फक्त ५ दिवसात बनलेली मौका मौका जाहिरात, सगळ्या जगानं उचलून धरली होती…

एक ११९७ सालचा किस्सा सांगतो, पार लांब तिकडं कॅनडामध्ये भारत-पाकिस्तान मॅच सुरू होती. त्या कपचं गोंडस नाव होतं, फ्रेंडशिप कप. भारत आणि पाकिस्तानची क्रिकेटच्या मैदानावरची मैत्री म्हणजे जावेद मियांदाद आणि किरण मोरे, आमिर सोहेल आणि व्यंकटेश प्रसाद अशी उदाहरणं.

 पण त्या फ्रेंडशिप कपमध्ये खतरनाक किस्सा झाला, एका भारतीय चाहत्यानं इंझमाम उल हकला आलू आलू चिडवलं. इंझमाम पेटला आणि स्टॅन्डमध्ये घुसून त्या कार्यकर्त्याला हाणला, प्रकरण लई गाजलं.

आता हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे नुकताच आपला कॅप्टन रोहित शर्मा एका पाकिस्तानी फॅनला मिठी मारण्यासाठी स्टेडियममधनं बाहेर गेला. फुल गोडगोड वातावरण. आता भारत पाकिस्तानची मॅच म्हणलं की ना मैदानात राडे होतात ना मैदानाबाहेर.

आपल्याला उगा मुन्नाभाईसारखं ‘चिंकी तू बहोत चेंज होगयली रे’ असं म्हणावं वाटतं.

बाकी गोष्टी चेंज झाल्या त्याचं दुःख वाटत नाही, पण भारत पाकिस्तान मॅच तोंडावर आली आणि तरी ‘मौका मौका’ची जाहिरात नाही, म्हणजे कायतर मेजर गंडलंय राव.

कधीकाळी खतरनाक लोकप्रिय झालेली ही जाहिरात कशी बनली होती याचा किस्साही जाहिरातीसारखाच भारी आहे.

२०११ चा क्रिकेट वर्ल्डकप भारतात झाला होता, त्यावर्षी जसा धोनीचा छकडा लक्षात राहिला अगदी तशाच पेप्सीनं बनवलेल्या जाहिरातीही. त्या कार्यकर्त्यांनी पार तिलकरत्ने दिल्शानला साडीच्या दुकानात उभं केलं आणि बिली बाऊडनला ढाब्यावर जेवायला बसवलं.

त्यामुळं २०१५ च्या वर्ल्डकपलाही स्टार स्पोर्ट्सला कायतर दणका उडवून द्यायचा होता. त्यांनी बनवलेली वी वोन्ट गिव्ह इट बॅक ही जाहिरात काय लय चालली नव्हती. त्यामुळं त्यांचंही टेन्शन वाढलं होतं.

स्टार स्पोर्ट्सच्या क्रिएटिव्ह लोकांनी लय डोकं लावलं, त्यांना आयडिया सुचली होती ती भारत विरुद्ध पाकिस्तानच्या रेकॉर्डची. कारण तोवर पाकिस्ताननं भारताला कधीच वर्ल्डकप मॅचमध्ये हरवलं नव्हतं. कायतर भारी करायचं काम त्यांनी दिलं, बबलरॅप फिल्म्स नावाच्या कंपनीला. बरं तेव्हा ही कंपनी सुरु होऊन सहाच महिने झाले होते.

जसा सचिन पहिल्याच मॅचला वसीम-वकारसमोर उभा राहिलेला तशीच  यांची गत झाली. २२ जानेवारीला बबलरॅपला हे काम दिलं गेलं आणि डेडलाईन होती, ७ फेब्रुवारीला जाहिरात ऑन एयर जाणार. विषय कट.

बबलरॅपवाल्यांना एक गोष्ट माहिती होती, की भारत पाकिस्तान वर्ल्डकप मॅच म्हणजे लय मोठा प्लॅटफॉर्म आहे. इथं आपला जॅक लागला, तर आपण स्टार होत असतोय. कंपनीचे डायरेक्टर सुरेश त्रिवेणी,  फाऊंडर प्रोड्युसर केतकी गुहागरकर सुर्वे, फ्रीलान्स म्युझिक डायरेक्टर्स विनायक साळवी आणि रोहन उत्पात आणि बबलरॅपच्या टीमनं खुंखार डोकं लावलं. 

त्यांची बेसिक कन्सेप्ट एकच होती, दोन्हीकडच्या पब्लिकला जाहिरात क्लिक झाली पाहिजे आणि असं गाणं बनवायचं जे ओठांवर राहिलं पाहिजे. भारत पाकिस्तान आणि गाणं या गोष्टी कुठं कनेक्ट होत असतील, तर कोक स्टुडिओ. कोक स्टुडिओमधल्या गाण्यांसारखा सुफी आणि कव्वालीचा बाज या जाहिरातीत वापरायचा ठरला.

हातात दिवस कमी होते, पण विनायक साळवी आणि रोहन उत्पात या जोडीनं आलमगीर खान या पंजाबी सिंगरला टीममध्ये घेतलं, स्टार स्पोर्ट्सच्या विकास दुबेनं क्रिकेटमधला एकही शब्द न वापरता हिट होणारी जिंगल लिहिली. 

एका दुसऱ्याच जाहिरातीसाठी आलेल्या विशाल मल्होत्राला पाकिस्तानी फॅन म्हणून डावात घेतलं. एका दिवसात मौका मौकाचं गाणं लिहून झालं आणि फक्त पाच दिवसात जाहिरात शूट पण झाली.

जाहिरात लई सिम्पल होती, १९९२ पासून पाकिस्तान कसा वर्ल्डकपमध्ये भारतासमोर हरत आला आणि २०१५ उजाडलं, तरी एकदाही त्या पाकिस्तानी फॅनला फटाके फोडायचा मौका काय मिळाला नाही, हेच त्यातून दाखवण्यात आलं होतं. त्यात प्रत्येक वर्षी बदलणारा टीव्ही आपल्याला तिकडच्या फोडाफोडीची आठवण करुन देत होता. 

त्यामुळंच ‘ओ रब्बा कब आयेगा तेरा मौका’ ही गाण्यातली लाईन परफेक्ट सुट होत होती. भारत पाकिस्तान मॅचला आठवडा बाकी असतानाच ही जाहिरात युट्युबवर आली आणि जबरदस्त हिट झाली. पाकिस्तानी फॅन्सनं पण जाहिरात हलक्यात घेतली, सगळीकडे फक्त या मौका मौकाचीच चर्चा होती.

जाहिरात जशी हिट झाली, तसं स्टार स्पोर्ट्स आणि बबल रॅपच्या टीमनं ठरवलं की त्यावर्षी भारताच्या प्रत्येक वर्ल्डकप मॅचनंतरच्या जाहिरातीत हीच थीम कायम ठेवायची. मग भारत साऊथ आफ्रिकेसमोर जिंकला नाही, म्हणून आफ्रिकन प्लेअर्स भारताला मौका मौका चिडवत फटाके आणून देतात अशी जाहिरात, पाकिस्तानी कार्यकर्ता प्रत्येक टीमची जर्सी घालून फटाके फोडायची वाट बघतोय अशी जाहिरात, असे अनेक सुपरहिट प्रयोग स्टार आणि बबलरॅपच्या टीमनं केले. 

समजा भारत हरला तर टाकता येईल अशी जाहिरातही प्रत्येक वेळेस तयार असायची, मात्र भारतीय टीमनं सलग ६ मॅचेस मारल्या आणि हरलेली जाहिरात टाकायची गरजच पडली नाही. नेमकी सेमीफायनलला माती झाली. 

तेव्हा पाकिस्तानी फॅन्सनं काढायची ती मापं काढली, पण त्यांना हरवलेलं त्यामुळं एवढं वाईट वाटलं नाही.

त्यानंतर २०१९ च्या वर्ल्डकपला मौका मौकाची जाहिरात दिसली, २०२१ च्या टी२० वर्ल्डकपलाही दिसली. या टी२० वर्ल्डकपवेळी मात्र पार जुने फटाके रिप्लेस मारण्यापासून ते टीव्ही फोडायच्या प्रथेपर्यंत पाकिस्तानची लई चेष्टा करण्यात आली. पण यावेळी पाकिस्ताननं मौका साधला. भारत पहिल्यांदा वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसमोर हरला आणि तेही १० विकेट्सनं. 

२०१७ मध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलला पाकिस्तानसमोरच हरला, तेव्हा त्यांचा कॅप्टन जांभई स्पेशलिस्ट सर्फराज खाननं कराचीमध्ये मौका मौका गाणं म्हणलं होतं, पाकिस्तानवाल्यांनी भारताला डिवचायला नो इश्यू लेलो टिश्यू अशी जाहिरातही बनवली होती. मात्र खरं दुःख २०२१ च्या टी२० वर्ल्डकपला हरल्याचं झालं, त्यामुळं आपलं रेकॉर्ड तर तुटलंच पण मौका मौका म्हणायची संधीही गेली.

 आजही ती मॅच आठवली की ऍलेक्साला दर्दभरी गाणी लावायला सांगायचं, पण लोड घ्यायचा नाही कारण एशिया कप आणि महिन्यावर आलेला टी२० वर्ल्डकप भारताला दोन मौके आहेत. रिझल्ट काहीही लागला तरी मौका मौका जाहिरातीला तेव्हाही तोड नव्हती आणि आत्ताही नाहीये.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.