नाही. 

पन्नासच्या दशकात आणखी एक जोडी होती शम्मी कपूर आणि गीताबली! 

खरं तर या दोघांचे एकत्रित सहा चित्रपट असले तरी कुठल्याही चित्रपटाला फारसे व्यावसायिक यश मिळालं नव्हतं. पण या दोघांनी लग्न मात्र केले. 

या लग्नाचा मोठा मजेदार किस्सा आहे. पन्नासच्या दशकाच्या मध्यावर जेव्हा गीताबालीचे ॲक्टिंग करिअर शिखरावर होते त्यावेळी शम्मी कपूर अभिनयाच्या दुनियेत हातपाय मारत होता. त्याच्या कुठल्याच सिनेमाला त्यावेळी यश मिळत नव्हते.अपयशी सिनेमाची मोठी रांग त्याच्या नावावर होती.

याच काळात शम्मी कपूर आणि गीताबाली यांनी एका चित्रपटात काम केले. चित्रपट होता केदार शर्मांचा ‘रंगीन राते’. 

या सिनेमाचे आऊटडोअर शूटिंग एप्रिल १९५५ मध्ये राणीखेत इथे होणार होते. सलग वीस दिवसाच्या या शूटिंगच्या दरम्यान शम्मी कपूर आणि गीताबाली यांच्यातील प्रेम फुलले. शम्मी कपूरने गीता बालीकडे आपल्या प्रेमाचा इजहार केला. गीता बालीने देखील शम्मीच्या प्रेमाला स्वीकारले.

मुंबईत आल्यानंतर शम्मीने गीताबाली सोबत लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली. गीता बालीने मात्र त्याला विरोध केला. याची दोन कारणे होती.

एकतर गीता बाली शम्मी कपूर पेक्षा एक वर्षाने मोठी होती. आणि दुसरे कारण म्हणजे तिने शम्मी कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर आणि शम्मी कपूरचे मोठे बंधू राज कपूर यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर नायिकेची भूमिका केली होती. त्यामुळे शम्मी कपूर सोबत लग्न करून कपूर कुटुंबात जाणे तिला थोडे संकोचल्यासारखे वाटत होते.

पण शम्मीकपूरचा मात्र आग्रह कायम होता. प्रत्येक भेटीत तो तिच्याशी लग्नाचा विषय काढत होता.

हा सिलसिला पुढच्या दोन-तीन महिने चालू राहिला. २३ ऑगस्ट १९५५ या दिवशी दुपारी गीता बाली शम्मी कपूरला भेटायला गेली. त्यावेळी शम्मी कपूरचे आई वडील दोघेही भोपाळला गेले होते. राज कपूर शूटिंग मध्ये व्यस्त होते. त्यावेळी पुन्हा शम्मीने गीताकडे लग्नाचा विषय काढला.

त्यादिवशी मात्र गीताबालीने लग्न करायला होकार दिला. फक्त तिने एक अट घातली. ही अट अशी होती की शम्मी कपूरने तिच्या सोबत आजच (म्हणजे त्याच दिवशी!) लग्न करावे.

आता शम्मीला पेच पडला. वडीलधारी मंडळी कोणीच नाही आणि लगेच आत्ता संध्याकाळी लग्न कसे शक्य आहे? असा प्रश्न त्याच्यापुढे पडला. परंतु गीताबाली आपल्या अटीवर  कायम होती. काय करावे?  शम्मी कपूर यांचा मित्र जॉनी वॉकर याने आठ दिवसापूर्वीच (१६ ऑगस्ट १९५५) पळून जाऊन लग्न केले होते. त्याचा सल्ला घेण्याचे ठरवले.

ते दोघे जॉनी वॉकरच्या घरी गेले. जॉनी वॉकरने सांगितले “यार मे मुस्लिम हूं इसलिये मस्जिद गया और निकाह किया. तुम हिंदू हो मंदिर जाओ और शादी करो.” 

त्यानंतर हे दोघे बाणगंगा स्थित एका मंदिरात गेले. तोवर बर्‍यापैकी रात्र झाली होती तिथल्या पुजाऱ्याने सांगितले “मी रात्री तुमचे लग्न लावून देणार नाही. तुम्हाला लग्न करायचे असेल तर उद्या पहाटे चार वाजता इथे या. मी तुमचे लग्न लावून देतो.”

शम्मी कपूर आणि गीता बाली माटुंग्याच्या घरी परतले. रात्री झोप येणे शक्यच नव्हतं. पहाटे तयार होऊन ते घाईघाईने पुन्हा बाणगंगा येथील मंदिरात गेले. तिथल्या भटजी दोघांचे लग्न लावून दिले. दोघांच्या घरचे कुणीही लग्नाला उपस्थित नव्हते. 

पहाटे चार वाजता गडबडीमध्ये शम्मी कपूर सिंदूर आणायचे विसरला. भटजी म्हणाले “आता पत्नीची ‘मांग’ कशाने भरणार?” प्रश्न पडला. गीताबालीने लगेच आपल्या पर्समधून लिपस्टिक काढली आणि शम्मी कपूरच्या हातात दिली, आणि प्रश्न सोडवला!

शम्मी कपूरने गीताबालीची ‘मांग’ चक्क लिपस्टिकने भरली!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.