सौरव गांगुलीच्या त्या एका हट्टामुळंच भारताला ऑस्ट्रेलियाचा माज मोडणं शक्य झालं होतं…

भारतीय टीम मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकली होती, आपली अवस्था कुणीही यावं टिचकी मारून जावं अशी झाली होती, सचिन तेंडुलकरच्या खांद्यांवर कॅप्टन्सी ओझं टाकण्यात आलं, मात्र त्यानं लवकरच राजीनामा दिला होता. त्यामुळं पुढं काय यावर मोठं प्रश्नचिन्ह होतं.

मग कॅप्टन्सीची सूत्रं देण्यात आली, सौरव गांगुलीकडे. गांगुलीबद्दल क्रिकेटच्या वर्तुळात बरीच चर्चा होती. म्हणजे त्याचं रुबाबात वागणं, ड्रिंक्स न्यायला दिलेला नकार अशा अनेक गोष्टी कायम चघळल्या जायच्या. पण दादानं आपलं क्रिकेटमधलं कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केलं होतं.

२००१ मध्ये मात्र दादाकडून भारताची कॅप्टन्सी जाणार याची चर्चा सुरू झाली होती कारण त्यानं थेट भारताच्या सिलेक्टर्स सोबतच राडा केला होता. आता भारताच्या निवड समितीत एका प्लेअरच्या निवडीवरुन काय काय होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिलीप वेंगसरकर. त्यांच्याबाबतचा किस्सा बोल भिडूनं लिहून ठेवलेला आहे. जो तुम्ही खालच्या लिंकवर क्लिक करुन वाचू शकता.

कोहलीला संघात घेतल्यामुळं मराठमोळ्या वेंगसरकरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता…

गांगुलीचं भांडण झालेलं सिलेक्टर्ससोबत आणि त्याला पार्श्वभूमी होती २००१ च्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीची.

झालं असं होतं की, या प्रचंड महत्त्वाच्या सिरीज आधीच भारताचा हुकमी स्पिनर अनिल कुंबळे जखमी झाला होता. त्यामुळं त्याच्याजागी कुणाची वर्णी लागणार हा महत्त्वाचा प्रश्न होता. तेव्हाच्या सिलेक्टर्सचं म्हणणं होतं की, ‘सरणदीप सिंगला संघात घ्यायला हवं.’ गांगुलीचा मात्र याला स्पष्ट नकार होता.

दादाच्या डोक्यात होता हरभजन सिंग. हरभजनकडे फारसा अनुभव नव्हता आणि त्यात समोर ऑस्ट्रेलियन टीम होती, मात्र तरीही दादा हरभजनवर अडून राहिला. त्यानं सिलेक्टर्सला स्पष्ट शब्दात सांगितलं,

”जोवर हरभजन सिंग टीममध्ये येणार नाही, तोवर मी या रुममधून बाहेर जाणार नाही.”

सिलेक्टर्सनं काही वेळ लाऊन धरलं, पण गांगुली काय ऐकायला तयार नव्हता. त्यामुळं त्यांनी हरभजनला मेन स्पिनर म्हणून टीममध्ये घेतलं. मात्र दुसऱ्या बाजूला गांगुलीनं एक धोकाही पत्करला होता. जर हरभजन या सिरीजमध्ये फेल गेला असता, तर गांगुलीच्या कॅप्टन्सीवर कुऱ्हाड नक्की होती.

सिरीजची सुरुवात झाली, मुंबईत. हेडन आणि गिलख्रिस्ट नावाचे दोन खुंखार कांगारु भारतावर तुटून पडले. भारताची बॅटिंग ढेपाळली आणि ऑस्ट्रेलियानं १० विकेट्सनं किरकोळीत मॅच मारली. या मॅचमध्ये भारताकडून एकच माणूस चमकला तो म्हणजे, हरभजन सिंग. भज्जीनं पहिल्या इनिंगमध्ये ४ विकेट्स काढल्या होत्या.

सिरीजमधली दुसरी मॅच म्हणजे ऐतिहासिक कोलकाता टेस्ट.

ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये ४४५ रन्स चोपले होते, सगळे बॉलर्स मार खात असताना भज्जीनं हॅट्ट्रिक काढत, तब्बल ७ विकेट्स काढल्या होत्या. मात्र भारताची पहिली इनिंग फक्त १७१ रन्सवर आटोपली आणि फॉलोऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर द्रविड आणि लक्ष्मणनं केलेल्या चमत्कारामुळं भारतानं कमबॅक केलं, पण ऑस्ट्रेलियाची तगडी बॅटिंग बघता मॅच निघणं अवघडच होतं.

गांगुलीनं अत्यंत शिताफीनं बॉलिंगमध्ये चेंजेस केले आणि भज्जीवर जास्तीत जबाबदारी दिली. त्यानंही आपल्या कॅप्टनच्या विश्वासाचं सोनं केलं आणि सहा विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांना सुरुंग लावला.

तिसरी टेस्ट झाली, चेन्नईमध्ये.

हेडन आणि लक्ष्मण फॉर्मात होतेच, पण ही टेस्ट सुद्धा हरभजननंच गाजवली. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये ७ विकेट्स काढल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये त्यावर कळस चढवत ८ ऑस्ट्रेलियन बॅट्समन्सना आऊट केलं. त्याच्या या धडाक्यासमोर ऑस्ट्रेलियानं अक्षरश शरणागती पत्करली होती. त्या सिरीजमध्ये ३२ विकेट्स घेत भज्जी मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. किरकोळीत जिंकू म्हणणाऱ्या ऑस्ट्रेलियाला २-१ अशी मात देत भारतानं त्यांचा माज मोडला होता.

खरंतर फक्त २१ वर्षांच्या स्पिनरला प्रचंड फॉर्ममध्ये असणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमसमोर उतरवणं ही रिस्क होती. नवख्या भज्जीला फटके पडले असते, तर त्याचं करिअर तिथंच संपलं असतं आणि गांगुलीची कॅप्टन्सीही. 

पण हीच गांगुलीची खासियत होती. तो आपल्या प्लेअर्सवर खतरनाक विश्वास दाखवायचा. त्याला हे पक्कं माहीत होतं की, नवी टीम घडवायची असेल तर नव्या प्लेअर्सला पाठबळ दिलं पाहिजे. मग कुणीही विरोधात असलं, तरी चालेल. आपल्या संपूर्ण कारकिर्दित दादानं हाच हट्टाचा पॅटर्न राबवला, त्यानं खेळाडूंना बळ दिलं, समोरचं चॅलेंज कितीही अवघड असलं तरी तो सगळ्या टीमला घेऊन चॅलेंजला सामोरं गेला.

याचाच परिणाम म्हणजे टीम जिंकत आली, ईडन गार्डन्सवर भज्जी हिरो होता, तर लॉर्ड्सवर कैफ. पण प्रत्येक वेळी टीममध्ये जिंकण्याची आग पेटवणारं नाव एकच होतं, कॅप्टन सौरव गांगुली!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.