२ वर्षाआधी लोकं न्यूझीलंडकडून खेळ सांगत होते, आज भारताला त्याच्याशिवाय पर्याय नाही…

२०२० ची आयपीएल सुरु होती, मोठमोठ्या प्लेअर्सपेक्षा फक्त एका नावाची चर्चा होत होती, मुंबई इंडियन्सचा बॅट्समन सूर्यकुमार यादव. त्यात एका मॅचमध्ये भावानं थेट भारताचा तेव्हाचा कॅप्टन विराट कोहलीला टशन दिली.

ऍग्रेशनसाठी जो विराट कोहली ओळखला जातो, त्याच विराटच्या डोळ्यात डोळे घालून बघणं आणि त्यानंतरही डोकं थंड होऊन मॅच जिंकवून देणं ही गोष्ट खरंच खूप मोठी होती. त्या आयपीएल सिझनमध्ये सूर्याचं भरपूर कौतुक झालं, झाली नाही ती फक्त एकच गोष्ट..

सूर्याची भारतीय संघात निवड.

त्याच आयपीएल दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडला गेला, पण त्यात सूर्यकुमारचं नाव नव्हतं. आयपीएल, डोमेस्टिक क्रिकेट इथं खोऱ्यानं रन्स करूनही त्याला भारतीय संघाचे दरवाजे मात्र उघडले जात नव्हते. तेव्हा त्याचं एक ट्विट चांगलंच व्हायरल झालं होतं, ज्यात त्यानं सांगितलेलं की,

 ‘माझे वडील दरवेळी टीम अनाऊन्स झाली की त्यात माझं नाव आहे का बघतात, पण दुर्दैवानं नाव नसतं.’

त्यावेळेस सूर्यकुमार यादवबाबत एक बातमी आली होती की, न्यूझीलंडचे माजी खेळाडू सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडकडून खेळण्याचा सल्ला देतायत. साहजिकच भारतातली लोकंही म्हणू लागली, इकडं चान्स मिळत नसला तर बाबा तिकडं तरी जा.

पण सूर्यानं संयम ही गोष्ट कोळून पिली होती, तो थांबला, प्रयत्न करत राहिला.

कट टू  नोव्हेंबर २०२२, भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी२० मॅच, तेही वर्ल्डकपमधली. पहिली बॅटिंग करणाऱ्या भारताचा स्कोअर १५ ओव्हरनंतर १०७ रन्स इतकाच होता. क्रीझवर हार्दिक पंड्या आणि त्याच्या सोबतीला सूर्यकुमार यादव. 

सूर्यकुमार हाणायला सुरु झाला आणि त्यानं मारले २५ बॉलमध्ये ६१ रन्स, ४ सिक्स आणि ६ फोर. भारतानं शेवटच्या ५ ओव्हर्समध्ये ७९ रन्स मारले, ज्यातले ५६ रन्स एकट्या सूर्याचे होते. त्यानं ऑफ स्टम्पच्या बाहेर वाईड जाणाऱ्या बॉलला ज्या नजाकतीनं स्क्वेअर लेगला सिक्ससाठी मारलं. त्याला खरंच तोड नव्हती. झिम्बाब्वे विरुद्धची मॅच सूर्यानं अक्षरश: गाजवली.        

२०२२ या कॅलेंडर इयरमध्ये १००० पेक्षा जास्त टी२० रन्सही केले. नुसतं याच वर्ल्डकपचं बोलायचं झालं, तर त्यानं भारताची नौका कित्येकदा पार लावली.

पण हे सगळं सूर्यानं साध्य कसं केलं, ते पाहणं महत्त्वाचं आहे.

पहिली गोष्ट म्हणजे सूर्यानं वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलंय. 

एकतर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, रवी शास्त्री अशी सगळी मुंबई लॉबी सपोर्टसाठी असूनही सूर्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं वयाच्या ३० व्या वर्षी. अशा वयात की जेव्हा संधी मिळणंही अवघड असतं आणि हेही माहीत असतं की इथं मिळालेल्या संधीचं सोनं नाही केलं, तर पुन्हा संधी मिळणं अवघड आहे.

१८ मार्च २०२१, भारत विरुद्ध इंग्लंड चौथी टी२० सूर्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅटिंगला आला. तेव्हा समोर जोफ्रा आर्चर होता. जवळपास खांद्यापर्यंत आलेला आर्चरचा शॉर्ट बॉल त्यानं नटराजा स्टाईलमध्ये हाणत स्टँड्समध्ये भिरकावला. डेब्यू इनिंग्समध्ये ५७ रन्स मारत तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला. त्या एका इनिंगमुळं मिळालेला बूस्टर सूर्यानं आजतागायत तरी सोडला नाही.

ज्यावेळेस भारतीय संघ अडचणीत असतो आणि सूर्यावर मोठी जबाबदारी असते, तेव्हा त्याची बॅट हमखास बोलते.

यामागंही एक कारण आहे, ते म्हणजे टीममधला स्पॉट

यादी काढायला बसलं तर ओपनिंगला कोण खेळणार यासाठीही भारताकडे किमान १० ऑप्शन निघतील, हीच गत इतर स्पॉटची. २०१९ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये चौथ्या नंबरचा प्रश्न न सुटल्याचा फटका भारताला बसला होता. पण सूर्यानं आता ही जागा जवळपास लॉक केल्यातच जमा आहे. कारण त्याच्याकडे पहिल्या बॉलपासून मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि सोबतच इनिंग बिल्ड करण्याचीही. त्यामुळं चार नंबरला त्याची जागा फिक्स होते आणि भारताचा टॉप ऑर्डरमधला एक मोठा प्रश्न सुटतो.

‘मिस्टर ३६०’

क्रिकेटमध्ये तुलना होणं ही काय नवीन गोष्ट नाही. सचिनची गावसकर सोबत झाली आणि कोहलीची सचिनशी. क्रिकेटमध्ये अनेक प्लेअर्सची नव्या प्लेअर्ससोबत अगदी सहज तुलना होते, याला अपवाद होता यो एबी डिव्हिलिअर्स. कारण एबीडीची ३६० डिग्रीजमध्ये शॉट्स खेळण्याची ताकद आणि टीमच्या गरजेनुसार बॅटिंगचा मोड बदलण्याची क्षमता कुणामध्ये दिसून येत नव्हती. पण सूर्यकुमारनं ही कमी भरुन काढली.

वाईड ऑनच्या डोक्यावरुन ज्या किरकोळीत गडी हेलिकॉप्टर शॉट मारु शकतो, त्याच किरकोळीत उचलून कव्हर ड्राइव्हही खेळू शकतो.

समोरच्या कॅप्टनला नेमके कुठं कुठं फिल्डर लावायचे असा प्रश्न फार कमी प्लेअर्समुळं पडतो, सूर्याचं नाव त्यात टॉपला आहे. रिस्क घेऊन खेळणं आणि बेजवाबदारपणे खेळणं यातली बारकीशी लाईन सूर्या पार करत नाही आणि त्यामुळेच त्याच्यावर भरवसा ठेवता येतो.

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं सूर्यकुमारबद्दल एक किस्सा सांगितला होता, जेव्हा पॉंटिंग मुंबई इंडियन्सचा भाग होता, तेव्हा सूर्याही मुंबईच्या टीममध्ये होता. मात्र त्याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष जायचं नाही. शेवटी त्याला मुंबई इंडियन्सनं रिटेनही केलं नाही. पण कोलकाता नाईट रायडर्सकडून त्यानं स्वतःची क्वालिटी दाखवून दिली आणि मुंबई इंडियन्सला आपल्याला टीममध्ये घ्यायला भाग पाडलं.

आता चित्र असं बदललंय की, सूर्या मुंबई इंडियन्सच्या मेन प्लेअर्सपैकी एक आहे.

जर बारकाईनं बघितलं असेल तर एक गोष्ट लक्षात आली पण असेल की, सूर्यानं एखादा भारी परफॉर्मन्स दिला की लगेच बातमी येते ‘सूर्यकुमारने तोड दिये इतने रेकॉर्ड्स, रचा नया इतिहास.’

या अशा बातम्या येतात म्हणून सूर्या भारी ठरत नाही, तो भारी ठरतो कारण अशा बातम्या सारख्या येतात. 

भारतानं वर्ल्डकपची सेमीफायनल गाठलीये, कोहली फॉर्ममध्ये आलाय खरा पण रोहित-केएल राहुलच्या फॉर्मचं इनकमिंग-आऊटगोइंग सुरु आहे. त्यामुळं टॉप ऑर्डरमध्ये भारतीय चाहत्यांच्या आशा एकाच प्लेअरवर खिळून राहिल्यात… सूर्यकुमार यादव.

२ वर्षांपूर्वी ज्याला टीममध्ये जागा नव्हती, आज त्याच्याशिवाय टीमचं पान हलत नाही… यालाच तर सक्सेस म्हणतात भिडू!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.