पुण्यातल्या प्रत्येक ठिकाणी आर्मीची जागा अन् ट्रक दिसतात, त्याचं कारण आहे हा इतिहास..
आमचा एक कार्यकर्ता पहिल्यांदा पुण्यात आला. आजवर जे काही पुण्याबद्दल त्याला माहिती होतं ते फक्त ऐकीव. प्रत्यक्षात पुण्यात येण्याचा योग यायला त्याला वयाची पंचवीशी गाठावी लागली.
गडी पुण्यात आला. पुण्याच्या एफसी रोडपासून ते कॅम्पपर्यन्त सगळं फिरून काढू लागला. हळूहळू पुण्याच्या वेशींना टेकून येवू लागला. जिथं जरा मोकळं वाटायचं तिथं त्याला कळायचं ही जागा आर्मीची आहे. त्याला स्वप्नातपण वाटलं नव्हतं की पुण्यात इतके आर्मीवाले असतील. जातायेता या गड्याला कधी आर्मीचे ट्रक दिसायचे तर कधी..
मग गड्याला प्रश्न पडला, पुण्यात आर्मीकडे इतक्या जागा अन् इतके आर्मीवाले कसे-काय इथनं तर पाकिस्तान लय लांब आहे. मग इथं कशाला…?
तर सांगतो, पुण्याच्या लष्करी महत्त्वाची सुरुवात अगदी छत्रपती शिवरायांपासून होते.
शिवरायांचं बालपण पुण्यात गेलं, त्यांनी इथेच अनेक धाडसी मोहीमा आखल्या आणि फत्तेही केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा पुणे सत्ताकेंद्र बनलं, ते पेशव्यांच्या काळात. मराठेशाहीनं अटकेपार झेंडे लाऊन बहुतांश भारत आपल्या अंमलाखाली आणला होता, तेव्हा छत्रपतींच्या आदेशानुसार बरीचशी सूत्र पुण्यातून हलायची.
दुसऱ्या बाजीरावाच्या काळात, इंग्रज आणि पेशवे यांच्यात युद्ध झालं आणि इंग्रजांचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकला. तिथून मग पुणेही ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आलं. इंग्रजांची लढाई झालेली खडकीत, त्यामुळं त्यांनी तिथंच आपल्या सैन्याचा डेरा कायम ठेवला.
मुंबईसारखं महत्त्वाचं व्यापारी बंदर ताब्यात असल्यानं, त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात सैन्य तैनात करणं त्यांना गरजेचं वाटत होतं.
पुण्यातलं अल्हाददायक वातावरण, नद्यांमुळं असलेलं पाणी आणि लष्कराच्या दृष्टीनं मिळणाऱ्या सुखसुविधा बघता ब्रिटिशांनी पुण्यात आपल्या लष्कराचा जम बसवला.
१८१७ मध्ये खडकी आणि १८१९ मध्ये पुणे कॅंटोन्मेंट उभं राहिलं.
१८५७ चा उठाव झाल्यानंतर ब्रिटिश सरकार थेट भारताच्या कारभारात लक्ष घालू लागलं. ब्रिटिशांनी प्रेसिडेन्सी आर्मीचं विघटन केलं आणि सगळे अधिकार कमांडर इन चीफच्या हातात सोपवले. त्यानुसार, १ एप्रिल १८९५ पासून हे सैन्य ब्रिटिश इंडियन आर्मी म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
या आर्मीची बंगाल, पंजाब, मद्रास आणि बॉम्बे अशी चार मुख्यालयं करण्यात आली होती. यातल्या बॉम्बे मुख्यालयाचं हेडक्वार्टर होतं पुणे.
मग यात बदल होते गेले की हेच कायम राहिलं?
तर १९०८ मध्ये ब्रिटिशांनी आर्मीचे दोन भाग केले, नॉर्दन आर्मी ज्याचं मुख्यालय सध्या पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीमध्ये होतं, तर सदर्न आर्मीचं मुख्यालय पुण्यातच कायम ठेवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा एकदा १९२० मध्ये यात बदल करण्यात आले, यात नॉर्दन आणि सदर्न कमांड कायम ठेवण्यात आली आणि नैनितालमध्ये ईस्टर्न तर क्वेट्टामध्ये वेस्टर्न कमांड उभारण्यात आली.
सध्या भारतीय सैन्यदलाच्या एकूण सात कमांड आहे, ज्यातही पुण्यात मुख्यालय असलेल्या सदर्न कमांडचं महत्त्व अबाधित आहे. कारण, सगळ्यात जुनी कमांड म्हणून सदर्न कमांडला ओळखलं जातं.
सदर्न कमांडनं पहिल्या महायुद्धापासून लष्करी, मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचं आणि भारताच्या भूमीचं रक्षण करण्यात प्रचंड योगदान दिलंय.
दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी सदर्न कमांडच्या काही तुकड्या बँगलोरमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. भारतातल्या बंदरांचं, हवाई तळांचं रक्षण करण्याची आणि सैनिकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सदर्न कमांडमधल्या अधिकाऱ्यांनी बजावली.
पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर, मोठं आव्हान होतं ते संस्थानांचं विलिनीकरण आणि गोव्याला मुक्त करण्याचं. जुनागढ आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात सदर्न कमांडच्या शौर्याचा मोठा वाटा होता. ही पराक्रमाची परंपरा १९६१ च्या गोवा मुक्ती संग्रामात आणि १९६५ च्या कच्छच्या युद्धातही कायम राहिली.
१९७१ च्या युद्धात भारतीय वायू दलाच्या पंखांना खांदा लाऊन सदर्न कमांडची १२ इन्फन्ट्री डिव्हिजन झुंजली आणि पाकिस्तानी सैन्यापासून भारताचं रक्षण झालं. ११ इन्फन्ट्री डिव्हिजननं तर पाकिस्तानमध्ये घुसत काही भाग आपल्या ताब्यात घेतला होता. सदर्न कमांडच्या शौर्याचा आवाका इतका होता की १९८५ मध्ये जोधपूरला सदर्न कमांडची वाळवंटी तुकडी उभी करण्यात आली.
सध्या सदर्न कमांड फक्त पुण्यापुरतीच मर्यादित आहे का?
तर नाही. मुख्यालय पुण्यात असलं तरी, सदर्न कमांडच्या सीमा अनेक ठिकाणी पाकिस्तानला भिडतात. ११ राज्य आणि ४ केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी शिरावर असलेल्या सदर्न कमांडचं मुख्यालय पुण्यात आहे, त्याचा कारभार पुण्यातून चालतो, त्यामुळं ही निश्चितच पुण्याच्या वैभवाची गोष्ट आहे.
युद्धाच्या प्रसंगी नागरिकांची आणि देशाची ढाल बनत, सदर्न कमांडमधल्या जवानांची निधडी छाती आपसूक पुढे होतेच. पण शांततेच्या काळात देशावर एखादं संकट आलं की त्यांच्या हातात हजार हातांचं बळ येतं.
महाराष्ट्राला आतापर्यंत दोन भूकंपांनी हादरे दिले, १९६० मध्ये कोयना भूकंप आणि १९९३ मध्ये किल्लारी भूकंप. अडचणीत असणाऱ्या प्रत्येकापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम तेव्हा सदर्न कमांडनं केलं. मदतीचा हा हात २००४ च्या त्सुनामीवेळी, १९९२ च्या मुंबई दंगलीवेळी, २०१९ च्या महाराष्ट्रातल्या पुरावेळीही पुढे आला आणि कित्येक जीव वाचले.
सदर्न कमांड आजही भारताच्या मित्रदेशांसोबत युद्ध सरावाचं आयोजन करतं, कोरोनाकाळात फक्त लष्करासाठी असलेल्या सुविधा सामान्य नागरिकांसाठी खुल्या करतं. पहिलं महायुद्ध असेल किंवा महामारीशी झालेली लढाई सदर्न कमांडनं माणसं जपली आणि जगवलीही.
पुण्याच्या कोरेगाव पार्कात असलेल्या सदर्न कमांडच्या मुख्यालयासमोर कधी जायला किंवा थांबायला मिळालं, तर नुसतं त्या वास्तूकडे पाहिल्यावर आपली छाती अभिमानानं उंचावते. सदर्न कमांडचं निर्मीती चिन्ह चार ताऱ्यांचं आहे.
लाल आणि काळा रंग आणि चार तेजस्वी तारे… ज्यात बलिदान आहे, शौर्य आहे आणि कायम राहणारा अभिमानही.
हे ही वाच भिडू:
- आणि सॅम माणेकशॉ यांनी भारतातली सर्वात मोठी दंगल रोखून दाखवली.
- लष्करप्रमुख जनरल करिअप्पांंचा मुलगा पाकिस्तानला युद्धकैदी म्हणून सापडतो तेव्हा..
- इस्त्रायलच्या पाठ्यपुस्तकात भारतीय सैन्याच्या शौर्याचे धडे आहेत, पण का ?