क्रिकेटमध्ये अंपायर कसं बनता येतं..? अंपायरला पगार किती असतो..?
भारतीय अंपायर नितीन मेनन यांना आयसीसीनं आपल्या एलिट अंपायरच्या लिस्टमध्ये कायम ठेवलंय. सिम्पल भाषेत इंटरनॅशनल मॅचेसमध्ये नितीन मेनन आपल्याला अंपायर म्हणून दिसणारेत.
नितीन मेनन माणूसच लई वाढीव ए. त्यांचे यांचे वडील नरेंद्र क्रिकेटर होते, नितीनही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन क्रिकेटर झाले.
अरे वा..! संघातली जागा गेल्यावर नरेंद्र मेनन यांनी अम्पायरिंगचा रस्ता धरला.
नितीन यांचं करिअर संपलं आणि त्यांनीही अम्पायरिंगचीच वाट धरली. पुन्हा एकदा अरे वा!
तर हा, नितीन मेनन यांना अंपायर होण्यासाठीचं सगळं मार्गदर्शन त्यांच्या वडिलांनी केलं होतं. आपल्याला हे असलं मार्गदर्शन मिळालं असतं, तर आपण सचिन, धोनी, बुमराह नाही, तर निदान बिली बाऊडन झालो असतो आणि आपल्या नावानं सैराटमध्ये कॅरॅक्टर असतं. काहीच नाही, तर निदान केस वाढवलेल्या पश्चिम पाठक काकांसारखे फेमस तरी झालो असतो.
जाऊद्या लय भूतकाळात रमायला नको, कारण मनात आणलं तर तुम्ही आत्ताही अंपायर होऊ शकताय. कसं व्हायचं? काय करायचं? पैसे किती मिळणार? सगळं सांगतो.
अंपायर बनण्याची प्रोसेस जाणून घेण्यासाठी बोल भिडूनं सध्या बीसीसीआय पॅनल अंपायर म्हणून काम करत असलेले रोहन इंगवले यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी सगळी प्रोसेस अगदी विस्कटून सांगितली. तर भावी बिली बाऊडेन होण्याच्या प्रोसेसमधला पहिला टप्पा असतोय, क्रिकेटवरचं प्रेम. म्हणजे तुम्हाला क्रिकेट हा लय रटाळ गेम वाटत असला, तर तुम्ही काय अंपायर बनू शकत नाय. पॅशन पाहिजे भिडू पॅशन. अंपायर बनायला स्पर्धात्मक क्रिकेट खेळलंच पाहिजे असं काही नसतं. तुम्ही गल्ली क्रिकेट चॅम्पियन असलात तरी अंपायर बनू शकताय.
यासाठी पहिला टप्पा असतोय तो म्हणजे परीक्षा.
आपण ज्या जिल्ह्यात राहतो, तिथलं जिल्हा क्रिकेट असोसिएशन भावी अंपायर्ससाठी एक परीक्षा घेतं. ही परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला राज्याच्या क्रिकेट असोसिएशनची परीक्षा द्यायची असते. या दोन्ही परीक्षा पास झाल्यावर, तुमची स्टेट पॅनेल अंपायर म्हणून निवड होते.
ज्याच्या अंतर्गत तुम्ही अंडर-१४, अंडर-१६ च्या स्टेट असोसिएशनच्या इन्व्हिटेशन मॅचेसमध्ये अम्पायरिंग करु शकता. तिथं तुमची कामगिरी चांगली झाली, तर अंडर-१९ आणि सिनिअर गटाच्या इन्व्हिटेशन मॅचेसमध्ये संधी मिळू शकते. थोडक्यात इथं तुम्ही राज्यातल्या मॅचेसमध्येच अम्पायरिंग करता.
पुढचा टप्पा असतोय, पुन्हा एकदा परीक्षा.
स्टेट पॅनलनंतर संधी असते बीसीसीआय पॅनल अंपायर म्हणून काम करण्याची. जर तुमचं स्टेट अंपायर म्हणून काम चांगलं असेल, तुमचे निर्णय अचूक असतील, तर तुमच्यासह एकूण २५ जणांची नावं स्टेट असोसिएशन बीसीसीआयकडे पाठवतं.
मग या २५ जणांच्या दोन खतरनाक परीक्षा होतात. पहिली असते, लेव्हल १ ची. यात एमसीसी लॉजबद्दल प्रश्न विचारले जातात, इथं ८० पेक्षा जास्त मार्क्स मिळवले तर तुम्ही पास. मग तुम्हाला पडणार स्वप्न, बिली बाऊडन बनण्याचं. झोपेतही तुमचं बोट आऊटचा इशारा देणार.
पण जरा स्वप्नातून बाहेर या कारण लेव्हल २ ची परीक्षा लय हार्ड असते. यात लेखी परीक्षा असते, व्हायवा असते आणि प्रॅक्टिकलही. व्हायवामध्ये काही व्हिडीओ दाखवून प्रश्न विचारतात, प्रॅक्टिकलमध्ये थेट मॅचमध्ये उभं करतात.
या सगळ्याचं कॅल्क्युलेशन होऊन जर तुम्हाला ९० मार्क्स पडले, तर अभिनंदन तुम्ही बीसीसीआय पॅनल अंपायर झालात. इथं तुम्ही देशांतर्गत स्पर्धांमध्ये अंपायर म्हणून काम करता आणि कामगिरी अगदी अचूक असली, आणि आयसीसीलाही आवडली तर गावात तुमचा इंटरनॅशनल अंपायर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा फ्लेक्स हजार टक्के लागत असतोय.
तुम्ही म्हणाल भिडू कसला सिम्पल विषय ए.
लगेच तयारी करायला घेतो. पण जरा थांबा, स्ट्रॅटेजिक टाईमआऊट घ्या. एकवेळ स्टेट पॅनलपर्यंत मजल मारणं सोपं आहे, पण बीसीसीआय पॅनलमध्ये अंपायर म्हणून सिलेक्ट होणं हा मोठा टास्क असतोय. कारण बीसीसीआय त्यासाठीच्या परीक्षा नेहमीच घेते असं नाही.
जेव्हा त्यांना वाटतं की, आपल्याकडे अंपायर्सचा तुटवडा आहे, तेव्हाच ते परीक्षा घेतात. या परीक्षांमधलं अंतर कधी ५ वर्षांचं असतं, तर कधी १०-१५ वर्षांचं. त्यामुळं पोस्ट कधी निघणार हे काय फिक्स सांगता येत नाही.
अंपायर्ससाठी बीसीसीआयनं शेवटची परीक्षा घेतली होती, २०१६ मध्ये. लेव्हल १ आणि लेव्हल २ या दोन परीक्षांमधला कालावधी ३ वर्षांचा होता. परीक्षेसाठी तब्बल ७०० विद्यार्थी होते आणि त्यातले सिलेक्ट झाले फक्त १८ जण. फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर, ३० जणांपैकी फक्त दोघांचीच बीसीसीआयच्या पॅनलवर निवड झाली.
त्यामुळं दिसायला भारी वाटत असलं, तरी पोस्ट निघणं, त्यानंतर तुमच्या स्टेट असोसिएशननं तुमच्या नावाची शिफारीस करणं, तुमचं वय २० वर्षांपेक्षा जास्त आणि ४५ वर्षांपेक्षा कमी असणं, असे अनेक विषय डन झाले, तरच तुमचं बोट बिली बाऊडनसारखं वर जाऊ शकतं, नायतर आपला कीबोर्ड आहेच.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसे. अंपायरला पगार किती मिळतो ?
जर तुम्ही स्टेट पॅनलवर अंपायर असलात, तर तुम्हाला मॅच असली की दिवसाला हजार-पंधराशे रुपये मिळतात. पण जर तुम्ही बीसीसीआयच्या पॅनलवर अंपायर म्हणून सिलेक्ट झालात, तर तुम्हाला मॅचवेळी एका दिवसाचे ३० हजार रुपये मिळतात. डोमेस्टिक क्रिकेटमधल्या मॅचेस १, २ किंवा ४ दिवसांच्या तरी असतातच, यावरुन कमाईचा अंदाज लावा.
पण कसंय हा २ हजारांचा गॅप भरुन काढायला, तुमच्याकडे प्रचंड संयम पाहिजे. ज्यावेळी तुम्ही फॉर्मात आहात त्यावेळी जागा निघायला पाहिजेत, दोन्ही लेव्हलच्या परीक्षा पास व्हायला पाहिजेत. तुमच्याकडचा प्रामाणिकपणा, मानवी मूल्य, मॅन मॅनेजमेंट आणि खडतर प्रसंगाना सामोरं जाण्याची क्षमता हे गुणही महत्त्वाचे असतात.
अंपायर रोहन इंगवले सांगतात,
“इंटरनॅशनल अंपायर झाल्यावर दिवसाला लाखात पैसे मिळू शकतात. पण तोपर्यंतचा स्ट्रगल फार मोठा असतो. असे कित्येक जण आहेत, जे बीसीसीआयच्या पोस्ट निघतील याची वाट बघतायत. लोकल मॅचेसमध्ये दिवसाला ५०० रुपये वैगरे कमाईवर समाधान मानतायत. ज्यांना आम्ही कायम सांगत असतो, की दुसरा एखादा जॉब बघा. कारण फक्त अंपायर होणं ही खरंच सोपी गोष्ट नाहीये.”
आता स्ट्रगल कुणाला चुकलाय म्हणा? जसा बॅट्समन व्हायला, तसाच अंपायर व्हायलाही. आम्ही प्रोसेस तर सांगितलीये, पॅशन असली तर बिनधास्त भिडा, फक्त १ हजाराचे ३० हजार होईपर्यंतचा संयम पाळा आणि प्लॅन बी हातात ठेऊनच हे धाडस करा. टॅक्सी नंबर ९२११ मध्ये नाना पाटेकर म्हणतो,
‘सचिन बननेका, कैफ नई बननेका.’ पण कसंय सचिन आणि कैफच्या खेळाला शोभा यायला बिली बाऊडन हवाच असतोय की…
हे ही वाच भिडू
- क्रिकेटचा बॅड बॉय ते आयपीएल विनिंग कॅप्टन, हार्दिक पंड्या म्हणू शकतोय आज मै जीत के आया
- १९९६ साली श्रीलंका संपल्यात जमा होता, तेव्हा क्रिकेटमुळं देश पुन्हा उभारला..
- आयपीएलच्या राड्यात पुजारा कुठंय? गडी कौंटी क्रिकेटमध्ये भारताचा बदला पूर्ण करतोय