अंडरवर्ल्डमध्ये ‘सुपारी’ शब्द आला त्याच्यामागेही ऐतिहासिक कारण आहे…

घरात काही मंगल कार्य असलं, की सुपारीशिवाय ते पूर्ण होत नाही. फुलचंद असो किंवा १२०-३०० कडक पान लावायचं असलं, तर ते सुपारीशिवाय अपूर्ण असतंय. चौकात कार्यक्रम ठेवला की कुठल्यातरी सेलिब्रेटीला सुपारी दिली जाते. या तिन्ही गोष्टीत सुपारी हा लाडका आणि हवाहवासा विषय असतो.

पण एका ठिकाणी मात्र सुपारी बदनाम आहे, ते ठिकाण म्हणजे अंडरवर्ल्ड.

इथं सुपारी खात नाहीत, तर वाजवतात. इथं सुपारी दिली जाते, घेतली जाते आणि काढली जाते. आपली सुपारी निघाली म्हणजे एकतर आपण लय मोठे बादशहा आहोत याचा माज बाळगायचा किंवा उलटे दिवस मोजायला सुरुवात करायचे… हेच ऑप्शन्स समोर असतात.

पेपरातल्या बातम्याही अशाच… सुपारी किलर, सुपारी दिल्याचा आरोप असं बरंच काही.

पण हा शब्द अंडरवर्ल्डमध्ये कसा आला? शुभ कामांची ओळख असणारी सुपारी कुख्यात कशी बनली? याचा इतिहास पार तेराव्या शतकापर्यंत जातो.

मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये पहिली सुपारी दिली गेली ती १९६९ मध्ये. ती कुणी दिली, कुणाला दिली आणि वाजली का नाही, हे आपण नंतर बघू, आधी जाऊ तेराव्या शतकात.

आत्ताचं माहीम १३ व्या शतकात महिकावती होतं. इथला राजा होता राजा भीमदेव. त्याच्या टोळीचं नाव होतं महेमी. आपल्या लोकांना काम नेमून देण्याची राजा भीमाची पद्धत सोपी होती. तो आपल्या किल्ल्यात दरबार भरवायचा, लोकांना जेवायला घालायचा.

जेवण बिवण झालं की, एक भलंमोठं ताट लोकांच्या मध्ये ठेवलं जायचं, ज्याच्यात पान सुपारी असायची.  मग राजाचा सेनापती पुढं यायचा, राजाला काय प्रॉब्लेम आहे, त्याची कुठली मोहीम पूर्ण करायची आहे, हे सांगायचा. ज्या सरदाराचा आपण हे काम पूर्ण करू असा विश्वास असायचा, तो ही पान सुपारी घ्यायचा.

त्यानं ती सुपारी उचलली की, त्यानं कामाची जबाबदारी घेतली, यावर शिक्कामोर्तब व्हायचं.

पण गोष्ट इथंच थांबायची नाही. ज्यानं सुपारी उचलली, त्याच्याजवळ भीमाचा सेनापती यायचा आणि आपल्या हातांनी त्या वीराच्या डोळ्यांमध्ये सुरमा भरायचा. हातात सुपारी आणि डोळ्यात सुरमा असलेल्या त्या व्यक्तीला टोळीत जबरदस्त वजन प्राप्त व्हायचं.

ही परंपरा पुढं मुघल काळातही कायम राहिली, अफझलखान आणि सिद्दी जौहरनं विडा उचलल्याचं आपल्याला अनेकदा वाचायला मिळतं.

थोडक्यात काय, तर दरबारात एखादी मोहीम गाजवण्याच्या, शत्रूचा शेवट करण्याची जबाबदारी घेण्याला विडा उचलणं, सुपारी उचलणं असं ओळखलं जाऊ लागलं.

अंडरवर्ल्डमध्ये मात्र यात थोडासा बदल झाला, इथले दादा, भाई, डॉन दरबार भरवायचे खरे, पण त्यांची सुपारी देण्याची पद्धत वेगळी होती. कुणाला सुपारी द्यायची हे ते स्वतःच ठरवायचे. ही सुपारी घेणारी माणसं त्यांच्याच टोळीतली असायची असं नाही. बऱ्याचदा ती बाहेरच्या शहरातून, बाहेरच्या राज्यातून आणि बाहेरच्या देशातून आणलीही जायची.

आपल्याला गुन्हेगारी क्षेत्रात आव्हान देणाऱ्या, आपल्या मार्गातला अडथळा ठरणाऱ्या प्रतिस्पर्ध्याची सुपारी दिली जाऊ लागली. इथं सुपारी म्हणजे थेट समोरच्याचा काटा काढणं हेच होतं.

अंडरवर्ल्डमधली पहिली सुपारी दिली कुणी?

तर उत्तर आहे हाजी मस्तान. आपला प्रतिस्पर्धी युसूफ पटेलला मारण्यासाठी त्यानं पाकिस्तानातले दोन पश्तुन पठाण बोलवले होते आणि त्यांना सुपारी दिली दहा हजाराची. आता १९६९ मधले १० हजार म्हणजे अजिबात छोटी रक्कम नव्हती. पण मस्ताननं काम सोपवलं.

या पठाणांनी नोव्हेंबर महिन्यात सुपारी वाजवायची ठरवली. लोकांमध्ये रमझानचा उत्साह होता, मिनारा मशिदीजवळची मेमन लोकांची वस्ती गर्दीनं बहरली होती. रात्री बाराच्या सुमारास युसूफ पटेल मशिदीजवळ आपल्या लोकांसोबत बसला होता. हे दोन पठाण सावज टिपण्यासाठी येरझाऱ्या घालू लागले.

त्यांनी पटेलला हेरलं, पण तेवढ्यात पटेलच्या बॉडीगार्डचं लक्ष या दोघांवर गेलं. त्यांची हालचाल, त्यांची नजर त्याला धोकादायक वाटली. त्यानं पटेलला सांगितलं, ‘भाई, इधरसे निकलते है.’ पण पटेल काय निघाला नाही आणि तेवढ्यात ते दोन्ही पठाण हातात बंदुका घेऊन, पटेलच्या दिशेनं धावले.

मिनारा मशिदीच्या जवळची गर्दी स्तब्ध झाली, दोन्ही पठाणांनी आपल्या बंदुका रोखल्या आणि गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. पण पटेलच्या खांद्यात फक्त दोन गोळ्या घुसल्या, त्याचे दोन बॉडीगार्ड आडवे आले आणि त्यांनी या गोळ्या झेलल्या.

एवढा जीवघेणा हल्ला होऊनही युसूफ पटेल वाचला, त्याला मारायला आलेले पठाण मात्र पोलिसांना सापडले. ही अंडरवर्ल्डमधली पहिलीच सुपारी होती,

जी होती मोठी पण वाजलीच नाही!

संदर्भ: डोंगरी ते दुबई, एस. हुसेन झैदी 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.