हॉलमार्कवरून सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता कशी ओळखायची?

नाव सोनाबाई आणि हाती कथलेचा वाळा अशी म्हण तुम्ही ऐकलीच असेल. अश्या एक ना अनेक म्हणी नुसत्या मराठीत नाही तर प्रत्येक भारतीय भाषेत आपल्याला पाहायला मिळतात. भारतीयांचं सोन्यासोबतच नातं तसं फार जुनं. अगदी भारताला सोने कि चिडिया किंवा सोन्याचा धूर काढण्याएवढं. भारतात सगळ्यात जास्त आयात होणाऱ्या पहिल्या तीन गोष्टीमध्ये सोने मोडते. सणासुदीला आणि त्यातल्या त्यात वर्षातल्या साडेतीन मुहूर्तावर तर सोनेखरेदीचा विक्रम होतो. पण आता सोने खरेदी करणे जरा सांभाळून करावे लागणार आहे. त्याला कारणही तसेच आहे.

सोने हा तसा मऊ धातू. पटकन वाकतो किंवा ताणाला जातो. तमग अश्या धातूला दागिन्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी काही इतर धातू त्याच्यामध्ये मिसळले जातात. या इतर धातूंच्या प्रमाणानुसार सोन्याचे ‘कॅरेट’ ठरते. एकूण चोवीस भागांपैकी किती भाग सोने आणि किती भाग इतर धातू आहेत यावरून २४, २२, १८, १४, १२ कॅरेट सोन्याचे प्रकार पडतात.

पण अश्यावेळी कोणते सोने किती कॅरेटचे हे कसे ठरवायचं?

अगदी काही वर्षांपुर्वीपर्यंत सोन्याच्या दुकानदारांच्या शब्दावरच हे सगळे व्यवहार चालायचे. नंतर अडचणीच्या वेळी सोने गहाण किंवा मोडण्यावेळी ग्राहकांना कळायचे कि आपल्याला कमी प्रतीचे सोने विकले गेले आहे. मग अश्या प्रकारची फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने ठिकठिकाणी देशभर सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तपासणी आणि हॉलमार्क केंद्रे सुरु केली.

अलीकडेच सरकारने सोने शुद्धता तपासण्यासाठी काही निकष ठरवून दिलेले होते कि ज्यामुळे ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेबाबत विश्वासार्हता वाटेल. यामध्ये भारतीय मानक ब्युरोच्या लोगोसह दागिने घडवणाऱ्याचा लोगो आणि कोणत्या हॉलमार्क केंद्रात तपासणी झाली आहे त्याची माहिती अशी सगळी माहिती सोन्याच्या दागिन्यावर टाकली जायची.

शिवाय अश्या प्रकारची हॉलमार्किंग करणे सोने दुकानदारांना अनिवार्य नव्हते.

म्हणूनच जून २०२१ मध्ये केंद्र सरकारने ‘हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन’ नामक एक सहाअंकी नंबर द्यायला सुरवात केली. आतापर्यंत जुन्या आणि नव्या दोन्ही प्रकारच्या हॉलमार्किंग असलेल्या सोन्याची विक्री बाजारात होत होती. पण यामुळे झाले असे कि ग्राहकांमध्ये खरे सोने कोणते याबाबत प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

हा सगळं गोंधळ थांबवण्यासाठी भारत सरकारने येत्या १ एप्रिलपासून केवळ हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असलेल्या सोन्यालाच विकण्याची परवानगी दिली आहे.

या नंबरमुळे सोन्याची किंवा त्याच्या दागिन्यांची चुकीची विक्री टाळता येते, गुणवत्तेची हमी देता येते. हा क्रमांक अक्षरे आणि अंकांनी बनलेला सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. दागिन्यांच्या प्रत्येक वस्तूला हॉलमार्किंगच्या क्षणी एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल आणि त्यामुळे मार्क झालेली प्रत्येक वस्तू अद्वितीय असेल. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन आधारित हॉलमार्किंग ज्वेलर्सची नोंदणी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलितपणे केली जाते त्यामुळे ती विश्वासार्ह आहे असे सांगण्यात येत आहे. तसेच सरकारच्या म्हणण्यानुसार ही प्रणाली ग्राहक आणि ज्वेलर्सच्या डेटाच्या गोपनीयतेला कोणताही धोका पोहचवत नाही.

आता तुम्ही या हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरवरून तुमच्या सोन्याची शुद्धता कशी तपासाल? काळजी नको भिडू सांगतोय…

तर गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असलेल्या ‘BIS केअर’ अॅपवरील “Verify HUID” वैशिष्ट्याचा वापर करून एखादी व्यक्ती हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता तपासू शकते. तसेच तुम्ही कोणत्याही भारतीय मानक ब्युरोच्या मान्यताप्राप्त शुद्धता आणि हॉलमार्किंग केंद्रात सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासू शकता.

यासाठी तुम्हाला २०० रुपये शुल्क भरावे लागेल, असे सरकारी वेबसाइटवर म्हटले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ज्वेलर्सना दागिन्यांच्या किमतीच्या पाचपट दंड किंवा एक वर्ष कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तथापि, ज्वेलर्स ग्राहकांकडून हॉलमार्कशिवाय जुने सोन्याचे दागिने परत खरेदी करणे सुरू ठेवू शकतात, असे सरकारी अहवालात म्हटले आहे.

खरं सोनं आगीच्या धगीत चकाकून समोर येत मात्र आता मात्र भिडूंनो तुम्हाला सोने तपासण्यासाठी कुठलीच आगीची गरज नाही. विकत घेताना हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरबघा आणि अँप वर त्याची शुद्धता बिनधास्त तपासा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.