छोटा डॉन गाणारी ‘सृष्टी तावडे’ एवढी लोकप्रिय कशी झाली ?

मै नही तो कौन बे, मै नही तो कौन ? युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम काहीही स्क्रोल करताना तुमच्या कानावर हे शब्द पडले असतील. दिसायला बारकी वाटणारी एक मुलगी फक्त २०-३० सेकंद गाताना दिसते, पण ऐकायला एकदम भारी वाटतं. असं वाटतं की ती कुठली तरी गोष्ट सांगतिये आणि गोष्ट सांगण्याचं माध्यम असतं रॅप.

रॅप, हिपहॉप या गोष्टी आपल्याला आता नवीन राहिल्या नाहीत.

बाबा सेहगल ते हनीसिंग आणि हनीसिंग ते डिव्हाईन, एमसी स्टॅन असा सगळा प्रवास आपण बघितलाय. सुरुवातीला बऱ्यापैकी पंजाबी गाणी, पोरी, पार्टी असंच रॅप कानावर पडायचं, पण सध्या रॅपमधून गोष्टी सांगितल्या जातायत. मग ती गोष्ट एका डॉनची असेल, कावळ्याची असेल किंवा एका मुलीची. आणि ही गोष्ट सांगणारी रॅपर आहे सृष्टी तावडे.

आपल्याला सोशल मीडिया आणि टीव्हीवर सतत दिसणारी ही सृष्टी तावडे आहे तरी कोण, तिचा रॅपमधला प्रवास आणि तिची एवढी चर्चा का होतीये ?

सृष्टी तावडेबद्दल बोलायच्या आधी, ती ज्या शोमध्ये दिसते ते एमटीव्ही हसल 2.o नेमकं काय आहे ? हे बघू.

एमटीव्ही हसल हा भारताचा पहिला हिप हॉप रिऍलिटी शो. याचा पहिला सिझन २०१९ मध्ये आला होता. आता टीम लीडर्स म्हणून दिसणारे किंग, इपीआर हे या पहिल्या सिझनमध्ये कन्टेस्टंट होते. तर त्यावेळेस जज होते, न्युक्लेया, रफ्तार आणि राजा कुमारी.

यावर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये हसलचा दुसरा सिझन आला आणि तो प्रचंड लोकप्रियही झाला. या शो मधून फक्त हिंदीच नाही, तर पंजाबी, हरियाणवी, मराठी भाषांमधल्या रॅपर्सलाही स्टेज मिळालं.

याच शोमुळे एक नाव घरोघरी पोहोचलं ते सृष्टी तावडेचं.

सृष्टी मूळची मुंबईच्या चेंबूरची. मूळची स्टेज परफॉर्मर, ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर तिनं जॉब करायचा आणि टिपिकल आयुष्य जगायचं असं ठरवलं होतं. मात्र तेवढ्यात लॉकडाऊन लागलं. लॉकडाउनच्या काळात घरात असताना तिनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन लिहायला सुरुवात केली. कधी इमोशनल, कधी प्रेरणा देणारं आणि अनेकदा व्यवस्थेला भिडणारं तिचं लिखाण अनेकांच्या पसंतीस पडलं. लोकप्रियता मिळत गेली आणि कन्टेन्ट रायटर, कॉपी रायटर म्हणून काम करणारी सृष्टी  रॅपर बनली.

रॅप किंवा हिपहॉप हे कायम सिस्टीम विरोधात बंड करण्याचं माध्यम राहिलंय. मुळात याची सुरुवातच वर्णद्वेषाविरोधात उगारलेल्या बंडापासून झाली. टू पाक, डॉक्टर ड्रे, नास, स्नुप डॉग या रॅपर्सनी हिपहॉपमधून चळवळ उभी केली.

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे रॅप म्हणजे फक्त उथळ म्युझिक, शिव्यांचा भडीमार किंवा मुलींच्या रॅपमध्ये येणारे तेच तेच विषय टाळून सृष्टीनं वेगळ्या विषयांना हात घातला आणि त्यामुळेच तिचं रॅप लोकांना भावलं आणि भिडलंही.

हसलमध्ये यायच्या आधी सृष्टीनं ‘ऑफिस, लाईफ लॉस्ट फ्रॉम 9 टू 5’ नावाचं एक रॅप सॉंग केलं, जे युट्युबवर प्रचंड लोकप्रियही झालं. भारतातल्या राजकारणावर आणि राजकारण्यांवर भाष्य करणारं गाणंही सृष्टीनं परफॉर्म केलं होतं. पण एमटीव्ही हसलमध्ये मात्र तिचं टॅलेंट खऱ्या अर्थानं पुढं आलं.

तिनं देव आपल्या एखाद्या भक्ताशी कसा संवाद साधेल हे सांगणारं चिल काईंडा गाय हे रॅप लिहिलं. एक डॉन आपल्या लग्नाची जाहिरात कसं करेल हे सुद्धा सांगितलं आणि लहानपणापासून ऐकत आलेल्या कावळ्याच्या स्टोरीचा दुसरा अँगलही ऐकवला.

मग सृष्टीनं एक रॅप केलं बचपन नावाचं. एका मुलीला लहानपणी घरगुती हिंसेचा सामना करावा लागला, तेव्हा तिनं भोगलेला त्रास आणि त्याचे तिच्यावर झालेले परिणाम हे सगळं तिनं गाण्यातून मांडलं.

ज्या विषयावर बोलणं दुर्दैवानं समाजात टॅबू मानलं जातं, ते तिनं नॅशनल टेलिव्हिजनवर मांडलं. या एका रॅपमधून सृष्टी कित्येकांचा आवाज बनली. सृष्टीचं प्रत्येक रॅप बारकाईनं ऐकलं तर लक्षात येतं की, ती तिच्या गाण्यांमधून मुलींचे, महिलांचे प्रश्न मांडते. तेही आपल्या मुंबईच्या भाषेत.

सृष्टीच्या लोकप्रियते मागचं कारण जाणून घेण्यासाठी बोल भिडूनं हिप हॉप रिसर्चर डॉ. यतींद्र इंगळे यांच्याशी संपर्क साधला,

ते म्हणाले, ‘सृष्टीची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तिनं सुरुवातीला काही एंटरटेनिंग गाणी लिहिली, त्यामुळं हिपहॉप न ऐकणारी लोकंही तिची गाणी आवर्जून ऐकू लागली. मग तेव्हा तिनं एक था कव्वा, बचपन अशी वुमन एम्पॉवरमेन्ट करणारी गाणी सादर केली. तिनं स्ट्रीट कल्चरला जनरलाईज केलं, लिरिक्स आणि रिदमही सामान्य लोकांना कनेक्ट होईल असा ठेवला.

सृष्टी एंटरटेनर तर आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे ती वुमन एम्पॉवरमेन्ट इन्फ्ल्यूएन्सर आहे. यामुळेच तिची चर्चा होतीये आणि हिपहॉपमध्ये स्वतःची मुव्हमेंट सुरु केली म्हणून कौतुकही.’

येणाऱ्या दिवसात सृष्टी आणखी कोणत्या विषयांवर लिहिणार आणि भारतातला फिमेल हिपहॉपचा सीन बदलणार का ?

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.