बाथरुम, हॉटेल रुम, चेंजिंग रुम किंवा कुठेही, हिडन कॅमेरा कसा ओळखायचा..?

चंदीगड युनिव्हर्सिटीत एका विद्यार्थिनीनं आपल्याच हॉस्टेलमधल्या ६० विद्यार्थिनींचे खाजगी व्हिडीओ शूट केले आणि ते आपल्या मित्राला पाठवले. या मित्रानं ते व्हिडीओ व्हायरल केले, असा आरोप केला जातोय. या प्रकरणामुळं चंदीगड युनिव्हर्सिटीत विद्यार्थिनींनी आंदोलन पुकारलं आहे. नेत्यांपासून अनेक जण सोशल मीडियावर हे व्हिडीओ आणखी व्हायरल होऊ न देण्याचं आणि डिलीट करण्याचं आवाहन करतायत. 

आता चंदीगड युनिव्हर्सिटीत नेमकं काय घडलंय, हे पोलिस तपासात समोर येईलच. पण कुणाचा तरी खाजगी व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल करण्याचे प्रकार आपण अनेकदा पाहतो, हे असे व्हिडीओ बऱ्याचदा हिडन कॅमेराद्वारे शूट केलेले असतात.

डोळ्यांना सहज दिसून न येणारे हे हिडन कॅमेरे कसे ओळखायचे ? आपण जिथं आहोत, त्या ठिकाणी कुठला हिडन कॅमेरा नाही ना हे कसं तपासायचं ? याची माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

पहिला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे – आजूबाजूच्या गोष्टींची नीट तपासणी करणं.

 या शोधाशोधीत हिडन कॅमेरा सापडूच शकतो. आपल्या आजूबाजूच्या काही काही जागा अशा असतात जिथं हिडन कॅमेरे सहजपणे लपवले जाऊ शकतात. छोटी झाडं, पुस्तकं, भिंतीवर लावलेली चित्र, शोभेच्या वस्तू, टेडी बिअर्स किंवा इतर खेळणी, घड्याळ, पेन, फॅन, स्मोक डिटेक्टर्स, शॉवर, इलेक्ट्रिक सॉकेट या वस्तूंमध्ये कॅमेरा लपवणं सोपं असतं, पण या सगळ्या वस्तू आपल्याला तपासता येतात. त्यामुळं जरासाही संशय असेल, तर आपण स्वतः खात्री करु शकतो. हे कॅमेरे ओळखण्याची ट्रिक म्हणजे गरज नसलेल्या वस्तूंना इलेक्ट्रिक प्लग जोडलेले असतात किंवा वायर बाहेर आलेल्या असतात, त्यामुळं या गोष्टी आपलं लक्ष वेधून घेऊ शकतात.

दुसरा उपाय म्हणजे – मोबाईल फोनचा वापर करुन हिडन कॅमेरा शोधणं

यात दोन पर्याय असतात, समजा तुम्ही एखाद्या हॉटेल रुममध्ये गेला आहात, तर कुणाशी तरी फोनवर बोलत संपूर्ण रुममध्ये फिरा. जर कुठल्या ठिकाणी कॅमेरा असेल तर, त्याच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे फोनवर बोलताना अडथळा येईल. हा अडथळा लक्षात आला की आजूबाजूला कॅमेरा आहे की नाही, याची तपासणी करता येते.

दुसरं म्हणजे अँड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्हीसाठी हिडन कॅमेरा डिटेक्ट करणारे काही ऍप्स येतात. एखाद्या रुममध्ये कॅमेरा असेल आणि हे डिटेक्टर ऍप्स वापरले तर फोनवर सूचना येते आणि आपल्याला कॅमेरा असल्याची माहिती मिळते. आपल्या स्मार्टफोनचे कॅमेरे इन्फ्रारेड लाईट डिटेक्ट करतात, याचाही वापर कॅमेरा शोधण्यात होतो. 

मात्र याचे दोन दुष्परिणामही असतात, एक म्हणजे ही ऍप्स पूर्णपणे सेफ असतात की नाही, याची खात्री देता येत नाही आणि दुसरं म्हणजे फक्त हिडन कॅमेरेच नाही, तर कुठल्याही रेडिओ फ्रिक्वेन्सी असलेल्या डिव्हाईससमोर हे ऍप्स डिटेक्ट करण्याचं काम करतातच.

तिसरा उपाय म्हणजे – अंधार करणं

कुठल्याही कॅमेराला रेकॉर्ड करण्यासाठी उजेड लागतोच. वायरलेस किंवा वायर्ड कॅमेऱ्यांमध्ये लाल किंवा हिरवे एलईडी असतात. जेव्हा अंधार केला जातो, तेव्हा हे एलईडी कॅमेराला उजेड पुरवण्याचं काम करतात. त्यामुळं ते अधिक प्रकाशमान होतात, साहजिकच उघड्या डोळ्यांना या लाईट्स दिसू शकतात. नाईट व्हिजन कॅमेराजमध्ये हे तंत्रज्ञान हमखास वापरलेलं असतं, त्यामुळं बारकाईनं पाहिलं तर हे कॅमेरे शोधणं कठीण जात नाही. यासाठी फ्लॅशलाईट्सचाही वापर करता येऊ शकतो.

चौथा उपाय म्हणजे – आरसे तपासणं

हॉटेल रुम, बाथरुम आणि चेंजिंग रुममध्ये बऱ्याचदा आरसे लावलेले असतात. दिसायला हे आरसे साधे दिसत असले, तरी त्यांच्यामागेही कॅमेरे लपवलेले असू शकतात. यातला फरक ओळखण्याचा उपाय म्हणजे आपल्या बोटाचं नख त्या आरशाला लावायचं, जर आरशातल्या प्रतिमेमध्ये आणि बोटामध्ये अंतर दिसत असेल, तर तो साधा आरसाच आहे.

पण जर आरशातली प्रतिमा आणि बोटात अंतर नसेल तर आरशाच्या मागे कॅमेरा किंवा साधी काच असू शकते.

पाचवा उपाय म्हणजे – प्रोफेशनल कॅमेरा डिटेक्टर वापरणं

जर तुम्हाला कुठल्याही कारणांमुळे वारंवार हॉटेलमध्ये राहावं लागत असेल किंवा कुणी तुमच्यावर पाळत ठेवत असल्याचा संशय असेल, तर खास कॅमेरे शोधण्यासाठीच बनवलेले कॅमेरा डिटेक्टर वापरता येतात. याचा वापर करुन छुपे कॅमेरे शोधणं सोपं असतं.

काही ठिकाणी संपूर्ण रुमचा पॉवर सप्लाय बंद करण्याचा पर्याय सुचवला जातो. पण बहुतांश कॅमेरे हे बॅटरीवर चालत असतात, त्यामुळं पॉवर सप्लाय बंद केला, तरी हे कॅमेरे बंद होत नाहीत. हे कॅमेरे दिसायला एखाद्या पेन ड्राईव्ह, शॉवर, पेन किंवा फक्त एक वर्तुळाकार कॅमेरा असे असू शकतात, त्यामुळं बारकाईनं पाहणं आणि गरज पडल्यास आवश्यक ते तंत्रज्ञान वापरुन कॅमेरा शोधणं हाच बेस्ट उपाय ठरतो.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.