फोन यायच्या आधीच, कुणाचा फोन येतोय हे सांगणारं ट्रूकॉलर ॲप बारक्या खोलीत सुरू झालंय

समजा तुम्ही हातात फोन घेऊन निवांत रिल्स बघत बसलाय, तुमच्या डोक्यात कसलंच टेन्शन नाहीये. तेवढ्यात तुम्हाला बॉसचा फोन येतो आणि मूडचा डायरेक्ट बाजार उठतो. आता असा अचानक भयानक फोन आला, की कारण द्यायचं सुचत नाय. त्यामुळं, लगेच बीपी वाढतंय. समजा आपल्याला कुणाचा कॉल येणाराय हे थोडं आधी कळलं की, कसं बरं असतंय. फोन करणाऱ्याला कारण काय सांगायचं, फोन उचलायचा काय नाय या सगळ्या गोष्टींचं नियोजन लावता येतंय.

बरं ही अशी सिस्टीम कधीच येऊ शकत नाही, असंच सगळ्यांना वाटत होतं. एवढंच काय, आपल्याला कोणाचा फोन आलाय, हे सुद्धा ओळखू येईल का नाय यावर डाऊट होताच. पण दोन्ही गोष्टी शक्य झाल्याच. 

थोडं नॉस्टॅल्जीक होऊन सांगायचं झालं, तर एक किस्सा आहे भिडू. आमच्या शाळेत एक पहिल्या बाकावरचं पोरगं होतं. ते दंगामस्ती करायचं नाय, कुणाला छेडायचं नाय, कधी आमच्या डब्यातलं खायचा नाय, एकदम गुणीबाळ. पण त्याची एक गोष्ट चुकायची, शिक्षक गृहपाठ चेक करायचे विसरले हा कार्यकर्ता आठवण करून द्यायचा. आता आम्हा मागच्या बाकावरच्या पोरांनी गृहपाठ पूर्ण केला, तर मंडळासाठी तो फाऊल ठरला असता. त्यामुळं आम्हाला रट्टे पडायचे आणि गुणीबाळ फिदीफिदी हसायचं.

आम्ही तोच राग डोक्यात ठेवला, नेमकं गुणीबाळ कॉलेजमध्ये आम्हाला घावलंच. मग आम्ही त्याला रोज वेगळ्या नंबरवरून कॉल करुन पिडायचो. आम्हाला वाटायचं आम्ही त्याला कधी सापडत नसतोय. मग एक दिवस गुणीबाळाला ट्रूकॉलरचा शोध लागला आणि आमचा बल्ल्या झाला. आज लय दिवसांनी गुणीबाळाची आठवण झाली आणि मग ठरवलं, हे वांड ट्रूकॉलर ॲप आलं कसं हे शोधायचं आणि तुम्हाला सांगायचं…

तर ट्रूकॉलर हे ॲप सुरू केलं, दोन कार्यकर्त्यांनी. त्यांची नावं म्हणजे नामी झरिंगहालम आणि ॲलन मामेडी. या दोघांचं कुटुंब लहानपणीच स्टॉकहोममध्ये स्थलांतरीत झालं. या दोघांची भेट झाली ती इंजिनिअरिंग करताना. तेव्हाच त्यांना वाटलं होतं की, पुढं जाऊन आपण कायतरी भारी केलं पाहिजे. आता हे आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. पण करत कोण नाय.

या दोघांना मोबाईलमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवरुन सारखेच कॉल येत होते, आता हे कॉल कोण करतंय  हे आपल्याला समजलं पाहिजे आणि जगात एक ग्लोबल फोन डिरेक्टरी पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. त्यामुळं २००९ मध्ये त्यांनी ट्रूकॉलरचं बेसिक व्हर्जन बाजारात आणलं. काही दिवसांतच त्यांना एकदम खतरनाक रिस्पॉन्स मिळाला. एका छोट्याश्या खोलीत सुरू केलेल्या त्यांच्या या आयडीयानं हातपाय पसरायला सुरुवात केली होती.

इंडिया मार्केट

गणेश गायतोंडेचा एक डायलॉग आहे, ‘धंदा करना तो बडा करना पुरुषोत्तम भाई.’ नामी आणि ॲलननं हे फिक्स डोक्यात ठेवलं होतं. त्यांनी मोबाईल मार्केटकडं लय बारीक लक्ष ठेवलं होतं. फ्रॉड कॉल्स, फ्रॉड मेसेज आणि नवनवे मोबाईल्स जसे येऊ लागले, तसं ट्रूकॉलरचं मार्केट वाढू लागलं. भारतात लोकसंख्या जास्त, नवशिके मोबाईल वापरकर्तेही जास्त त्यामुळं ट्रूकॉलरची भारतात डेंजर हवा सुरू झाली.

ट्रूकॉलरनं मोका साधला आणि २०१३ मध्ये भारतात बस्तान बसवलं. तेव्हापासून आतापर्यंत ट्रूकॉलरनं लय मोठी झेप घेतलीये. पुढच्या पाच वर्षांत, तर ट्रूकॉलरनं अनेक भारतीयांना नोकरी दिली. त्यांनी भारतातल्या जवळपास २० कोटी वापरकर्त्यांचा डेटा जमवलाय आणि तो डेटा भारतातच राहतो, असा कंपनीचा दावाही आहे.

ट्रूकॉलरनं आता पेमेंट्स, मेसेज अशा अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. कोणी फोन केलाय हे कळतं इथंच पोरांना भारी वाटत होतं, पण या गड्यांनी फोन येतोय हे आधीच कळायची सिस्टीम काढली आणि शप्पथ दिलखुश झालं.

मध्ये ट्रूकॉलर डेटा चोरतं, बँक डिटेल्सचा झोल करतं अशा लय बातम्या आल्या. त्यात किती खरं आणि किती खोटं हे समजलं नाय. आता बाकीचे ॲप्स आपला डेटा गपागप ओढतात, त्यात आणखी एकाची भर म्हणून आपणही ट्रूकॉलर काय उडवलं नाय.

आता आपली एवढी सोय करणारं ॲप, एका बारक्या खोलीत सुरू झालंय. त्यांना अडचणी आल्या, प्रॉब्लेम्स आले, पण त्यांनी ठरवलं… नाही अटत, नाही तटत, एव्हरीबडी से.. ‘थांब हा एक फोन आलाय!’

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.