या पाच गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर प्रेमात तुमचा पोपट होणार आहे. 

प्रेमात पोपट होणे. एका जागतिक सर्वेनुसार जगभरातील 99.99 टक्के लोकांचा कधी ना कधी प्रेमात पोपट होतो. पोपट होणे हि एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याने यावर संशोधन करुन वेळ घालवण्यात अर्थ नाही असा निकष देखील अनेक तज्ञांनी मांडला आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर होत रे म्हणून पोपट झाल्याच कबुल करुन माणसाने पुढे जावं अस साध, सरळ, सोप्प गणित असत. 

पण कसय ना, मस्ती उतरत नसते. बऱ्याचदा पोपट होतोय हे मान्य होतं नाही. विश्वासाच्या नावाने माणूस दिवसरात्र पोपट होत राहतो. बर फक्त पोपटच नाही तर प्रेमात पोपटीण होणाऱ्या मुलींची संख्या देखील पोत्यानं असल्याचं वैज्ञानिक नमूद करतात. बोलभिडूला असाच एक विषय आला की पोपट होतोय हे कुठल्या टप्यावर ओळखून जावं. मग भल्या मोठ्या चर्चा झाल्या. कोणी, कुणाचा कसा पोपट केला हे सांगण्यात आलं आणि चर्चेच सार म्हणून आम्ही पाच मुद्दे जनतेसमोर घेवून जायचं ठरवलं. 

तर ते हे पाच मुद्दे आहेत, हे वाचले की कळेल तुमचा पोपट होतोय का? 

१) वेळ नाही रे, जमणार नाही रे, खूप काम आहेत रे… 

भेटायचं असो की चॅटिंग असो. वारंवार समोरच्या व्यक्तिकडून वेळ नाही, टाईम नाही टाईप कारणे येवू लागले तर समजून जायचं आपला बल्या होतोय. आत्ता मुद्दा असा असतो की खरच काही वेळेला काम असतं. त्यामुळं मनापासून असेल तर उगी हे वाचून स्वत:च्या रिलेशनचा बाजार उठवू नये. त्यासाठी तपशीलवार विश्वासात घेवून विचारावं. अच्छा, हो का, खूपच छान असे प्रश्न विचारून ती बिझी असणाऱ्या कामांबद्दल गोडीगुलाबीने विचारपूस करावी.

हे विचारताना तूम्ही संशय घेत आहात असा फिल येवून द्यायचा नसतो. अगदी सहजच टाईपमध्ये अधूनमधून प्रश्न विचारत रहायचं. कळून जातं आपल्याला कटवायचा प्रयत्न होतोय की खरच बिझी आहे ते. 

२) तास झालं ऑनलाईन अाहे पण रिप्लाय नाही. 

व्हॉटसएप ला ब्लू टिक ऑफ करणाऱ्या सगळ्याच मुली धोकादायक नसतात. काळजी करु नका. पण काय होतं बऱ्याचदा ती ऑनलाईन दिसते. तुम्ही मॅसेज पाठवलेला असतो पण तिची ब्लू टिक ऑफ असते. बघितला की नाही याचा विचार तुम्ही करत बसता आणि अचानक संयमाची पातळी ओलांडत पातळी सुटते.

अशा वेळी सगळ्या रिलेशनशीपचा बाजार उठू शकतो. त्यामुळे मोठ्ठेपणा दाखवायचा फोन करायचा आणि विचारायचं हे बघ बाळ, पिल्लू, सोन्या किंवा काय असेल ते. मी व्हॉटसएप ला मॅसेज केला आहे. तू चेक केलास का? केला नसशील तर बघ न जरा? विश्वासात घेवून माणसानं बोलायचं असत. तरिही फरक पडत नसेल तर समजून जा इतिहास जवळ आलाय. 

३) ठरलं की, घोळ घालणे. 

आत्ता काही पोरींच्याबाबतीत हे नैसर्गिक असतं. म्हणजे त्यांना टायमिंग पाळता येत नाही. पिक्चरला जावूया म्हणलं की बरोबर टाईमिंगमध्ये घोरत पडलेल्या असू शकतात. पण दरवेळेस हे नैसर्गिक नसतं. आत्ता हे नैसर्गिक का अनैसर्गिक कस कळणार तर, प्लॅन ठरवून मोडण्याची सिस्टीम वारंवार घडू लागली तर समजून जायचं की काहीतरी घोळ चालू आहे. अशा वेळी काय करायचं तर शक्य असणारे प्लॅन ठरवायचे.

म्हणजे उगीच गोवा नाहीतर महाबळेश्वरचे प्लॅन ठरवण्यापेक्षा चल इथेच डेक्कनला पाणीपुरी खावून येवू म्हणायचं. आत्ता इतके सामान्य, अतिसामान्य प्लॅन देखील केराच्या टोपलीच जात असतील तर समजून जा पोपट झाला आहे. 

४) बेस्ट फ्रेन्ड नावाचा प्रकार वाढत गेला तर. 

अरे काही नाही रे माझा खूप जवळचा मित्र होता. म्हणून बऱ्याचदा बेस्ट फ्रेन्ड मुंडावळ्या बांधून डायरेक्ट लग्नात दिसतो आणि त्याच लग्नात तुम्हाला बुंदी वाढण्याच काम लागू शकतं. अशा वेळी बेस्ट फ्रेन्डला आपण खूप मोठे टॉम क्रुझ आहोत अस लक्षात आणून दिलं पाहीजे. बेस्ट फ्रेन्डला अतीच बेस्ट होवून द्यायचं नसतं हे लक्षात ठेवा. तरिही मैत्रीणीला त्या बेस्ट फ्रेन्ड सोबत बोलणं आवडत असेल आणि यावर कोणताच पर्याय नसेल तर त्या बेस्ट ला तुमचा पण बेस्ट फ्रेन्ड बनवून घेणं हाच एकमेव उपाय असतो. 

यामुळे तिघांचे टोळके निर्माण होते आणि त्यामध्ये तुम्ही या नव्या मित्राला योग्य ती किंमत दाखवून कात्रजचा घाट दाखवू शकता. हे शक्यच होत नसेल तर नेहमीप्रमाणे समजून जा, पोपट झालाय. 

५) फोनला हात लावून न देणं. 

हे बघा मित्रांनो कस आहे, उगी दूसऱ्यांचा फोन चेक करणं पण चुकीच असतं. म्हणजे चेक करतो बघतो, दाखवं फोन वगैर वगैरे गोष्टी करत असाल तर तुमचा पोपट व्हायलाच हवा अशा मताचे आम्ही आहोत. पण सहज बॅलन्स संपला आणि तूम्ही फोन मागितला तरी ती फोन देत नसेल. NASA च्या वरचा पासवर्ड टाकून ठेवत असेल. तुमच्यापुढे फोन बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करत नसेल तर समजून जा बल्या होतोय. फोन मुद्दाम बघायचा नाही हे जितकं खर आहे तितकच मुद्दामहून लपवला जात असेल तर जरा जरा संशय घेता येवू शकतोय. 

बस्स इतकच, आत्ता सर्वात महत्वाची सुचना. हे सगळं अनुभवावर असतय. आमच्यासोबत घडलं ते तुमच्यासोबत घडेलच अस नाही. त्यामुळे सगळं चांगल चाललं असेल आणि हा लेख वाचून स्वत:च्या रिलेशनचा बाजार उठवण्याचा प्रयत्न करु नका. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.