त्यांनी आपल्या कंपन्या पळवल्या तर आपण त्यांचा गरबा ; अर्थात गरबा महाराष्ट्रात कसा आला

परवा परवा सोशल मिडीयावर एक मीम व्हायरल झालं होतं. या मीममध्ये गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना करत असताना त्यांनी आपल्या कंपन्या पळवल्या आणि आपण त्यांचा गरबा या गोष्टीवर भाष्य करण्यात आलं होतं. रेफरन्स होता तो नुकत्याच महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचा.

आत्ता सरकार कोणतं आहे यावरून टिका-टिप्पणी होणं साहजिक आहे पण महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना ही दोन्ही राज्यांच्या निर्मातीपासूनच सुरू आहे. दोन्ही राज्यांची निर्मीती झाली झाल्यापासूनच महाराष्ट्र आणि गुजरात यांची वेगवेगळ्या पातळ्यांवरची तुलना ही कॉमन गोष्ट राहिली. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये सुप्त संघर्ष असण्याचं कारण देखील मुंबई सारखी आर्थिक राजधानी होती. त्यामुळे ही तुलना साहजिक पण वाटते.

आत्ता महाराष्ट्रातले किती उद्योग गुजरातला गेले आणि गुजरातचे किती उद्योग महाराष्ट्रात आले हा चर्चेचा विषय आहेच, पण महाराष्ट्रात गरबा कसा पॉप्युलर होत गेला हे पाहणं देखील इंटरेस्टिंग आहे..

मूळचा गुजरातचा गरबा-दांडिया महाराष्ट्रात कसा पॉप्युलर होत गेला ?

आपल्याकडे टिपऱ्या नावाचा प्रकार पहिल्यापासूनच होता. टिपऱ्या म्हणजे एक प्रकारचा दांडियाच खेळाला जायचा. आजही काही भागात मंगळागौरमध्ये टिपऱ्या खेळतात. इतकंच काय तर वारीमध्ये टिपऱ्या होत्या, जन्माष्टमीला काल्यात टिपऱ्या खेळल्या जायच्या. टिपऱ्या खेळणं महाराष्ट्रात नवीन गोष्ट नाही. 

पहिली गोष्ट तर नवरात्र आणि दसरा भारतभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.‌ प्रत्येक राज्याची आपली आपली खासियत आहे. त्यातला आपल्याला आवडतो तो भाग आपण उचलण्यात काहीच गैर नाही. म्हणूनच गुजरातचा गरबा, पंजाबचा भांगडा, दक्षिणेकडील कुचिपुडी कथकली नृत्याविष्कारांचा प्रसार झाला. जसा नवरात्रोत्सव साजरा होवू लागला तसाच दुर्गापुजेचा सोहळा देखील…

महाराष्ट्रात गरबा-दांडिया येण्याचा इतिहास मोठा लांबलचक आहे…

१९६० सालापर्यंत राजकीयदृष्ट्या गुजरात आणि महाराष्ट्र एकाच राज्य होतं. गुजरातमधला सौराष्ट्र सोडून आणि महाराष्ट्रातला विदर्भ, मराठवाडा हा भाग सोडून बाकी महाराष्ट्र हा मुंबई इलाख्याचा भाग होता. थोडक्यात गुजरात -महाराष्ट्र वेगळे नव्हते.

म्हणूनच हे दोन्ही राज्य मुळातच सांस्कृतिक दृष्ट्या हे प्रांत एकमेकांशी जोडलेले आहेत. जरी आजच्या काळात गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही प्रांत एकत्र नाहीत याचा अर्थ या प्रांतातील त्या प्रांतात आणि त्या प्रांतातील या प्रांतात काही गोष्टीं येणं साहजिकच आहे. 

आता भाषेचंच बघा ना.. 

गुजराती भाषा त्यातल्या त्यात मुंबईकरांसाठी कधीच परकी भाषा राहिलेली नाही. मुंबई हे गुजराती भाषिक लोकसंख्येतील पाचव्या क्रमांकाचे शहर आहे. भारताच्या २०११ च्या जनगणनेत असे दिसून आले की तेथील मूळ गुजराती भाषिकांची संख्या वडोदरा किंवा राजकोटमधील मूळ गुजराती भाषिकांच्या संख्येपेक्षा किंचितच कमी आहे. महाराष्ट्रात एकूण २३,७१,७४३ लोकं हे मूळ गुजराती भाषिक आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी गुजराती भाषिक लोकसंख्या ही महाराष्ट्रात आहे यावरूनच दिसून येतं कि, महाराष्ट्रातही गुजरातींची संख्या बरीच आहे.

महाराष्ट्रातलीही माणसं गुजरातमध्ये मोठ्या संख्येने आहेत. बडोद्याला आपल्या गायकवाडांचं राज्य होतं.  गुजरातमध्ये मराठी राजकीय नेते मोठ्या संख्येने होऊन गेलेत. दादूसाहेब मावळणकर हे लोकसभेचे अध्यक्ष होते ते गुजरातमधून निवडून येत. म्हणून गुजरातमध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था ही मराठी माणसांची आहे. इतिहासाची पाळेमुळे इतकी घट्ट रोवली गेलीत कि, याचमुळे दोन्ही राज्यांचा एकमेकांवर प्रभाव असणं स्वाभाविक आहे.

बरं गरबा, दांडिया महाराष्ट्रातच खेळला जातो का ? तर नाही भारतभर खेळला जातो. 

जसं गणपती फक्त महाराष्ट्रातच नाही भारतभरात बसतात. गुजरातमध्ये देखील मोठ्या संख्येने गणपती बसवला जातो. राज्यांच्या सीमांवर संस्कृती अडलेली नसते. संस्कृती हि राज्यांच्या सीमा ओळखत नाही. कोणत्याही संस्कृतीचा प्रभाव हा कायम राहतो. 

तर आपण बोलतोय महाराष्ट्रात गरबा कधी सुरु झाला ?

महाराष्ट्रात आधीच नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असत. सार्वजनिक मराठी नवरात्री सुरुवात मुंबईत आणि महाराष्ट्रात प्रबोधकार ठाकरेंनी केलेली. हे झालं अलीकडच्या काळातील. गुजराती लोकं ३०० वर्षांपूर्वी इकडे यायला लागली आली ती त्यांच्यासोबत त्यांची संस्कृती घेऊन आली.

फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात गुजराती लोकं आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावांत (अपवाद सोडता) १/२ गुजराती कुटुंब राहतात. गावागावात वाण्याचं दुकान असायचं ते गुजराती माणसाचं असायचं. ४०० वर्षांपूर्वी आपल्या भागात खूप मोठा दुष्काळ पडला जो अनेक वर्षे चालला होता. त्या दुष्काळात त्याकाळातली ज्या व्यापारी जमाती होत्या त्या देशोधडीला लागल्या आणि त्याची जागा हळूहळू गुजराती लोकांनी घेतली.  

गुजरात मधील अनेक मोठं-मोठे वकील, राजकारणी, साहित्यिक मराठी होते. काका कालेलकर हे नाव मराठी पार्श्वभूमीतूनच आलेलं आहे. ते गुजरातमधले महत्वाचे लेखक होते. संस्कृती काय इकडे-तिकडे जात असते. त्याच्यामुळे महाराष्ट्र गरबा-दांडिया सुरु झाला. 

पण हे गरबा-दांडियाचं प्रस्थ महाराष्ट्रात कधी वाढलं ???

यात जागितिकीकरणाची भूमिकाही महत्वाची ठरते. ८० च्या दशकात गरबा-दांडियाचा प्रकार आकर्षक पद्धीतीने मांडला गेला. १९८४ मध्ये राजीव गांधींच्या काळात दुरदर्शन देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले. त्या माध्यमाने प्रत्येक राज्यातल्या चालीरीती, सण, उत्सवांच्या पद्धती Audio Visually बघायला मिळत होत्या. केबलवर लाईव्ह प्रोग्रॅम व्हायला लागले. इथल्या तरुण वर्गाने जे जे नवं, आकर्षक दिसेल त्याचं अनुकरण करायचं सुरु केलं.

याच १९८० च्या दशकात गरबा हा व्यावसायिक बनला. कसा तर तो एखाद्या कार्यक्रमाप्रमाणे आयोजित केला जायचा, त्याचे पासेस मिळत गेले. यात भर पडली सिनेमांची. १९८८ मध्ये अनिल कपूर- माधुरी दीक्षितचा तेजाब पिक्चर आला होता. त्यात मुंबईच्या महिममध्ये सुरु असणारा गरबा-दांडियाचा एक सिन दाखवला आहे.

पिक्चरमधून गरबा-दांडिया पुढं आणण्यामागे एक सिक्वेन्स आहे. या काळात अभिनेता गोविंदा देखील फिल्मइंडस्ट्री मध्ये यायला लागला होता. गोविंदाचे डिस्को ८६ असे पिक्चर आले होते. लोकांना डिस्को डान्स वैगेरे कन्सेप्ट माहिती होऊ लागली. यादरम्यान डिस्को दांडिया नावाचा एक प्रकार आला होता. डिस्को डान्स, गरबा-दांडिया असं मिक्स्चर गरब्यातही दिसू लागलं.  आधुनिक वाद्यांवर गरब्याची गाणी वाजू लागली. सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे लोकं तसा गुजराती,राजस्थानी पेहराव करूनच गरबा, दांडियाला हजेरी लावत. अशा पद्धतीने गरब्याची लोकप्रियताही वाढत गेली. 

यात नवीन गायकांची भर पडली…. 

मुसा नावाचा एक मुस्लिम गायक देखील गरबा दांडियाची गाणी गाणारा म्हणून बराच गाजलेला गायक होता. फाल्गुनी पाठक, प्रीती पिंकी अशा गायकांची भर पडत गेली. त्याच बरोबर संगीत आलं. बाबला नावाचा संगीतकार होता. हळूहळू गाणी, संगीताचा फॉरमॅट बदलत गेला तसं दांडिया गरबा व्यापक होत गेला लोकांना तो आता आपलासा वाटत गेला.

बरं आपल्यावरच गुजराती संस्कृतीचं आक्रमण वैगेरे झालं अशातली बाब नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं  गुजरातवर सांस्कृतिक आक्रमण झालं आहे. आजची मुंबईतील अशी परिस्थिती आहे जितक्या घरात गणपती बसतो तितक्याच गुजराती लोकांच्याही घरी गणपती बसतो. तेही मराठी आरत्या वैगेरेच म्हणतात. मध्यंतरी आदेश बांदेकर यांनी मुंबईत ‘मराठी गरबा’नावाचा प्रकार आणला होता. पण गरबा हा खरा गुजरात्यांची ओळख होती. तशी महाराष्ट्राची ओळख नव्हती पण इथे तो अशा पद्धतीने रुळत गेला.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.