वर्षभर जेलमध्ये मार खात राहिला पण परतला ते थेट करुणानिधींचा वारसदार बनूनच..

राजकारणातील घराणेशाही वाटते तितकी सोपी नसते. आई वडिलांच्या वारसासाठी भावंडं एकमेकांच्या उरावर बसतात. त्यात पुतणे वगैरे हा भाग तर आणखी वेगळा. हे झालं आपल्याकडचं. आपल्या इथली मारामारी फक्त एवढ्या पूर्ती मर्यादित असते. पण दक्षिणेत प्रकरण जास्तच कॉम्प्लिकेटेड असतं. तिथं प्रत्येक नेते मंडळी दोन चार लग्ने करतात. आता या प्रत्येक बायकोच्या पोरा बाळांना सत्तेतला घास कुठून देणार? मग सुरु होते भाऊबंदकी.

मुघल काळातील शहाजहान औरंगजेब पासून ही आपली परंपरा आहेच.

तामिळनाडूच्या राजकारणाने तर हे खूप बघितलं आहे. मात्र तिथली सर्वात मोठी राजकीय फॅमिली म्हणजे एम करुणानिधी यांच कुटुंब. स्वतः करुणानिधी आपल्या राजकीय कारकिर्दीपैकी वीस वर्ष मुख्यमंत्रीपदावर होते. पाच दशके त्यांनी तामिळनाडूवर राज्य केलं. त्यांनी एकूण ३ वेळा लग्न केलं त्यात त्यांना एकूण ६ लेकरं झाली. हे सगळेच्या सगळे राजकारणात आहेत.

पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट क्लियर आहे, करुणानिधी यांचा वारसदार आहे एम.के स्टॅलिन.

एम.के.स्टॅलिन हा करुणानिधी यांच्या दुसऱ्या पत्नीचा म्हणजेच दयालु अम्मल हिचा धाकटा मुलगा. त्याच्या आधी करुणानिधी यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. हा मुलगा जन्मला तेव्हा त्याच्या चर्च दिवसात रशियामध्ये हुकूमशाह स्टॅलिनचा मृत्यू झाला. त्याच्या शोकसभेवेळी करुणानिधी यांनी जाहीर केलं की

आपला हा मुलगा स्टॅलिन सारखा कठोर आणि  कणखर बनावा म्हणून त्याच नाव स्टॅलिन असं ठेवत आहे.

एम.के.स्टॅलिन. 

याच शिक्षण वगैरे सगळं चेन्नई मध्ये झालं. अख्ख राजकारणात असल्यामुळे त्याच्या रक्तात देखील हेच उतरलं यात आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. अगदी वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला होता.

त्याकाळात अण्णादुराई, करुणानिधी, अभिनेता एमजी रामचंद्रन हे डीएमके पक्षाचे मोठे नेते होते. 

खरं तर करुणानिधी राजकारणात आले ते एक सिद्धहस्त लेखक म्हणून. त्यांनी अनेक सिनेमे लिहिले होते, अगदी आपल्या वयाच्या नव्वदीत देखील ते लिहीत होते. त्यांनीच तामिळ अस्मितेच्या द्रविड चळवळीला लोकांपर्यंत पोहचवलं. लोक त्यांना कलैग्नार म्हणजे कलाकार म्हणून ओळखायचे.

स्टॅलिन मात्र नावाप्रमाणेच कलेपासून शेकडो कोस लांब होता. त्यांच्या सर्वात मोठ्या भावाला एमके मुथ्थुला  सिनेमाची आवड होती. तोच करुणानिधी यांचा वारस समजला जायचा.स्टॅलिनने काही सिनेमात सीरियलमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते झेपलं नाही. तर सगळ्यात धाकटी कनिमोळी हिला करुणानिधी यांची साहित्यातील वारसदार समजलं जायचं.

पूर्णपणे राजकारणाला वाहून घेतलेला करुणानिधी यांचा मुलगा म्हणजे स्टॅलिन.

वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याने लहान वयातच प्रचारात वगैरे भाग घेण्यास सुरवात केली होती. पुढे त्याने गोपालपूरम येथे  एक लहानमुलांची संघटना बनवली. यात ते वेगवेगळ्या नेत्यांच्या जन्मदिवसाचा कार्यक्रम साजरा करायचे. हौसेने अण्णा दुराई यांच्या पासून ते एमजीआर यांच्या प्रमाणे सगळे मोठे नेते या छोट्या मुलांच्या कार्यक्रमाला येऊ लागले.

साधारण याच काळात तामिळनाडूची आपल्या भाषे विषयीची चळवळ पेट घेऊ लागली होती. हिंदीला विरोध करून डीएमकेने आपली सत्ता तामिळनाडू मध्ये आणली. अण्णादुराई हे तिथले मुख्यमंत्री बनले. १९६९ साली त्यांचं निधन झालं आणि डीएमकेची सत्ता व मुख्यमंत्रीपद करुणानिधी यांच्याकडे आलं.

एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत या म्हणी प्रमाणे करुणानिधी आणि एमजी रामचंद्रन यांच्यात वाद सुरु झाले. त्याची परिणीती एमजीआर यांच्या बंडखोरीच्या झाली. त्यांनी स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष काढला, अण्णा डीएमके.

करुणानिधी यांनी एमजीआर यांना संपवायचं ठरवलं. राजकारणात तर ते स्वतः होते पण सिनेमात देखील त्याचं साम्राज्य मोडून काढायची त्यांची इच्छा होती. यातूनच आपल्या थोरल्या लेकाला एमके मुथ्थु याला राजकारण सोडून सिनेमात पाठवलं. 

तोपर्यंत स्टॅलिनने स्थापन केलेल्या  लहान मुलांच्या संघटनेच रूपांतर डीएमकेच्या युथ विंग मध्ये झालं होतं. अवघ्या वीस वर्षांचा स्टॅलिन एक आक्रमक कार्यकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला होता.

जेव्हा १९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. स्वतः करुणानिधी हे इंदिरा गांधींच्या सहयोगी पक्षांपैकी होते मात्र तरी त्यांनी या आणीबाणीचा विरोध केला. काँग्रेसने त्यांचं सरकार बरखास्त केलं आणि राष्ट्रपती राजवट लागू केली.

या काळात होणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दडपशाही विरुद्ध स्टॅलिनची युथ विंग रस्त्यावर उतरली. पोलिसांना काहीही करून हे आंदोलन मोडायचे होते, त्यांनी स्टॅलिन व त्याच्या युवा कार्यकर्त्यांना उचललं आणि जेलमध्ये टाकलं.

या जेलमध्ये स्टॅलिनला प्रचंड मारहाण झाली. पोलिसांनी अगदी क्रूर गुन्हेगारांना द्यायच्या शिक्षा या आंदोलनकर्त्यांना दिल्या. स्टॅलिनला पोलीस मारत असताना चिट्टीबाबू नावाचे डीएमके खासदार देखील तुरुंगात होते. ते स्टॅलिनला वाचवण्यासाठी पोलिसांच्या मध्ये पडले. पण पोलिसांनी कोणतीही दयामाया न दाखवता चिट्ठीबाबू यांना देखील दंडुक्याने तुफान मारलं. दुर्दैवाने यातच त्यांचा मृत्यू झाला.

फक्त ४६ वर्षांच्या चिट्ठीबाबू यांना देशभरात आणीबाणीचा हुतात्मा म्हणून ओळखण्यात आलं.

चिट्ठीबाबू यांच्यासोबत मार खाणारा स्टॅलिन देखील तामिळ जनतेसाठी एक मोठा हिरो बनला. जेलमध्ये जाण्यापूर्वी तो करुणानिधी यांच्या अनेक मुलांपैकी एक मुलगा आणि पक्षातला एक साधा कार्यकर्ता होता पण पुढच्या वर्षभराने तो जेव्हा जेलमधून बाहेर आला तेव्हा तो पक्षाचा मोठा नेता बनला होता.

त्याने तुरुंगात सांडलेल्या रक्तामुळे तरुणाईत त्याची जबरदस्त हवा झाली. स्टॅलिनला पुढचा करुणानिधी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. डीएमके मध्ये युथ विंग स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू लागली. त्यांनी स्वतःच वेगळं ऑफिसदेखील सुरु केलं होतं. स्टॅलिनला आपला नेता मानणारे हे तरुण पक्षात आपली वेगळी छाप पाडत होते.

१९८४ साली त्याने पहिल्यांदा निवडणूक लढवली मात्र तो त्यात पराभूत झाला. पण तो डगमगला नाही. त्याने आपलं काम सुरूच ठेवलं. आपल्या वडिलांप्रमाणेच स्वच्छ पांढरा शर्ट आणि लुंगी कॉलर करून  वावरणाऱ्या स्टॅलिनकडे पाहिल्यावरच त्याच्या आक्रमक व्यक्तिमत्वाची ओळख होते.

तो आमदार तर होताच पण १९९६ साली पहिल्यांदाच झालेल्या थेट निवडणुकीत त्याने चेन्नईच महापौरपद जिंकलं. याकाळात त्याने चेन्नईच्या विकासाची अनेक कामे केली. त्याच्या आयडीयाज आणि त्यांना झपाट्याने प्रत्यक्षात आणायची स्टाईल प्रचंड गाजली. पुढे वडिलांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील झाला. त्याच कर्तृत्व नाकारणे करुणानिधी यांना शक्य नव्हते.

म्हणूनच आपल्या मोठ्या मुलांना डावलून करुणानिधी यांनी त्याची आपला वारसदार म्हणून निवड केली. २००९ साली तो राज्याचा पहिला उपमुख्यमंत्री झाला. जनमानसावर त्याची जितकी पकड होती तसाच प्रशासनावर देखील हातखंडा होता.

मधल्या काळात करुणानिधी यांच्या भावापासून ते स्टॅलिनच्या सख्ख्या भावापर्यंत अनेकांनी त्याच्या विरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केला पण कोणीही टिकले नाही. अगदी लोकांचे ओपिनियन पोल घेतले गेले त्यातही स्टॅलिनच अफाट मते घेऊन जिंकला. 

करुणानिधी यांच्या मृत्यूपासून तो डीएमकेचा अध्यक्ष आहे. राज्यात विरोधी पक्ष नेता म्हणून त्याने चमकदार कामगिरी केली आहे. राजकीय पंडितांचा आडाखा आहे की करुणानिधी आणि जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूच्या राजकारणाचा एकमेव हिरो म्हणून स्टॅलिनच उरला आहे.

आज वर तामिळनाडूमध्ये सिनेमामधून येऊन लोक मुख्यमंत्री बनायचे, जेल मधून राजकारणाची सुरवात करून राजकारणाचा सुपरस्टार झालेला स्टॅलिन हा पहिलाच नेता.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.