आणि अशाप्रकारे “टेंभी नाका” ठाण्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होत गेला..

धर्मवीर सिनेमा आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सार्वधिक चर्चा झाली ती आनंद दिघे यांच्या नावाची आणि त्यांच्या टेंभी नाक्यावरच्या कामाची. परत एकदा टेंभी नाका चर्चेत येण्याचे कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी आल्या.

टेंभीनाका म्हटले की आनंद दिघे यांचं नाव घेतल जात.

कशा प्रकारे टेंभी नाका हा राजकारणाचा केंद्र बिंदू ठरत गेलं, ते पाहुयात.   

आनंद दिघे हे ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले. 

पुढे ते ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले होते. एक झपाटलेला कार्यकर्ता, शिवसेना आणि बाळासाहेबांवर निस्सीम प्रेम करणारा कार्यकर्ता अशी आनंद दिघेंची ओळख होती. १९८० नंतर आनंद दिघे यांचे राजकारणात वजन वाढत गेलं, तसे टेंभी नाक्याला महत्व प्राप्त होत होत गेलं. 

आनंद दिघे यांनी १९७६ -७७ मध्ये ठाण्यातील टेंभी नाक्यावर कार्यालय सुरु केलं. पारशी ट्रस्टच्या जागेला लागून असणाऱ्या जागेत आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावरील कार्यालय सुरु केलं होत. या जागेवर पारशी ट्रस्टने दावा केला होता. आनंद दिघे कार्यालय खाली करून ती जागा पारशी ट्रस्टला देणार होते. नंतर पारशी ट्रस्टने ही जागा पक्षाला दिली.   

आनंद दिघे याच कार्यालयात जेवायचे, झोपायचे. लोकांना भेटायचे, त्यांच्या समस्या सुद्धा इथेच सोडविल्या जात होत्या.  दिघे यांच्या सोबत त्यांचे जवळचे २ ते ३ कार्यकर्ते आणि एक कुत्रा इथे राहायचा. पहाटे ४ पर्यंत जनता दरबार भरलेला असायचा. त्यांचं हे कार्यालय नेहमी गर्दीने भरलेलं असायचं.   

दिघे यांच्या या कार्यालयाला आनंद आश्रम, आनंद मठ असं लोक म्हणत. 

यानंतर दिघेंनी टेंभी नाक्यावर सर्वप्रथम नवरात्र उत्सव,पहिली दहीहंडी सुरू केली होती. त्यामुळं त्यांना ‘धर्मवीर’ म्हटलं जाऊ लागलं. 

मुंबई, ठाण्यात देवीचा उत्सव जास्त प्रमाणात साजरा केला जात नव्हता. उत्सवाची सवय सुद्धा इथल्या लोकांना नव्हती. आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावर जय अंबे संस्था स्थापन करून नवरात्रोत्सवाला सुरुवात केली. हा उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जात होता. 

टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवासाठी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा देखावा गणेशोत्सवानंतर नेण्यात येत असे. टेंभी नाक्यावरील जागा मोठी नसली तरीही दगडूशेठ हलवाई प्रमाणेच डेकोरेशन करण्यात येई. आनंद दिघे आणि दगडूशेठ गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे हे चांगले मित्र होते. आनंद दिघे पुण्यात आल्यावर दगडूशेठ हलवाईच्या गणपती दर्शनासाठी जायचे.     

 टेंभी नाक्यावरचा नवरात्रोत्सव हा भव्य दिव्य असल्याने ठाण्याच्या आजूबाजूच्या तालुक्यातुन, जिल्ह्यातुन लोक ते बघायला येऊ लागले होते. उत्सव पाहण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी यांनीही हजेरी लावली होती. 

महाराष्ट्रात सगळ्यात आधी मोठ्या प्रमाणात आणि लाखोंचे बक्षिस असणारी दहीहंडी आनंद दिघेंनी टेंभी नाक्यावरच सुरु केली. ही दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई आणि आसपासचे नामांकित गोविंदा पथक येऊ लागले होते. त्याकाळात फक्त दूरदर्शन हे एकच चॅनेल होते. दूरदर्शनवर लाईव्ह कार्यक्रम दाखवायला सुरुवात झाली होती. पहिल्यांदा दहीहंडी उत्सव लाईव्ह दाखवण्यात आला होता तो उत्सव टेंभी नाक्यावरचा होता. 

२००१ मध्ये आनंद दिघे यांचे निधन झाले. तो पर्यंत दिघे हे टेंभी नाका येथील कार्यालयातच राहायचे. निधनानंतर त्यांचे पार्थिव टेंभी नाक्यावरील कार्यालयात ठेवण्यात आले होते.

याबाबत बोलतांना ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर यांनी सांगितले की,  

नवरात्रोत्सव, दहीहंडी आणि शिवजयंती टेंभीनाक्यावर हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत होते. तसेच टेंभी नाक्यावरील कार्यालयात आनंद दिघे राहायचे. इथे पहाटे ४ वाजेपर्यंत लोक त्यांना भेटायला यायचे. सगळी कामे घेऊन लोक त्यांच्या याच कार्यालयात यायचे.   

शिवसेने संदर्भातील कुठलाही निर्णय असुद्या ठाण्यातील सगळे शिवसैनिक टेंभी नाक्यावरच जमत, त्यामुळं या जागेला मोठं राजकीय वलय प्राप्त झालं.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.