अजित पवारांच्या नावाने फेक कॉल करून खंडणी मागणाऱ्याने ही ट्रिक वापरल्याचं कळतंय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने खंडणी मागितल्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. अजित पवार यांचा पीए बोलत असल्याची बतावणी करून हा आरोपी खंडणी मागत होता.

मागे २०१९ मध्ये पण अजित पवारांच्या नावानं ‘स्पूफ’ केल्याचं समोर आलं होतं. त्या कॉनमॅन सुखेश चंद्रशेखर यानं पण जॅकलिनला असंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ऑफिसचा कॉल ‘स्पूफ’ करून फसवल्याचं समोर आलं होतं.

त्यामुळं भिडूनं ठरवलंच की नक्की स्पूफिंग काय आहे ते बघावच.

बघितला तर विषय तसा अवघड आहे पण प्ले स्टोअरवर जी अँड्रॉइड अँपप्लिकेशन आहेत त्यानं हे अगदी सोपं झालंय. 

तर स्पूफिंग नक्की काय असतो ते बघू. तर स्पूफिंग म्हणजे कॉलर आयडी माहितीमध्ये फेरफार करून एखाद्या विशिष्ट व्यक्तीने  कॉल केला आहे असा कॉल केलेल्या व्यक्तीला विश्वास बसवण्याची पद्धत आहे.

अर्रर्रर्र जरा जास्तच टेक्निकल झालं. 

थांबा विस्कटून सांगतो. समजा मला माझा मित्र गण्याला माझा दुसरा मित्र सम्याच्या नावानं कॉल करायचा असेल तर मी ह्या स्पूफिंगच्या साह्यानं करू शकतो.

म्हणजे मी जर स्पूफिंग अँप्लिकेशन वापरून गण्याला कॉल केला तर त्याच्या स्क्रिनवर सम्याचं नाव आणि नंबर दिसू शकतो.

म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाने फोन करणारा तो आरोपी जेव्हा लोकांना कॉल करायचा तेव्हा लोकांच्या स्क्रिनवर अजित पवारांचा नंबर झळकायचा. त्या सुकेशनं जॅकलिनच्या मॅनेजरला असंच अमित शहांच्या ऑफिसमधून कॉल आल्याचं दाखवलं होतं.

आता हे स्पूफिंग नक्की कसा काम करतो ते पाहू?

जास्त टेक्निकल होत नाही फक्त एक फॅक्ट लक्षात घ्या.

तुम्ही जेव्हा एखाद्याला कॉल करता तेव्हा तुम्ही ज्याला कॉल केला आहे त्याला तुमचा कॉलर आयडी पाठवत असता.

जेव्हा कॉलच्या पहिल्या १-२ रिंग होतात तेव्हा कॉल करणाऱ्याची माहिती ज्याला कॉल केला आहे त्याला जात असते.

स्पूफिंग अप्लिकेशन मग हीच कॉलर आयडी बदलतात. आणि ज्याच्या नावाने कॉल करायचा आहे त्याचा कॉलर आयडी ओरिजनल आयडीच्या जागी टाकतात. 

स्पूफिंग टेकनॉलॉजि तशी जुनी आहे. सुरवातीला कॉल सेन्टर्स किंवा इतर कमर्शियल वापरसाठी ही टेकनॉलॉजि आणली होती.

मात्र व्हॉइस ओव्हर आयपी ज्यानं इंटरनेटचा वापर करून कॉल करता येतं ते वापरून स्पूफिंग करणं सोपं झालंय.

ते फेक कॉल म्हणतात ते हेच प्रकरण आहे. डीजीटोन, फेक मी अ कॉल, सेकंड फोन नंबर यांसारखी प्ले स्टोर वरील अँप वापरून स्पूफिंग केलं जातं. सुरवातीला डेमो भेटे पर्यंत या अँप्लिकेशन फ्री देतात आणि मग ठराविक पैशाची मागणी करतात.

आता भिडू असलं काहीतरी करून कांड करण्याचा तुमच्या मनात असेल तर सीन होऊ शकतोय.

जर तुम्ही स्पूफिंग वापरून बेकायदेशीर कामं केली तर पोलीस ह्या ॲप बनवणाऱ्या कंपन्यांकडून आरोपीची माहिती घेऊ शकतात.

आता ह्या स्पूफिंग पासून कसं वाचायचं ?

तर ह्याच्या पासून वाचण्यासाठी सध्यातरी कोणती फुलप्रूफ मेथड नाहीए. त्यामुळं कॉमन सेन्सनच काम चालवावं लागणार आहे. म्हणजे  तुम्हाला डायरेक्ट अजित पवारांचा फोन येइल का? किंवा सुकेश सारख्याची गृहमंत्रालयात ओळख असेल का?  पण कॉमन सेन्स कॉमन नसतो म्हणतात आणि तिथंच कार्यक्रम गंडतो.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.