खरं तर त्याचा राग यायचा पण माणूस भारी होता…

सुटलेलं पोट, सोनेरी केस, सहा फूट असली तरी किरकोळ वाटणारी उंची, पायात चपळता नसली, तरी बोटात असलेली जादू आणि लेग स्पिनच्या जोरावर जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांना नाचवण्याचं कसब शेन वॉर्नकडे होतं. पेस बॉलर्सचं नंदनवन असलेल्या ऑस्ट्रेलियामध्ये वॉर्ननं स्पिन बॉलर्स काय जादू करुन दाखवू शकतात, हे सगळ्या जगाला दाखवून दिलं.

वॉर्नची दहशत फक्त ऑस्ट्रेलियन पिचेसवरच होती असं नाही, तो इंग्लंड, भारत आणि इतर देशांमध्येही तितकाच खुंखार होता. वॉर्ननं काढलेला मायकेल गॅटींगचा बोल्ड, पायामागून उडवलेल्या अँड्र्यू स्ट्रॉसच्या दांड्या आणि आयपीएलच्या पहिल्याच सिझनला नवख्या राजस्थान रॉयल्सला मिळवून दिलेला विजय या गोष्टी कुणी जन्मात विसरणं शक्य नाही.

वॉर्नबद्दल तसं बोलायला बरंच आहे, पण सध्या त्याच्या आणि सचिन तेंडुलकरमधल्या एका लढाईबद्दल बोलू.

सचिन तेंडुलकर म्हणजे कित्येकांसाठी क्रिकेटचा देव. तेंडल्यानं किती केले रे? हा प्रश्न कित्येक जणांच्या ओठांवर मॅचच्या वेळी असायचा म्हणजे असायचाच. त्यात सचिन ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार म्हणजे अगदी खुंखार विषय. त्यात सचिन फॉर्मात असला, की ती मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध सचिन अशीच व्हायची. सचिनला भारी पडतील असे दोन भिडू ऑस्ट्रेलियाकडे होते, एक ग्लेन मॅकग्रा आणि दुसरा म्हणजे शेन वॉर्न.

सचिन आऊट झाला की अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता स्वतःच पॅव्हेलियनकडे निघायचा. पण आऊट होताना सचिन स्वतःवर निराश झालाय असं चित्र फार कमी वेळा मिळायचं. त्यानं विकेट फेकली की त्याला चूक उमगायची त्यामुळं तो हसत हसत जायचा, त्याला निराश करायचं काम करणारा कार्यकर्ता म्हणजे शेन वॉर्न.

तर ही लढाई आहे १९९८ ची. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान चेन्नईत टेस्ट मॅच सुरु होती. सगळ्या जगाचं लक्ष सचिनवर लागलेलं, चेन्नईचं पिच तसं बॅटिंग फ्रेंडली त्यामुळं तेंडल्या राडा घालणार यावर कित्येकांनी पैजा लावलेल्या. सचिन बॅटिंगला आला, समोर होता शेन वॉर्न.

शुक्रवारच्या दिवशी पोटात दुखतंय म्हणून शाळेला आणि लांबचं नातेवाईक मारुन ऑफिसला लय लोकांनी सुट्टी मारलेली. त्यामुळं तेंडल्यानं मोठा धमाका करावा असं प्रत्येकालाच वाटत होतं. त्यात तेंडल्यानं पहिल्याच बॉलला फोर मारली. मैदानातली गॅंग ‘सचिन… सचिन….’ ओरडत उभी राहिली, इकडं घरात पण परिस्थिती वेगळी नव्हती. आई बापाच्या शिव्या पडल्या तरी चालतील, पण सचिनला सपोर्ट थांबला नाही पाहिजे…

लगेचच शेन वॉर्ननं आपल्या टिपिकल स्टाईलमध्ये जाळं विणलं. सचिन उत्साहात मिड-ऑनला खेळायला गेला, पण जाळं परफेक्ट होतं. मार्क टेलरनं कॅच धरला आणि भारताचा देव मासा अलगद जाळ्यात अडकला. सचिन फक्त चार रन करुन आऊट झाला, टीव्ही बंद. सगळ्या दिवसाचा उत्साह वॉर्ननं एका बॉलमध्ये घालवून टाकला होता.

दिवसभर घरात बसून राहावं लागलं, पण टीव्ही लावता आला नाय, त्यादिवशी शप्पथ वॉर्नचा लय घाण राग आला.

सचिनची परिस्थितीही काय वेगळी नव्हती, व्हीव्हीएस लक्ष्मण सांगतो, ”ड्रेसिंग रुममध्ये आल्यावर सचिननं स्वतःला फिजिओच्या रुममध्ये बंद करुन घेतलं. बाकीच्या खेळाडूंनी बाहेरुन कितीही दार वाजवलं , तरी गडी दार उघडेना. जेव्हा सचिन बाहेर आला तेव्हा रडून, रडून त्याचे डोळे लाल झालेले. आपण अशा पद्धतीनं आऊट झालो यामुळं सचिन लय निराश झालेला.”

पुढं जाऊन त्याच टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सचिननं नॉटआऊट १५५ रन्स चोपले. वॉर्न सोडा सगळ्या ऑस्ट्रेलियन टीमला तो आऊट झाला नाही. त्याच्या पुढच्या वर्षी त्यानं शारजामध्ये वॉर्नची बेक्कार धुलाई केली. इतकी, की वॉर्न म्हणालेला, ‘सचिन माझ्या स्वप्नात येतो…’

क्रिकेटमध्ये गोष्टी बदलत असतात, एक गोष्ट मात्र बदलली नाही… वॉर्नचा आलेला राग. त्यादिवशी त्यानं सचिनला आऊट केलं नसतं, तर सुट्टीचं सार्थक झालं असतं… त्यानं २००८ च्या आयपीएल फायनलला सिंगल काढली नसती, तर धोनीनं पहिली आयपीएल जिंकली असती… लय गोष्टी घडल्या असत्या… पण जर तरला अर्थ नसतो हेच खरं.

शेन वॉर्ननं हृदयविकाराच्या झटक्यामुळं आज जगाला अलविदा केला… अटॅकची गुगली वॉर्नला पण झेपली नाही बहुतेक…

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.