आज लंकेची पार्वती झालेल्या टीना अंबानीच्या मागे एकेकाळी निम्मा भारत वेडा झाला होता

टीना अंबानी. सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीची बायको, कै.धीरूभाई अंबानी यांची सून आणि भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेशभाई अंबानी यांची वहिनी अशी आहे.

सध्या अनिल अंबानी यांच्या बिझनेसचा पडता काळ चालू आहे, कर्जाचं डोंगर डोक्यावर आलंय. इतकंच काय त्यांना टीना भाभीचे दागिने देखील विकावे लागले आहेत.

आज लंकेची पार्वती बनलेल्या टीना अंबानी एकेकाळी अनेक भारतीयांच्या दिलाची धडकन होत्या.

टीना म्हणजे नंदकुमार मुनीम नावाच्या गुजराती उद्योगपतीच्या नऊ मुलांपैकी सर्वात शेंडेफळ. घरात सर्वात लाडकी. दिसायला देखणी. पोरीचा एकही शब्द बाप पडू द्यायचा नाही. टीना मुंबईच्या सर्वात प्रतिष्ठीत शाळेत शिकत होती. शाळेत असतानाचं तिला मॉडेलिंगच वेड लागलं.

दहावी झाली असेल नसेल तेव्हा तीने फेमिना मिस टीनेज प्रिन्सेस ऑफ इंडिया हा खिताब पटकावला. त्याच वर्षी मिसटीनेज  इंटरकॉटीनेण्टल स्पर्धेत जगात दुसरी आली. तेव्हाच तिची हवा सुरु झाली होती.

मग काय  बॉलीवूडने तिच्यावर ऑफरची बरसात सुरु केली. पण तिला साईन केलं सदाबहार रोमांटिक देवआनंद साहेबांनी.

वयाच्या विसाव्या वर्षी देसपरदेस या सिनेमातून तिने पिक्चर मध्ये एन्ट्री केली. देव आनंद सुरवातीपासून शौकीन. ते कोणत्याही पार्टीत जाताना टीना त्यांच्या सोबत दिसू लागली. गॉसिप सर्कलमध्ये पसरले कि पन्नाशीतल्या देवआनंदने तिला पटवले.

पण फक्त काहीच लोकांना ठाऊक होत कि तिच खर चक्कर चालेलं संजू बाबा बरोबर.

संजय दत्त आणि टीना एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. तेव्हा पासून संजूची ती गर्लफ्रेंड होती. कर्ज सिनेमाच्या शुटिंग सुरु असताना तिची जवळीक ऋषी कपूर बरोबर वाढली आहे असं कोणीतरी संजय दत्तला सांगितल. संजूबाबा अगोदर डोक्याने जड त्यात त्यात तरुण रक्त.

तो डायरेक्ट ऋषी कपूरला ठोकायचं म्हणून आपला दोस्त गुलशन ग्रोव्हरला घेऊन ऋषीच्या घरी पोहचला.

योगायोगाने ऋषी कपूर घरात नव्हता.(नक्की माहित नाही. संजय दत्त आल्यावर लपून बसला असण्याचीही शक्यता आहे. )  संजय दत्त फुल दारू पिऊन ऋषी कपूरच्या घराबाहेर ड्रामा केला.

अखेर नीतू सिंग ने कशीबशी त्याची समजूत काढून त्याला परत पाठवला.

अशी ही टीना आणि संजय दत्त यांची अल्लड प्रेमकहाणी सुरु होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पण तेवढीच त्यांची भांडणही खूप व्हायची. टीनाने संजय दत्तचा डेब्यू सिनेमा रॉकीमध्ये काम करायचं म्हणून देवआनद आणि बाकीच्यांचे सिनेमे सोडून दिले. रॉकीमधून संजूची जोरदार एन्ट्री झाली.

पण दुर्दैवाने पिक्चर रिलीज व्हायच्या आधी काही दिवसापूर्वी त्याच्या आईचे म्हणजेच नर्गिस दत्त यांचे कॅन्सरने निधन झाले.

संजय दत्त साठी हा मोठा धक्का होता. त्यातच त्याचा रॉकी हिट झाला. हे सगळ एकाच वेळी त्याच्या आयुष्यात घडत होत. ते त्याला व्यवस्थित हाताळता आलं नाही. त्यात दारू आणि ड्रग या दोन्ही व्यसनांनी त्याला घेरलं. ज्या टीनाशी तो लग्न करणार होता तिच्याशी एकदिवस जोरदार त्याच भांडण झालं. असं म्हणतात तिच्यावर त्याने हातही उगारला. त्याच दिवशी दोघांच्या रिलेशनचा शेवट झाला होता.

टीना मुनीम या सगळ्यातून बाहेर आली. तीने आपल्या करीयर वर लक्ष केंद्रित केले.

बसू चटर्जी यांचा अमोल पालेकर हिरो असलेल्या बातो बातो में सारख्या सिनेमाने तिला नव्या अर्बन युथशी कनेक्ट केलं होत. तिचा सुंदर चेहरा, मॉडर्न लुक आणि बिनधास्तपणा यामुळे तिच्या अभिनयात कच्च्या असण्याकडे कोणी विशेष लक्ष दिल नाही.

hqdefault

अशातच तिच्या आयुष्यात आला राजेश खन्ना.

अमिताभ बच्चनची एन्ट्री होईपर्यंत भारतीय सिनेमासृष्टीवर राज्य करणारा राजेश खन्ना तो पर्यंत आउटडेटेड झाला होता. तोही आपल्या निम्म्या वयाच्या या रूपगर्वितेच्या प्रेमात पडला. पण त्याचं या आधीच डिंपल कपाडिया बरोबर लग्न झालेलं होत. डिंपल त्या काळात त्याला सोडून आपल्या मुलींना घेऊन घरातून बाहेर पडली होती.

राजेश खन्ना बरोबर टीनाच्या लव्ह स्टोरीने रंग भरले. दोघांनी एकमेकासोबत दहा पंधरा सिनेमामध्ये काम केले.

दोघांची लव्ह स्टोरी सुरु आहे हे काही सिक्रेट उरलं नव्हत. एकदा तर राजेश खन्नाने एका मुलाखतीमध्ये सांगितले ,आम्ही दोघे एक टूथब्रश वापरतो.

एकदिवस टीनाचं राजेश खन्ना सोबतही भांडण झालं. तीने राजेश खन्नाला माझ्यासोबत लग्न कर म्हणून लकडा लावला होता. पण काका आश्वासन द्यायचा,

“डिंपल बरोबर घटस्फोट झाल्यावर आपण लग्न करू.”

जे कि कधीच झालं नाही. शेवटी कंटाळून टीनाने त्याच्याशी ब्रेकअप केला. तो काळ तिच्यासाठी वाईट होता.

याच काळात एका लग्नात टीनाची ओळख एका मुलाशी झाली. तिने कोणीतरी सांगितले कि तो एका गुजराती उद्योगपतीचा मुलगा आहे.

तिने त्याला पहिले तेव्हा सावळासा साध्या कपड्यांतला हा टिपिकल गुज्जू मुलगा तिला काही विशेष आवडला नाही. टीनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. 

पुढे दोघे परत एकदा भेटले तेही अमेरिकेत. त्यावेळी तिला तिच्या भाच्याने त्या मुलाची ओळख करून दिली. हा सुप्रसिद्ध बिझनेस टायकून धीरूभाई अंबानी यांचा मुलगा अनिल अंबानी.

त्याने तिला डेटिंग साठी विचारले, तेव्हा चक्क टीना मुनीम नाही म्हणाली. अगोदरच आपल्या आयुष्यात आलेल्या फिल्मी हिरोनी दिलेल्या धोक्यामुळे ती प्रेम या विषयापासून दूर राहायचं ठरवून आली होती.

तरीही अनिल अंबानी चिवट होता. खुपवेळ प्रयत्न केल्यावर एक दिवस टीना तयार झाली. 

दोघे एकमेकांना भेटू लागले. तिला तो आपलासा वाटू लागला.

आपल्यासारख्याच वातावरणात वाढलेला जरासुद्धा स्वतःच्या श्रीमंतीचा गर्व नसलेला, अबोल शांत साधा सरळ अनिल तिला हळूहळू आवडू लागला. दोघ्यांच्या अफेअरची कुणकुण अंबानी फॅमिलीला लागली. टिनाच्या अफेअरचे गॉसिप त्यांनी देखील ऐकले होते. धीरूभाईनि या नात्याला नकार दिला.

टीना मुनीम आपल्या चालू शुटींगच काम संपवून अमेरिकेला इंटेरियर डेकोरेटरचा कोर्स करायला निघून गेली. दरम्यानच्या चार वर्षाच्या काळात दोघे बोलले देखील नाहीत.

एकदिवस अनिल अंबानीला टीव्हीवर लॉस एंजलीस मध्ये भयंकर भूकंपाची बातमी दिसली. टीना तिथेच होती. अनिलने घाबरून गडबडीत तिच्याशी संपर्क साधला. तिला कशी आहेस एवढेच एका वाक्यात विचारले. तिची ख्याली खुशाली कळताच फोन ठेवून दिला.

तिच्यासाठी हे अनपेक्षित होत. एखादी व्यक्ती आपला सगळा भूतकाळ वर्तमानकाळ माहित असूनही निरपेक्षपणे एवढ प्रेम कसं काय करू शकते. टीना मुनीम अनिल अंबानीला विसरू शकत नव्हती. दोघांचे फोनवर बोलणे सुरु झाले. तो तिला नेहमी भारतात परत येण्यासाठी मनवायचा पण ती आज उद्या करून टाळायची. एक दिवस अनिल अंबानीने तिला शेवटच सांगितलं जर तू भारतात येणार नसलीस तर मी परत तुला फोन करणार नाही.

अखेर टीना मुनीम मुंबईला आली.

hqdefault 2

तिला आल्या आल्या अनिल अंबानी आपल्या घरी आईवडीलाना भेटायला घेऊन गेला. तिथे गेल्यावर धीरुभाई सकट सगळ्यांनी तिच्याशी छान गप्पा मारल्या तिला खाऊ घातलं. अनिल थोड्यावेळासाठी बाहेर गेला तेव्हा त्याचा मोठा भाऊ मुकेश टीनाला म्हणाला,

“आमच्या अनिल बरोबर लग्न करण्याबद्दल तुझ काय मत आहे?”

टीनासाठी हा मोठा धक्का होता. ति तयार झाली. पुढच्या सहाच आठवड्यात त्यांच धुमधडाक्यात लग्न झालं. टीना मुनीमची टीना अनिल अंबानी झाली होती.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.