TCS, Infosys सारख्या कंपन्यांची तेजी कमी झालीये, IT वाल्यांचं काय होणार ?

आधी इंजिनिअरींग झाली आणि कॉलेजमध्ये येणाऱ्या कॅम्पसमार्फत सिलेक्शन झालं तर खूप भारी वाटायचं. आणि नाही झालं तर आता खडतर प्रवास असणार हे नक्की व्हायचं. थ्री इडियट्सचा इंटरव्यू वाला सिन आठवा, परिस्थिती सहज कळेल. पण जसा कोरोना आला तसं या काळात आयटी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात लोकांची भरती केल्याचं दिसलं बघा.

म्हणजे सोशल मीडिया उघडलं की रोज कुणी ना कुणी कुठे तरी नोकरीला लागल्याचं स्टेटस दिसायचं. काही लोकांचं एका कंपनीत नाही तर चार-चार कंपनीत सिलेक्शन झालेलं दिसलं, तेही भरगोस पॅकेज सोबत. यावरून स्पष्ट झालं की कोरोना काळ हा आयटी कंपन्यांसाठी सुवर्णकाळ म्हणून आला होता. मात्र कोरोना नंतरच्या काळाबद्दल जर विचारलं तर हा सुवर्णकाळ संपू शकतो, याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

म्हणूनच नक्की आयटी कंपन्यांची सध्याची स्थिती काय आहे? आयटी कंपन्यांत आलेली तेजी कमी होण्याची कारणं काय आहेत? आणि याचा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर काय परिणाम होऊ शकतो? हेच जाणून घेऊया… 

२०२१ -२२ च्या थर्ड क्वार्टरपर्यंत भारतातील आयटी कंपन्यांची जोमाने होणारी वाढ आता कमी होण्यास सुरवात झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही परिस्तिथी अजून खराब होण्याची शक्यता आहे, असं जेपी मॉर्गन या संस्थेच्या विश्लेषकांनी म्हटलं आहे. 

नोमुरा संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे की, २००० पैकी ७५० जागतिक कंपन्यांच्या आर्थिक वाढीचा वेग येत्या तिमाहीत स्लो होऊ शकतो. याचा अंदाज बांधला जातोय त्यांच्या मागच्या परफॉर्मन्सवरून. २५ मे च्या बॉंम्बे स्टॉक एक्सचेंजची आकडेवारी गेल्या महिन्यात मोठमोठ्या आयटी कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झालेला बदल दाखवतो. 

टीसीएस, इन्फोसिस, HCL टेक्नॉलॉजीज, विप्रो, टेक महिंद्रा या प्रमुख आयटी कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १०-१५ टक्क्यांची घसरण झाली आहे.

म्हणजेच गेल्या वर्षी या कंपन्या ज्या स्टेजवर होत्या त्याच स्टेजवर त्या आज परत आलेल्या आहेत. त्यांचं एकूण मूल्य कमी झालं आहे. त्यांच्या स्टॉक्समध्ये होणारी गुंतवणूक कमी झाल्याचं दिसतंय. 

मग नक्की हे सर्व का झालं आहे? 

जेपी मॉर्गन संस्थेने वाढती महागाई, पुरवठा साखळीचे प्रश्न आणि युक्रेन युद्धाचा फटका ही या मागची कारणं सांगितली आहेत. तसेच अमेरिकेतील परिस्थितीचा फटका देखील या आयटी कंपन्यांना बसला आहे. 

यासर्व कंपन्यांचा मोठा बिजनेस येतो तो अमेरिकेतून. सगळ्यात बलाढ्य देश असल्याने अमेरिकेतील परिस्थिती जगभरातील आयटीसह सर्वच क्षेत्रांवर प्रभाव करत असते.

कोरोनाचा जेव्हा काळ होता तेव्हा संपूर्ण जग बंद झालं होतं. त्यावेळी सर्वजण मोबाईल, लॅपटॉप वापरत असल्याने इंटरनेटचा खूप वापर सुरु झाला. घराच्या बाहेरच पडता येत नसल्याने सर्व सेवा घरपोच मिळणं गरजेचं होतं. 

अशात सॉफ्टवेअर हाच पर्याय होता. 

शिक्षण ऑनलाईन झालं म्हणून बायजूस, अनअकॅडमी यांसारखे लर्निंग प्स, झूम, गुगल मीट सारखे टिचिंग आणि मिटिंग प्स, झोमॅटो, स्वीगी, डेन्झो सारखे फूड अँड ग्रोसरी डिलेव्हरी प्स, ऑनलाइन शॉपिंग प्स, साईट्स अशा भरमसाठ आयटी रिलेटेड गोष्टींची मागणी वाढली. आणि ग्राहकांची मागणी पुरवण्यासाठी अमेरिकेसह जगभरातील  मार्केटमधून सॉफ्टवेअर सेवांची मागणी वाढली.

अमेरिकेसारख्या मुख्य मार्केटमधून मागणी वाढल्याने या क्षेत्राने पिकअप घेतला. मागणी पूर्ण करण्यासाठी एम्प्लॉईज भरती झाली. काम दिलं गेलं, टार्गेट दिले जाऊ लागले. 

परिणामी आयटी क्षेत्र १९४ बिलियन डॉलरचं झालं होतं.  

मात्र आता कोरोनाचा काळ संपला तसं सगळी परिस्थिती बदलताना दिसली. लोक घराच्या बाहेर पडू लागले, आयुष्य पूर्ववत होतंय आणि या प्सचा वापर कमी होत आहे. या सगळ्यांचा परिणाम सर्वप्रथम झाला तो अमेरिकेच्या मार्केटवर. ग्राहकांची मागणीतील घसरण झाल्याने अमेरिकेच्या मार्कटमधील मागणीही कमी झालीये. 

त्यात भर पडली आहे युक्रेन युद्धाची. युक्रेन युद्ध सध्या सुरु आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झालीये. नाटोने त्यांची साथ देण्याचं ठरवलं आहे. नाटोमध्ये जगभरातील जवळपास ३० देशांचा समावेश आहे. त्यामुळं जगात कधीही काही होऊ शकतं या विचाराने मार्केट सेंसिटिव्ह झाल्याचं दिसतंय. म्हणून अजूनच इन्व्हेस्टसाठी कुणी धजावत नाहीये. 

सोबतच अमेरिकेमध्ये महागाई वाढली आहे. महागाईमुळे व्याजदरात वाढ झाली आहे. मंदीची भीती निर्माण झाल्याने गुंतवणूक मिळणं कठीण झालं आहे, नवीन क्लायंट मिळणं कठीण झालंय. अशाने तिथली आर्थिक वाढ कमकुवत होऊ लागली आहे, ज्याचा थेट परिणाम आयटी सेक्टरवर होतोय. 

तर पुरवठ्याबद्दल बोलायचं झाल्यास आयटी क्षेत्रात काम करणारी लोकं एकाठिकाणी तग धरून राहत नाहीये. काही जण ऑफिसमधून काम करण्यास तयार आहे तर कुणी वर्क फ्रॉम होम घेत आहेत. त्यातच नवीन आयटी कंपन्या, स्टार्टअप्स यांच्याकडून चांगलं पॅकेज देउन मोठ्या आयटी कंपन्यांसाठी स्पर्धा निर्माण करतायेत. म्हणून प्रोजेक्ट पूर्ण करण्याची क्षमता कमी झाली आहे. 

एम्प्लॉइजला टिकून धरायचं असेल तर जास्त पगार द्यावा लागेल मात्र ते कंपन्यांना परवडणारं नाहीये कारण त्यांच्या कमाईतच घसरण होतेय. बिजनेसच स्थिर नाहीये. 

आता शेवटचा मुद्दा म्हणजे याचा आयटीमध्ये काम करणाऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो?

करोना काळात ज्याप्रकारे मोठ्ठी पॅकेजेस मिळत होती तशी आता मिळण्याची शक्यता कमी असणार आहे आणि पगारवाढही पहिल्यासारखी नसणार आहे. आणि जर या कारणामुळे एम्प्लॉयी कंपनी सोडण्याचा विचार करत असेल तर कंपन्या देखील त्यांना थांबण्याचा प्रयत्न करताना दिसत  नाही. 

एकूणच काय तर टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यासारख्या मोठ्या कंपन्यांची करोनकाळात झालेली भरभराट आता कमी होताना दिसत आहे ज्याचा परिणाम संपूर्ण आयटी क्षेत्रावर झालेला दिसेल. 

तुम्ही जर आयटी क्षेत्रात काम करत असाल तर तुमचं यावर काय मत आहे? ते आम्हाला खाली कमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.