या ४ कारणांमुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती, राज्याचं राजकारण बदलू शकते…

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू शिवसेना आहे. एकनाथ शिंदेंचं बंड, त्यानंतर पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह यावरुन सुरू असलेला वाद या सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना महाविकास आघाडीचा भाग असणार की नाही ? याबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेनेला नवा राजकीय मित्र मिळालाय तो संभाजी ब्रिगेडच्या रुपानं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यापुढे युती म्हणून काम करतील अशी घोषणा केली. साहजिकच या नव्या युतीमुळे राज्यातली राजकीय समीकरणं कशी बदलतील, हेच जाणून घेऊयात.

सगळ्यात आधी जाणून घेऊयात संभाजी ब्रिगेडबद्दल. सप्टेंबर १९९० मध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली. याअंतर्गत वेगवेगळे विभाग तयार करण्यात आले, यातला तरुणांसाठीचा विभाग म्हणजेच संभाजी ब्रिगेड. विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यामुळं संभाजी ब्रिगेड चर्चेत होतीच.

मात्र ही संघटना मोठ्या प्रमाणावर प्रकाशझोतात आली, ती जेम्स लेन प्रकरणात पुण्यातल्या भांडारकर प्राचविद्या संस्थेमध्ये केलेल्या तोडफोडीनंतर. त्यानंतरही दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यावरुन संभाजी ब्रिगेड सतत चर्चेत राहिली.

नोव्हेंबर २०१६ मध्ये संभाजी ब्रिगेडची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाली. १०० टक्के समाजकारण आणि १०० टक्के राजकारण अशी भूमिका त्यावेळी संभाजी ब्रिगेडनं घेतली होती. मात्र राजकीय पक्षात नोंदणी होण्यावरुन संभाजी ब्रिगेडमध्ये दोन गट पडले.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हे राजकीय पक्षाचेही अध्यक्ष झाले, तर प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या सामाजिक संघटनेतून आपलं काम सुरू ठेवलं.

राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाल्यानंतर ३ महिन्यांतच संभाजी ब्रिगेडनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांमधून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुकाही पक्षानं लढवल्या.

या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

‘फक्त तीन महिन्यात मुंबई निवडणुकांमध्ये आम्ही पक्षाचे ३२ आणि १० पुरस्कृत असे ४२ उमेदवार उभे केले होते. तेव्हा पक्षाची मुंबईत बांधणी झाली नव्हती, तरी काही ठिकाणी आमचे उमेदवार तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये जवळपास ४० ठिकाणी उमेदवार उभे केले होते, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी संभाजी ब्रिगेडचा थोड्या मतांनीच पराभव झाला.

आगामी निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे, या नव्या युतीमुळं नक्कीच परिवर्तन घडेल.’

पण या नव्या युतीमुळं राज्याच्या राजकारणावर कसा फरक पडेल ? 

तर पहिला मुद्दा म्हणजे मराठा राजकारण. 

संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन झालेला वाद, मराठा समाजाच्या मुक मोर्चावर मुका मोर्चा अशी टिपण्णी करणारं व्यंगचित्र यामुळं शिवसेनेवर मराठा विरोधी असल्याचा आरोप कायम होत असतो. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा समाजावर ठसा असणाऱ्या नेत्यानं सेनेशी फारकत घेतली आहे, अशावेळी मराठा समाजात लोकप्रिय असणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी युती करत शिवसेना डॅमेज कंट्रोल करतेय का अशी चर्चा आहे.

संभाजी ब्रिगेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा तरुणांचा भरणा आहे, राजकीय पक्ष म्हणून फारसा प्रभाव नसला, तरी मराठा तरुणांच्या संघटनाच्या जोरावर संभाजी ब्रिगेड शिवसेनेला अप्परहँड मिळवून देऊ शकते. महाविकास आघाडीचा भाग झाल्यानंतर शिवसेनेनं काहीसं सॉफ्ट हिंदुत्व अंगीकारलं.

त्याचवेळी भाजप, मनसे आणि आता शिंदे गट यांनी प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा राबवला. सोबतच विनायक मेटे यांच्या निधनामुळंही मराठा समाज एका नेतृत्वाला मुकला आहे. त्यामुळं मराठा राजकारणाची पॉलिटिकल स्पेस कॅप्चर करण्याचा प्रयत्न शिवसेना या युतीच्या माध्यमातून करेल, असंही सांगण्यात येतंय. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, शेतकरी कर्जमाफी अशा लोकप्रिय निर्णयांचा सपाटा लावणारं शिंदे-फडणवीस सरकार मराठा आरक्षणासाठीही प्रयत्नशील आहे. त्यांनी याबाबतीत निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणावर मराठा मतं त्यांच्या बाजूनं वळू शकतात, अशावेळी शिवसेनेला संभाजी ब्रिगेडची साथ असणं महत्त्वाचं ठरेल.

दुसरा मुद्दा म्हणजे आक्रमकता. 

सुरुवातीच्या दिवसांपासून शिवसेना हा आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो. बाळासाहेबांच्या भाषणानंतर दाक्षिणात्य लोकांच्या व्यवसायावर होणारे हल्ले असतील किंवा शिवसेना सोडल्यावर छगन भुजबळ यांच्यावर झालेला हल्ला असेल, शिवसेना अनेकदा राड्यांसाठीच ओळखली गेली. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं होतं. 

पावसाळी अधिवेशनात झालेल्या धक्काबुक्कीनंतर शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनी, ‘ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार आम्हीच धक्काबुक्की केली. आमच्या नादाला लागू नका, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ.’ असं विधान केलं. थोडक्यात शिंदे गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असताना, अशाच आक्रमकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या संभाजी ब्रिगेडची शिवसेनेला निश्चितच मदत होईल. 

याआधी जेम्स लेन प्रकरण असेल, रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याचा मुद्दा असेल संभाजी ब्रिगेडनं आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलंय. सध्याही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि आपल्याच बंडखोरांना रोखण्यासाठी शिवसेनेला अशाच मित्राची गरज आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस सध्या शिवसेनेसोबत असले, तरी ते सेना स्टाईल राड्यांसाठी प्रसिद्ध नाहीत. त्यामुळं शिवसेना या नव्या मित्रामुळं पुन्हा आपल्या आक्रमक रूपात दिसू शकतं अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

तिसरा मुद्दा म्हणजे, बालेकिल्ल्यांवर पुन्हा वर्चस्व मिळवणं.

एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं शिवसेनेच्या मुंबई, ठाणे, कोकण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा या बालेकिल्ल्यांना सुरुंग लागला. मराठवाड्यातले तब्बल ९ आमदार शिंदे गटात आहेत. त्यामुळं मराठवाड्यात शिवसेनेला जोरदार कमबॅक करणं गरजेचं आहे.

पक्षाध्यक्ष मनोज आखरे सांगतात की, ‘संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागावर आणि विशेषतः मराठवाड्यात चांगला होल्ड आहे. सोबतच मुंबईतही संभाजी ब्रिगेड पक्षबांधणीवर विशेष लक्ष देतंय. मुंबईत जिल्हाध्यक्ष, विभागाध्यक्ष नेमलेले आहेत आणि प्रत्येक वॉर्डात संघटना उभी करण्यावरही भर दिला जातोय.’ 

त्यामुळं मराठवाड्यात तयार झालेला बॅकलॉग आणि मुंबई महानगरपालिकेत सत्ता राखण्याचं मोठं आव्हान, या गोष्टींमध्ये शिवसेनेला संभाजी ब्रिगेड मोलाची मदत करु शकतं.

चौथा मुद्दा म्हणजे कॉमन विरोधकांसमोर उभी राहणारी ताकद

मे २०२२ मध्ये उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना, ‘तुमचा आणि भगव्या टोप्यांचा संबंध काय? आहे तर मग संघाची टोपी काळी कशी? संघाचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय?’ अशी टीका केली होती. संभाजी ब्रिगेडशी युतीची घोषणा करतानाही त्यांनी, ‘भाजप संघाचे विचार मानतं का ? आमचं हिंदुत्व पटल्याने आम्ही एकत्र येत आहोत.’ असं वक्तव्य केलंय.

२००५ मध्ये एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानं संरसंघचालक के. एस. सुदर्शन यांना चप्पल फेकून मारली होती, त्यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडतर्फे त्या कार्यकर्त्याचा शिवक्रांतिवीर असा किताब देत सत्कार केला होता, तेव्हा संघ विरुद्ध संभाजी ब्रिगेड असं वातावरण तयार झालं होतं. 

बाबासाहेब पुरंदरे, जेम्स लेन आणि दादोजी कोंडदेव प्रकरणामुळेही या दोघांमध्ये ठिणगी पडली होती. त्यामुळं आता एकाच ग्राऊंडवर येत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड हे दोन्ही पक्ष भाजप आणि त्यांची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकत्रित ताकद लावून विरोध करताना दिसतील.

युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्षाचे एकत्रित मेळावे होतील असं जाहीर केलं आहे. सध्या आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेद्वारे संपर्क साधतायत. उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौरा करतील असंही सांगण्यात येतंय. अशातच आता या दोन्ही पक्षांचे एकत्रित मेळावे बंडखोर आमदारांविरोधात रान उठवण्यात आणि शिवसेनेला सहानुभूतीसोबतच मतं मिळवून देण्यात गेमचेंजर ठरतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

आणखी एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण देण्यावरुन संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं होतं, त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. मात्र शिवसेनेनं कायम बाबासाहेब पुरंदरेंना पाठिंबा दिला होता, त्यांच्या लेखनाचा पुरस्कारही केला होता. 

त्यामुळं अशा काही मुद्द्यांवर एकमत कसं होणार ? आणि जागावाटपाचा आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कसा ठरणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. सध्यातरी अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या शिवसेनेला नवा मित्र मिळाल्याचा आनंद असेल, फक्त हा नवा मित्र निवडणुकीच्या आणि पक्षबांधणीच्या राजकारणात काय भूमिका पार पाडणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.