संसार दाखवणारी एकता कपूर हनीमूनच्या डीप विषयात कशी घुसली

अचानक सासू सूनेच्या टिपिकल मालिकांवरून एकता कपूरचा फोकस कसा हलला?
साधारण घरांमध्ये टीव्हीचा रिमोट घरातल्या बायकांकडे असतो. संध्याकाळची वेळ झाली रिमोट हातात येतो आणि सुरु होतात मालिका. सगळ्यांची स्टोरी साधारण सेमच असते. एक साधी सरळ गरीब बिचारी सून आणि तिला छळ छळ छळणारी सासू.

चला आत्ता काहीसं चित्र वेगळं असेल २००० चा जमाना तर अशाच टिपिकल सास बहू ड्रामाने भरलेला होता. आणि मालिका होती क्यूँकी सास भी कभी बहू थी. त्याचं ते फेमस शीर्षकगीत वाजायला लागलं की बायका हातातली कामं सोडून टीव्हीसमोर बसायच्या. या आणि अशा अनेक मालिकांचं वेड गृहिणींना जिने लावलं ती होती एकता कपूर.

सध्या एकताला सुप्रीम कोर्टाने तिच्या XXX या वेबसिरीजमधल्या एका आक्षेपार्ह सिनवरून चांगलंच धारेवर धरलंय.

एकेकाळची डेली सोप क्वीन अचानक हा असा ऍडल्ट कनेटन्ट का बनवतेय आणि त्यासाठी तिला थेट सर्वोच्च न्यायालयाकडून बोलणी का ऐकावी लागत आहेत असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.

त्यासाठी आधी हे प्रकरण काय आहे ते समजून घ्यावं लागेल. तर एकेकाळी जिने टीव्हीचं मालिका जग हादरवून सोडलं ती एकता सध्या मालिका सोडून बराच ऍडल्ट कन्टेन्ट बनवताना दिसतेय. तिच्या एका वेबसिरीजमधल्या एका सीन विरोधात ६ जून २०२० ला माजी सैनिक शंभू कुमार यांनी सीजीएम कोर्टात तक्रार दाखल केली.

एकता कपूरचा Alt बालाजी हा ओटीटी प्लॅटफॉर्म त्याच्या ऍडल्ट कन्टेन्ट साठी प्रसिद्ध आहे.

याच प्लॅटफॉर्मवरच्या XXX वेबसिरीजमध्ये असलेल्या एका सीनविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली. त्यात बेगुसरायचे न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या कोर्टाने वारंट जारी केला. त्यावर एकता कपूरने सुप्रीम कोर्टात दाद मागितली.

यावर सुप्रीम कोर्टाने एकताला

‘देशातल्या तरुणाईची मानसिकता तुम्ही दूषित करताय’

अशा शब्दात झापलं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हा सर्वांसाठी खुला आहे पण तुम्ही तरुणाईला कोणता पर्याय देताय? अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने एकताची शाळा घेतली आहे. तसंच अशा याचिका दाखल करण्यासाठी तिला दंड होऊ शकतो असं सुद्धा कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे.

आता एकताचं सिरिलमध्ये बरं काय उत्तम चाललं होतं मग अचानक तिला हा ऍडल्ट कन्टेन्ट करायचं कसं काय सुचलं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याकडे येण्याआधी ती मालिकांकडे कशी आली ते ही जाणून घेऊ.

एकता कपूरने वयाच्या १५ व्या वर्षी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या जाहिरात आणि सिनेमा कंपनीत तिने काम करायला सुरुवात केलं. एकता ही प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची मुलगी. तिच्या आईचं नाव शोभा कपूर. १९९४ साली तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आणि बालाजी टेलिफिल्म्स नावाने आपली स्वतःची कंपनी सुरु केली. सध्या तिची आई आणि ती ही कंपनी सांभाळतात.

एकताच्या प्रॉडक्शन हाऊसमधून तिनेच दिग्दर्शित केलेली विनोदी मालिका ‘हम पांच’ प्रचंड गाजली.

अगदी यातून विद्या बालनने सुद्धा आपला प्रवास सुरु केला होता. याचा पहिला सीजन १९९५-९७ दरम्यान आला तर दुसरा सीजन १९९८ मध्ये आला आणि दोन्हीही हिट ठरले. यानंतर आली २००० सालची क्यूँकी सास भी कभी बहू थी ही मालिका. बघता बघता १०.३० वाजता घराघरातून ‘रिश्तों के भी रूप बदलते है’ गाणं ऐकू यायचं. यामध्ये तुलसी विरानी मिहीर विरानी आणि त्यांचं कुटुंब यांची गोष्ट दाखवली होती.

या मालिकेचे १८३३ भाग टेलिकास्ट झाले आणि तब्बल ८ वर्ष ही मालिका सुरु होती. यामध्ये तुलसीची भूमिका साकारली केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी. त्या दोघींचं कनेक्शन आणि कामामधला समतोल एवढा जबरदस्त होता की आठ वर्ष प्रेक्षकवर्ग मालिकेला खिळून राहिला. त्याच काळात कहानी घर घर की मालिका सुरु होती.

नंतर कुमकुम, काव्यांजलि, कैसा ये प्यार है, कहीं किसी रोज, कसौटी जिंदगी के अशा अनेक सुपरहिट मालिका तिने दिल्या.

सध्याच्या काळात बघितलं तर पवित्र रिश्ता, यह है मोहब्बते, बडे अच्छे लगते है या मालिका खूप गाजल्या. तिला परफेक्ट कळलं होतं की प्रेक्षकांना काय बघायचंय आणि तेच ती सातत्याने दाखवत होती. भले त्याला टिपिकल म्हटलं गेलं पण एकताला तिचे पत्ते बरोबर माहित होते.

एकताने टीव्ही क्षेत्रात आपलं साम्रज्य उभं केलं. हिंदीसह इतर भाषांमध्ये सुद्धा तिने मालिका बनवल्या ज्या बऱ्याच गाजल्या. तिच्या नावावर आत्तापर्यन्त १३० मालिका आहेत. हळूहळू एकता सिनेमा क्षेत्रात आली.

२००१ मध्ये तिने क्योंकी मै झूट नही बोलता या सुश्मिता सेन- गोविंदा ही जोडी असलेल्या सिनेमाची निर्मिती केली.

पुढे रागिणी एमएमएस, लव्ह सेक्स और धोखा, द डर्टी पिक्चर, शूटआऊट एट लोखंडवाला या अशा अनेक सिनेमांची निर्मिती केली. यामध्ये ऍडल्ट कंटेन्ट देण्यास एकटा कपूरने सुरवात केली होती. त्यातच बडे अच्छे लागते है मध्येसुद्धा एकता कपूरने एक हॉट किसिंग दाखवत टीव्ही क्षेत्रात मोठं वादळ उठवून दिलं होतं.

तोवर अडल्ट कन्टेन्ट मार्केटमध्ये जमवत होता आणि एकता कपूरनेसुद्धा या कन्टेन्टमध्ये बिझनेससाठी सुवर्णसंधी असल्याचं ओळखलं.

तिने निर्मिती केलेल्या अनेक सिनेमात बोल्ड टच होता आणि तिला तो टीव्ही क्षेत्रात दाखवायचा नव्हता. तिने एका मुलाखतीत ती टीव्हीवर कधीच बोल्ड आणि अडल्ट कन्टेन्ट दाखवणार नाही असं म्हटलं होतं. पण तिला हा कन्टेन्ट दाखवायला एक प्लॅटफॉर्म हवा होता आणि त्यामुळे २०१७ साली alt बालाजी ची स्थापना झाली. केन घोष यांच्या XXX सिनेमाची निर्मिती एकता करत होती पण त्याला सेन्सर बोर्डाने दिलेली प्रतिक्रिया बघून एकता आता अशा ऍडल्ट कनेटन्ट साठी वेब क्षेत्रात वळत असल्याचं सांगण्यात आलं होतं.

एकता ऍडल्ट कन्टेन्टच्या क्षेत्रात आली आणि तिथेही तिने आपली छाप सोडायला सुरुवात केली.

आता नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईमच्या रेसमध्ये अजून एक ott platform सुरु करणं म्हणजे रिस्क आहे असा प्रश्न समजा त्याला यश नाही मिळालं तर बुडीत खातं होणार. पण एकताला माहित होतं लोक पैसे देऊन तिच्या सास-बहू मालिका ओटीटी वर बघणार नाहीये. म्हणून तिने स्वतःचा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म आणला ज्याचं लक्ष होतं काहीसा बोल्ड कन्टेन्ट देणं.

तिच लक्ष होतं थ्री टायर शहरं आणि लोअर मिडलक्लास प्रेक्षकवर्ग. मालिकांमध्ये तिने घरातल्या गृहिणींना आकर्षित केलं आणि बोल्ड कन्टेन्टने तरुणाईला. अगदी तरुणाई नाही पण बोल्ड म्हणलं की त्याचा शौक असलेले अनेकजण सगळीकडेच असतात. आणि कोव्हीडमध्ये तर तिचा हा प्लॅन चांगलाच यशस्वी झाला.

 Alt बालाजीचा सबस्क्राईबर बेस हा ३ मिलियनचा आहे आणि सरासरी प्रत्येक युजरमागे रेव्हेन्यू हा १३० रुपये आहे.

त्यांच ३ महिन्याचं सबस्क्रीप्शन १०० रुपये आहे आणि वर्षाचं ३००. मिडीयम या वेबसाईटच्या एका लेखात असं सांगितलं आहे की २०१९ संपेपर्यंत Alt बालाजीचे २५ मिलियन सबस्क्राईबर होते आणि त्यांचा वर्षाचा रेव्हेन्यू ४१.९ कोटी होता. कोव्हीडच्या काळात हा कर्म जास्तीच चढता राहिला.

एकता तिच्या या प्लॅटफॉर्ममुळे बऱ्याचदा चर्चेत राहिली. तिचा Alt बालाजीवरचा लॉक अप हा रिऍलिटी शो अनेक कारणांनी गाजला. त्या शो ची अँकर होती कंगना रनौत आणि त्यात भाग घेतलेले सदस्य सुद्धा कॉन्ट्रोव्हर्शियल होते. तिने तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये २०१५ साली एक न्यूडिटी क्लॉज नावाची संकल्पनेशी ओळख करून दिली.

XXX सिनेमा यायच्या आधी तिने यावर कलाकारांकडून कॉन्ट्रॅक्ट करून घेतल्याचं सांगण्यात आलं होतं.

यानुसार कलाकारांना न्यूड सीन करण्यात हरकत नसावी आणि हा क्लॉज स्वीकारल्यावर त्यांना असे सीन देण्यास नकार देता येणार नाही असं म्हटलं होतं. तिची सध्याची कॉंट्रोव्हर्सी सुद्धा बरीच गाजताना दिसतेय.

तिच्या XXX  वेबसिरीजमध्ये तिने सैनिकांच्या पत्नीचं दाखवलेलं चित्र प्रेक्षकांना पटलेलं नसल्याचं दिसतंय. सैनिक सीमेवर लढत असताना त्यांच्या पत्नी घरी परपुरुषांसोबत असतात असं यात दाखवण्यात आलंय जे काही प्रेक्षकांना खटकल्याचं बघायला मिळालंय

त्यामुळे ऍडल्ट कंटेन्ट दाखवून गोत्यात आल्यानंतर एकता कपूर अशा कंटेण्टला चाप लावणार की या निगेटिव्ह पब्लिसिटीचा उपयोग करून ती अजून असला कंटेन्ट वाढवणार येणाऱ्या काळात कळेलच.

Leave A Reply

Your email address will not be published.