पावसाळी कविता कशा कराव्यात ? 

आसमंतात मान्सूनचे नभ आपली काळी जादू बहरू लागले आहेत. मौसमी वारे बाल्कनीमधून हळूच एखादा दुपट्टा क्षिताजापलीकडे घेवून जात आहेत. काळे काळे नभ भुईवर मोत्यांचा वर्षाव करु लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात वाळत घातलेले सांडगे पावसाचे टपोरे थेंब झेलत आहेत. भव्य सह्याद्रीमधील लवासा आपल्या कविकल्पनांना साद घालू लागला आहे.

अशा या विहंगम वातावरणात आपण कविता करु शकलो नाही तर तो कदाचित तो आपल्या आयुष्याचा फॉल धरला जावू शकतो. म्हणूनच पावसाळी कविता करायला हवी. कविता उत्तोमत्तम होवून किमान या मान्सूनात तरी आपला कवी व्हावा म्हणून आम्ही घेवून आलो आहोत, पावसाळी कविता कशा कराव्यात.

अर्थात उत्तम मौसमी कवी बनण्याचे घरगुती उपाय. 

“जे न देखें रवी ते देखें कवी” अस कोणते तरी महान कवी म्हणून गेले आहेत याच कविंना साष्टांग दंडवत करुन सुरू करुया पावसाळी कवी होण्याचे एकसे एक नामी उपाय. 

1) वातावरण निर्मीती –

वातावरण निर्मीती हे कोणत्याही कवीच्या सृजननिर्मीतीचा महत्वाचा घटक. आत्ता हेच पाहा नं आपणाला पावसात कविता का सुचतात कारण की वातावरण. मात्र आपणासमोर पावसामुळे न सुकणारे वास येणारे कपडे असतील. ओलिचिंब गटार वहात असेल. लोकलमध्ये लटकणारे इसम असतील तर कशी काय कविता सुचेल ? शिवाय अशा आर्थिक परस्थितीत एका कवितेसाठी माथेरान आणि महाबळेश्वरचा खर्च कसा काय परवडेल ? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर यावर एक नामी उपाय आहे. तो म्हणजे यु ट्यूब. यु ट्यूब वरील नक्षत्रांचे देणे टू सौमित्र अशी प्लेलिस्ट ओपन करा. मंद आचेवर हेडफोन कानात लावा. आणि ट्रान्समध्ये जाण्याचा प्रयत्न करा. लोकलच्या आवाजाला किंवा कुबट कपड्यांच्या वासाकडे दुर्लक्ष करा. डोळे मिटून आनंद घ्या आणि याच वातावरणात ओलेचिंब, प्रियसी, नभ, केस, डोळे, काजळ, काळेभोर असे शब्द पावसाच्या थेंबाप्रमाणे टिपण्यास सुरवात करा. हे वातावरण आपणास नक्कीच सहाय्य ठरू शकेल.  

2) काल्पनिक प्रेयसी –  

पेट्रोलचे दर पाहिलेत का ? अशा वातावरणात खऱ्या प्रेयसीची आठवण देखील काढू नका. त्रास होईल. आपण तिला कोठेही घेवून जावू शकत नाही, याबद्दल मन खायला उठेल. त्याहून अधिक चांगल म्हणजे काल्पनिक प्रेयसीचा कल्पनाविस्तार करा. ती आहे, तीचे मुलायम केस आहेत, तिचा पंजाबी चुडीदार आहे, पायात पैंजण आहेत, नाकाने सानिया मिर्झा आहे इत्यादी कल्पनाविस्तार मध्यमवर्गाला परवडेबल असतात. सो तुम्ही वेगवेगळ्या कल्पना रंगवा. प्रेयसीच्या नावाची सुरवातच ऊर्दू शब्दांपासून करा. ते शक्य नसेल तर संस्कृत देखील चालेल. फिल आल्याशी मतलब. फिल आला की या कल्पनाविस्ताराची तुलना पावसासोबत करा. बघा कागदाच्या शेवटी एक सुंदर कविता जन्माला आली असेल. 

3) दुर्बोध शब्दांचा सुयोग्य वापर –

आकाशात काय असतं ? ढग. अस तुमचं उत्तर असेल तर तुम्हाला सुधारण्याची गरज आहे. लक्षात घ्या, पावसाळ्यात येतात ते नभ. सामान्यासाठी येतात ते ढग. आपणासाठी येतात ते नभ. तर या नभांसारख्या अनेक शब्दांचं रोपन आपणाला कवितेमध्ये करण्याचं स्किल असावं लागतं. जसे की कोणी गालिचे म्हणले की आपल्या मुखातून हिरवेहिरवे गार जस बाहेर पडतात तसच काहीसं हे स्किल असतं. श्रावणमानसी, हर्षमानसी, नखशिखांत, ओलेचिंब यांसारखे शब्द योग्य ठिकाणी पेरले की पावसाळी कवितांच्या दिशेने आपलं यशस्वी पाऊल पडलं म्हणायला हरकत नाही.

4) यमक शब्दांची उजळणी – 

उत्कृष्ठ पावसाळी कविता हि तिच्या यमक वरुन गणली जाते. जितके यमक जुळतील तितकी कविता लोकप्रिय हे लक्षात घ्यायला हवं. अशा वेळी आपणाकडे योग्य शब्दांचा समुच्चय असायला हवा. जसे की पावसांनी, सावल्यांनी, सांजवेळी, एककल्ली असे अचूक शब्दांच यमक आपणास जुळवण्याचं स्किल हवं. हे स्किल नसेल तर नाराज होण्याचं काहीएक कारण नाही. त्यासाठी देखील उपाय आहे. तुम्हाला जो शब्द यमक मध्ये जुळवायचा आहे त्याचं शेवटचं अक्षर लिहावं. 

उदाहरणार्थ –  “नी” आत्ता नी ने शेवट होणारे शब्द आठवावेत. साधी अंकलिपी घ्यावी. बाराखडीतून ते शब्द जुळवणे सोप्पे जाते. वेळ लागेल पण तुम्ही एक्स्पर्ट व्हाल हे नक्की. 

 

5) गुळ पाडण्याची कला –

उत्तम पावसाळी कवी होण्याची हि शेवटची पण सर्वात महत्वाची पायरी. आपणाकडे नेटपॅक नसेल. त्यात वॉटसअप आणि फेसबुक नसेल. वॉटसअप वरती गोड भाषा समजून घेणारे ग्रुप नसतील किंवा फेसबुकवर लाईक ठोकणारे गहिरे दोस्त नसतील तर आपल्या आयुष्यात पाउस पडण्याने काहीच उपयोग होणार नाही हे समजून घ्या. वरती दिलेल्या सर्व गोष्टी आपणाकडे असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने पावसाळी कवी झाला आहात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तंत्रज्ञान प्रत्येकाच्याच घरात आहे, तुम्ही त्याचं विशेष काय करणार हे महत्वाच आहे. फेसबुकवर कविमित्रांना अॅड करा. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक कवितांना लाईक करा, कमेंट करा. प्रसंगी शेअर करा. तो कवि प्रतिउत्तर म्हणून तुमच्या कवितांना लाईक करु लागेल. तो जर का अजूनही तुमच्या कविता लाईक करत नसेल तर त्याच्या इनबॉक्समध्ये जा. त्याच्या कवितांना चांगल म्हणा. पावसाळ्यातल्या मातीच्या सुगंधासारख्या तुम्हाला त्याचा कविता वाटल्या अस बिंनधास्त सांगा. परिणाम होईल. अशा प्रकारे एक एक मित्र जोडत जा. तो तुम्हाला उत्स्फुर्त करत राहिल.

 

हे सर्व वाचून कविता सुचतीलच. बाहेर पाऊस पडतोय म्हणल्यानंतर त्या सुचायलाच हव्या. तुम्ही बिनधास्त कविता करा. आम्हाला देखील पाठवा. फक्त वेळेचं भान ठेवून.

Leave A Reply

Your email address will not be published.