त्या दिवशी पवारांनी फक्त एकाच्या नाही दोघांच्या स्वप्नांचा चक्काचुर केलेला…

23 नोव्हेंबर 2019 ची पहाट. या दिवशी महाविकास आघाडीच्या चर्चांना पहिला ब्रेक लागला, कारणही तसच होतं. या दिवशीच मी पुन्हा येईल म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे नेते होते अजितदादा पवार… 

आत्ता पुढचे पाच वर्ष भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचं सरकार सत्तेत राहणार असं चित्र सर्वत्र निर्माण झालं होतं. पण पुढच्या दोनच तासात शरद पवारांनी सर्व सुत्र आपल्या हाती घेतली. पुढच्या 80 तासात अजित पवार माघारी फिरले आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.. 

मी पुन्हा येईल हा कॉन्फिडन्स असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न त्या 80 तासातच चक्काचूर झालं… 

पण पवारांनी त्या घडामोडींमध्ये फक्त एकाच व्यक्तीच्या मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाचा चक्काचूर केला होता का? तर नाही.. अजून एक व्यक्ती होता ज्याचा या महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या घडामोडीत मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आणि ती व्यक्ती होती… 

एकनाथ शिंदे…

पहाटेचा शपथविधी पार पडला त्या दिवसाच्या बरोबर १२ दिवसांपूर्वीची गोष्ट. या दिवशी सर्वात पहिल्यांदा एकनाथ शिंदेंचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आलं होतं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचं पहिल्या फळीतलं नाव. ठाणे ही त्यांची कर्मभूमी. तर पश्चिम महाराष्ट्राच्या साताऱ्याचं जन्मभूमी म्हणून कनेक्शन. त्यातही ‘मराठा’ हा राजकारणातला सर्वात सोयीचा जात फॅक्टर.. 

सेनेसाठी शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री असा तळातून प्रवास करून वरती आलेला एकनिष्ठ चेहरा, सर्वच बाजूंनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य चेहरा होते.. 

तारिख होती 11 नोव्हेंबर 2019. या दिवशी वांद्रेच्या ताज लॅड्स एंड हॉटेलमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवारांची भेट झाली. या बैठकीत अजित पवार, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील असे राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित होते. याच बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने किमान समान कार्यक्रमावर एकत्र येवून सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवली. 

‘आमचं ठरलंय’ची घोषणा देण्यात आली आणि बैठकीची सांगता झाली. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद जाईल याचाही निर्णय झाला. पण एका महत्वाच्या गोष्टीवर निर्णय झाला नव्हता, आणि तो म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार?

बैठक आटोपल्यानंतर लिफ्टमधून खाली येताना शरद पवारांनी संजय राऊत यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदावर कोण? हा विषय छेडला. शरद पवार म्हणाले, आपण मिळून सत्ता स्थापन करतोय, पण मुख्यमंत्री कोणाला करायचं याचा विचार केलाय का?

राऊतांनी त्या पूर्वीच आदित्य ठाकरेंचं नाव सुचवलं होतं. पण आदित्य ठाकरेंच्या वयाचा मुद्दा समोर करत त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार आणि इतर जेष्ठ नेते काम करू शकणार नाहीत असं शरद पवारांनी ठामपणे सांगितलं.. 

त्यानंतर नाव आलं ते एकनाथ शिंदे यांचं..

एकनाथ शिंदे हे सर्वांथाने शिवसेनेसाठी योग्य चेहरा होते. पण एकनाथ शिंदेंचं नाव ऐकताच पवारांचं उत्तर होतं, 

आम्हाला हे नाव मान्य नाही… 

पवारांच्या एका वाक्यात एकनाथ शिंदेचा पत्ता कट झाला.. त्यानंतर पवारांनी थेट उद्धव ठाकरेंचं नाव सुचवलं. नाही हो करत आदित्य ठाकरेंच्या शब्दासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं… 

पण या गोष्टीत एकनाथ शिंदेचा पत्ता कायमचा कट झाला. कारण उद्धव ठाकरे हे कधीच निवडणूकीच्या राजकारणात नव्हते. त्यामुळे काहीही झालं तर सेनेच्या निवडणूकीच्या राजकारणात एकनाथ शिंदे हेच क्रमांक एकचे नेते होते. यापूर्वी भाजप आणि सेनेत अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला यशस्वी झाला असता तरी त्यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद जाईल, अशी आशा होती. 

पण राजकारणात सेनेनं भाजपची साथ सोडली. महाविकास आघाडीच्या स्थापनेत आपला नंबर लागेल असा विश्वास असताना उद्धव ठाकरे बाजी मारून गेले आणि पहाटेच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीच्या गोटातून गेलेले आमदार एकनाथ शिंदे एकनिष्ठपणे परत आणताना दिसले. 

पुढं याच एकनाथ शिंदेंनी बंड करत मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि आता शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले, शरद पवारांचे पुतणे अजित पवार…

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.