पोरींनो, पोरं पाठलाग करतायत ? फ्रेन्डशीप मागतायत ? हे उपाय करा आणि कायमच हाकलून लावा.

खूपच ज्वलंत प्रश्न. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला प्रश्न. जनतेचा प्रश्न. हे वाचलं आणि मन भरुन आलं. मुलींच्या भावना बोलभिडूला कळल्या. कुठल्याही राजकिय पक्षाला आजपर्यन्त J1 झालं का म्हणून मुलांकडून इनबॉक्समध्ये घातला जाणारा रतीब समजला नव्हतां पण या बोलभिडूवाल्यांना समजलं. तुम्हाला मुलींची नस समजली वो… 

असुदे पोरींनो (आणि पोरींचा विषय आहे म्हणल्यावर वाचायला आलेल्या पोरांनो) भावनेला हात घालू नका वो नाहीतर कसय आम्ही पण सिंगल आहोत. चुकून कौतुक केल तर आम्हालापण J1 झालं का म्हणून विचारावं अस वाटायचं. म्हणून आपलं सुरक्षित भावनिक अंतर ठेवून विषय़ समजून सांगतो.

कसय पोरं म्हणली की सिंगलपणा आला. आत्ता सिंगलपणा आला की फेसबुकवर चांगली मुलगी बघून रिक्वेस्ट पाठवणं आलं. बर तुम्हीपण खावुदे गरिब म्हणून रिक्वेस्ट एक्सेप्ट करता पण ते शेफारलेलं असतय वो ते पुढच्या मायक्रोसेकंदाला इनबॉक्समध्ये असत. पहिला मॅसेज हाय म्हणून टाकतं. दूसरा J1 झालं का. आत्ता हि खरी उपाशी मित्रमंडळ गॅंग असते. त्यांना तिथच ब्लॉक हाणायचं असतं. पण तुम्हाला एखाद्याचं मन दुखवायला पण जमत नसतं. चार वर्ष तुमच्या कपड्या भांड्यावर खर्च केलेल्या मुलाला पण तुम्ही उदारभावनेतून, “तुला माझ्याहून चांगली मुलगी मिळेल हं” म्हणून हाकलून लावलेलं असतं.

आत्ता या J1 (जेवण) झालं का वाल्यांना कस हाकलायचं म्हणून दुर्लक्ष करता. परत हे डोक्यात जातं. तुम्ही बोलता मग हा डेटला येणार का विचारतो. कसय तुम्हाल पण भारी वाटतं कधीकधी पण हा काय शुद्ध बावळटपणा. डेट काय डेट म्हणून टाळता. 

पण, हा सगळा वरती सांगितलेला मॅटर ओळखीतल्या, फ्रेन्डझोनवाल्या, शॉपिंगवाल्या मुलाने विचारला की जरा मन दुखवायचं जड जातं. मग त्यावर एकसे एक उपाय शोधायला लागतात. तर पोरींनो लाजू नका इथे आम्ही उपाय सांगायलाच बसलोय यासाठी कुठली शांती घालायला लागत नाही की, कुठं पत्रिका बघायला जायला लागत नाही. अगदी घरबसल्या पोरांना हाकलून लावण्याचे एकसे एक उपाय इथ आहेत. टेन्शन घ्यायचं काम नाही, इलाज होणार म्हणजे होणार. 

मुद्दा क्रमांक एक.  

पंरपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन. 

परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन म्हणजे थोडक्यात आपला बाप हा गुरूकुलचा बच्चन आहे याचा भास पोरांपुढे तयार करायचा. म्हणजे कस तर मी आले असते रे पण पप्पांना आवडत नाही. आमच्या घरी चालत नाही. असे डॉयलॉग पाच रुपये किलोच्या भावाने सारखे तोंडावर फेकून मारत रहायचं. काहीही झालं की, तो विषय पप्पांच्या कडक अनुशासन पर्वाकडे घेवून जायचा. त्यामुळे काय होतं पोरगं आतनं तुमच्या वडिलांना भिवू लागतं. कशाला फंद्यात पडा म्हणून नाद सोडतं. पण हा बऱ्याच मुलींकडून इथे एक घोळ होतो. पप्पांच्या ऐवजी त्या भावाची भिती घालायला जातात. लक्षात ठेवा प्रिन्स भैय्या सोडले तर जगातला कुठलाच मुलगा मुलगीच्या भावाला भिल्याची नोदं इतिहासात नाही. तुम्हाला तुमचा भाऊ कितीही प्रिन्सभैय्या वाटत असला तरी तस नसतं. त्यामुळे थेट वडिल हाच उपाय योग्य असतोय. 

मुद्दा क्रमांक दोन. 

व्यस्त व्यस्त व्यस्त.. 

हा उपाय सर्वात भारी. का ? तर माझ्या स्वत:वर चार पाच मुलींनी हा प्रयोग केलाय. थोडक्यात खूप काम असत रे म्हणून मला त्यांनी थेट कात्रजचा घाट दाखवला आहे. आत्ता त्या काहीच करत नव्हत्या तरी घरी खूप काम असतं.  व्हॉटसअपला online दिसत असत असला तरी भावाकडे होता रे फोन वगैरे वगैरे टाईप कायमची उत्तरे द्यायची. जॉबला असला तर हा उपाय १०० टक्के रिझल्ट देणारा असतोय. जर तुम्ही जॉब करत नसला तर भांडी म्हणू नका, कपडे म्हणू नका, अंथरुण पांघरुण, घरातल्या गाड्या, शेजारच्या घरातल्या गाड्या अस जगात काय असेल नसेल ते सगळ तुम्हाला धुवायला लागतय, त्यात खूप वेळ जातो अस बिंनधास्त सांगून टाका. बिझी बिझी खेळल्यामुळे पोराला कळून जातं पटली तरी काही उपयोग नाही तो आपणहून नाद सोडतो. 

मुद्दा क्रमांक तीन. 

मुड नाही रे… 

मुड आत्ता या मुडचं काय करायचं. काहीच नाही. जगातला कुठलाच पुरूष महिलांच्या मुडबद्दल काहीही करु शकत नाही. आणि हाच सर्वात जबराट उपाय असतो काहीही होवो तिकडं भर चौकात विमान पडलय आणि सगळं गाव ते बघायला चाल्लय तरी आपण मुड नाही म्हणून सांगायचं. काहीही फरक पडत नाही. अगदी विमानाला कळलं की तुमचा मुड नाही म्हणून तुम्ही बघायला आला नाही तर आकाशातनं पडलेलं विमान देखील परत उडून आकाशात जातं. ह्या पोरांच काय टेन्शन. पण ठेका चुकवायचा नाही. मुड नाही हा एकच ठेका आजीवन कायम ठेवायचा. चुकून मुड झाला वगैरे असल्या मुद्यावर यायचं नाही. काहीही होवो मुड नाही हे एकच उत्तर.

मुद्दा क्रमांक चार.. 

हा शेवटचा आणि अतिमहत्वाचा मुद्दा. काय करायचं तर थेट नाही म्हणून सांगायचं. थेट म्हणजे थेट कोले. बाबा रे तु माकडासारखा दिसतोस मला इंटरेस्ट नाही म्हणून सांगायचं. कसय पाच दहा तास मनाला त्रास होतो पुढच्याच्या पण तो नाद सोडतो. आणि कसय एखाद्याला उगीच गंडवल्याच ओझ पण मनावर रहात नाही. त्यामुळे शेवटचा उपाय हा सर्वात बेस्ट. 

बाकी पोरींनो, ते J1 वाल्यांची काळजी घेत चला. तुमच्या आठवणीत एखादा जेवत नसला तर बिचारा कुपोषणानं मरायचा. बाकी आम्ही सिंगल भिडू लोक आहोतच फुकटचे सल्ले देवून इंप्रेशन टाकायला. 

हे ही वाचा.