शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिल्याच वर्षात बंडखोरी झाली, हा होता इतिहासातला पहिला बंडखोर..

सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह सुरत गाठत बंड केलं. दिवंगत ज्येष्ठ शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पट्टशिष्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदेंचं बंड हा राजकीय वर्तुळासाठी मोठा धक्का ठरलाय.

आतापर्यंतच्या काळात शिवसेनेनं अनेक बंड पाहिली आहेत, मोडली आहेत आणि त्यातून सेना पुढंही गेली आहे. जेव्हा छगन भुजबळ यांनी बंड करुन शिवसेना सोडली होती तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ले केले होते. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतरही असाच प्रकार घडला होता. तर राज ठाकरेंनी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती, तेव्हा मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यात झालेले राडेही सर्वश्रुत आहेत.

शिवसैनिक बंडखोरांबाबत आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया देतात याच्या इतिहासात अनेक नोंदी आहेत. आता एकनाथ शिंदेंच्या या बंडानंतर सैनिक कशी प्रतिक्रिया देतात? ठाण्यात काय घडतं? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सेनेचे पहिले बंडखोर कोण होते, त्यांच्या मागण्या काय होत्या आणि शिवसैनिकांनी हे बंड कसं मोडलं, त्याचाच हा किस्सा.

१९६० मध्ये बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिकची सुरुवात केली. बाळासाहेबांच्या कुंचल्यातून राजकीय परिस्थितीवर फटकारे मारले जात होते. त्यात १९६६ मध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यांच्या आक्रमक कार्यशैलीला अनुकूल असं राजकीय व्यासपीठ तयार झालं.

प्रबोधनकारांचा पाठिंबा आणि मोजक्या सहकाऱ्यांच्या साथीनं बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पहिल्याच दसरा मेळाव्यात बाळासाहेंबांची तोफ धडाडली. मोठ्या प्रमाणात तरुण मुलं सेनेकडे आकर्षित झाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पक्षावर आपलं एकहाती नेतृत्व प्रस्थापित केलं होतं. त्यांच्या साथीला माधव देशपांडे, प्रा. स. अ. रानडे, बळवंत मंत्री इत्यादी सहकारी होते.

तेव्हा मार्मिकचं ऑफिस प्रबोधनकारांच्या दादरच्या ‘कदम मॅन्शन’मधल्या घरातच होती. याच घराबाहेर शिवसैनिकही असायचे. तेव्हा बाळासाहेब हे शिवसेनेतलं सर्वोच्च नेतृत्व होतं. त्यांच्या खालोखाल मान मिळायचा तो बळवंत मंत्री यांना. सेनेची स्थापना झाल्यानंतर वर्षभरातच ते सेनेतले दुसऱ्या क्रमांकांचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.

३० ऑक्टोबर १९६६ ला शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात जी काही मोजकी भाषणं झाली, त्यात बळवंत मंत्री यांनीही भाषण केलं होतं. बळवंत मंत्री हे तेव्हा मार्मिक ऑफिसमधल्या ‘खलबतखान्या’त असायचे. विशेष म्हणजे या खलबतखान्यात प्रबोधनकार ठाकरे असायचे.

१९६७ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र सेनेच्या गोटात काहीशी खळबळ उडवणारी गोष्ट घडली.

शिवसेनेत बाळासाहेबांची एकहाती हुकूमत चालायची आणि त्याविरुद्ध मंत्री यांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. त्याच दरम्यान दादरच्या छबिलदास शाळेसमोरच्या वनमाळी हॉलमध्ये सेनेची सभा होणार होती.

या सभेत ‘सेनेत लोकशाही असायला हवी’ अशी मागणी मंत्री करणार आहेत, ही बातमी मार्मिकच्या ऑफिसवर असणाऱ्या शिवसैनिकांना मिळाली. पहिल्यांदाच कोणीतरी बाळासाहेबांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं होतं. साहजिकच खवळलेल्या शिवसैनिकांनी मंत्रींचं हे बंड मोडून काढायचं ठरवलं आणि दादरमधली ही सभा उधळून लावली.

पण शिवसैनिक यावरच थांबले नाहीत, त्यांनी मंत्री यांचे कपडे फाडले. छबिलदास शाळेपासून कदम मॅन्शनमधल्या मार्मिकच्या ऑफिसपर्यंत त्यांची धिंड काढण्यात आली. मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमले होते, त्यांनी मंत्री यांना बाळासाहेबांच्या पायावर टाकलं आणि त्यांची माफी मागायला लावली.

या घटनेमुळं तीन गोष्टी झाल्या, मंत्री यांनी तातडीनं शिवसेनेचा राजीनामा दिला. शिवसेनेत बाळासाहेबांच्या नेतृत्वाला आव्हान निर्माण होऊ शकत नाही, हा संदेश सर्वांपर्यंत गेला आणि शिवसैनिक बंडखोरांबाबत काय प्रतिक्रिया देऊ शकतात, याचाही सगळ्यांना अंदाज आला.

यानंतरही शिवसैनिकांनी असे अनेक राडे केले, ज्यांची वारंवार चर्चा होते. त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.