आजही नकार आला असेल, तर पचवायचा कसा भिडू?

काय भिडू लोक, आजचा प्रपोझ डे कसा साजरा झाला? भारी झाला…? गंडला…? ज्यांचा भारी झाला त्यांचा तर काय विषयच नाही. त्यांची मिनी दिवाळी. पण ज्यांचा सालाबादप्रमाणं यंदाही गंडला आहे… त्यांनी काय करावं हा मोठा आणि लय डेडली प्रश्न. एकतर आज प्रपोझ करणार हे ज्या ज्या मित्रांना माहीत होतं, ते प्रश्न विचारणार… ‘काय झालं?’, ‘नाय बोल्ली का?’, ‘दुसऱ्या कुणाला हो म्हणलीये का?’ आता याची उत्तरं देऊन देऊन तुमचा मूड आधीच बाद झालेला असणार, त्यामुळं तुमच्या जखमेवर फुंकर घालायला आमचे हे विशेष प्रयत्न.

वाचकांची काळजी ओ दुसरं काय?

सगळ्यात आधी तुम्हाला सांगणार एक फन फॅक्ट. तेवढाच मूड हलका होईल…

जगातलं पहिलं प्रपोझ कधी झालं होतं माहिती का? तर नोंद असलेलं (त्या आधीच्या लडतरी कसल्या वाढीव असतील) जगातलं पहिलं प्रपोझ १४७७ मध्ये पार पडलेलं. ऑस्ट्रियाच्या आर्चड्यूक मॅक्सिमिलननं मेरी ऑफ बरगंडीला हिऱ्याची अंगठी देऊन लव्हशिप मागितली होती. तो काळ असा होता जेव्हा रिंग ही दुर्मिळ गोष्ट होती. कुणाचा लग्नासाठी हात मागायचा असेल, तर लोकं गायी-म्हशी, भांडी असल्या वापरातल्या वस्तू देऊन भिडायची. (डायमंड रिंग की म्हैस… आत्ता काय स्वस्त जाईल भिडू?) त्या कपलचा साखरपुडा झाला, म्हणजे पहिल्या गड्याचं प्रपोझ यशस्वी ठरलं होतं, हे नक्की.

आता पार १४७७ ला माणसं यशस्वी ठरत होती आणि अजून तुमचं सत्यनारायणाची कथा ऐकणं फिक्स झालं नसेल… तर तुमचं गंडतंय काय?

प्रपोझ करायची टेक्निक. तुम्ही जर तिला लव्हशिप देती का? असं विचारलं असलं.. तर तिथंच माती खाल्लीये. नुसतं आय लव्ह यु म्हणलं असाल, तरी पाच मार्क इथंच गेले, कारण समोरुन ‘हम्म’ आणि ‘मी टू बट ऍज अ फ्रेंड’ असे दोनच रिप्लाय येणार, त्यामुळं टेक्निक बदलून बघ भिडू. ‘विल यु ग्रो ओल्ड विथ मी?’ असलं इंग्लिश वाक्य फेकून मारायचं. ‘मला तुझ्या हातचं मटण, वरण-भात, कुकरमधला केक हे आयुष्यभर खायला घालशील?’ असलं दवणीय वाक्य टाकायचं. जरा अपडेट घ्यायचे आणि सध्याच्या ट्रेंडनुसार विचारायचं.. ‘कॅन वी स्किप टू द गुड पार्ट?’ आता लय ट्रिक सांगितल्या, वापरुन बघा… वेळ गेलेली नाय.

आता नकार आलेला असेलच, तर काय करायचं?

गप कानात हेडफोन घालायचे आणि नुसरत फतेह अली खान लावायचे. नुसरत साहेब जेव्हा म्हणतात, ‘लोग डरते है कातील की परछाई से, हमने कातिल के दिल में ही घर कर लिया…’ ऐकल्यावर लय बरं वाटतं. आपला बाजार उठलेला असतो, तेव्हा आपली अवस्था कुणालाच सांगता येत नाही… मग जगजीत सिंग कानात गातात, ‘इष्क किजीये, फिर समझीये जिंदगी क्या चीज है…’

आता समजा नकार आला असेलच, तर तिचं/त्याचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अजिबात बघायचं नाय. ती मैत्रिणीसोबत हिंडायला गेली असणार किंवा ज्याला हो म्हणल्या त्याच्यासोबत हिंडत बसणार… उगाच स्टोऱ्या बघून आपल्या डोक्याला ताप करुन घेण्यात काय पॉईंट नसतोय. त्यामुळं, चुकूनही तिच्या अकाऊंटला चक्कर मारायची नाही…

आता जिव्हाळ्याचा मुद्दा… ‘ती नाय म्हणली भावा, बसायचं का?’ तर दर्दमध्ये कधीच बसायचं नाही. कॅंटीन त्यानं फक्त आपल्याला त्रास होतो, बसून गम शांत झाला असता, तर बार कधीच बंद झाले असते… असं तीन पेग डाऊन असलेला एक कार्यकर्ता सांगत होता…

नकाराचा मानसिक परिणाम काय होतो?

आपलं सेल्फ एस्टीम डाऊन होतं. आपल्याला वाटतं आपणच कशात तरी कमी आहोत. याचा परिणाम साहजिक आपल्या कामावर आणि वागण्यावर होतो. आपल्याला कशातच भारी वाटत नाही आणि आपण चुका करत राहतो. मग पुढं जाऊन डिप्रेशन वगैरे अशा गंभीर गोष्टी होऊ शकतात.

पण हे सगळं होतं कधी, जेव्हा आपण नकाराचा लोड घेतो. नाय म्हणली तर पुन्हा तयारी करा, तरीही नाहीच म्हणणार असेल तर दुसरीकडे लाईन लागतिये का बघा. खचून जाऊ नका, प्रेम करत रहा… नकार येतील, होकार येतील..पण प्रेम करत रहा कारण प्रेम ही लय भारी गोष्ट आहे…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.