दोघांमधलं ‘प्रॉमिस’ टिकण्यामागचं कारण ‘युनिनॉर’चं सिमकार्ड होतं…

फार नाही पण १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा गुगल पे, फोन पे असल्या सोयी सुविधा नव्हत्या. रिचार्ज करायचं म्हणलं, की दुकानात जावं लागायचं. या रिचार्जवाल्या दुकानांची एक वेगळीच दुनिया होती, सगळीकडे लागलेली वेगवेगळ्या सिम कार्ड कंपन्यांची पोस्टर्स. चड्डी पे गड्डी फ्री अशा स्कीममधल्या ऑफर्स, सगळ्या रंगाच्या घोळक्यात उठून दिसणारा एखाद्या हिरॉईनचा फोटो आणि अल्ताफ राजाच्या गाण्यांसोबत येणारा उदबत्तीचा वास. या असल्या दुकानांमध्ये जाऊन जेवढे पैसे साठवले असतील किंवा घरुन मिळाले असतील, त्याचं रिचार्ज मागायचं.

मग तो कागदाचा तुकडा जपून घरी न्यायचा आणि त्यावरचा स्लिव्हर रंग रुपयानी घासून तो कोड मोबाईलवर टाकला, की रिचार्ज झालं. हे एवढे ढीगभर कष्ट घेण्यामागचं कारण होतं, आपल्या खड्याशी, बल्लरशी, छावीशी, आयटमशी, पिल्लूशी जे काय म्हणत असाल… तिच्याशी बोलणं.

जा जरा फ्लॅशबॅकमध्ये… गुलाबी दिवसांच्या गुलाबी गोष्टी आठवा. लय रमू नका पुढं वाचायचंय…

तर हा, त्या जमान्यात दिवसाला शंभर मेसेज पाठवण्याचं लिमिट रोजच्याला संपायचं. बटनवाल्या डबड्याकडे न बघता चॅटिंग करायची सर आताच्या ब्लु टिक्सला जन्मात येणार नाही. जिथं मेसेज करणं परवडत नव्हतं, तिथं फोन करणं म्हणजे लय दुर्मिळ गोष्ट. क्लास किंवा कॉलेजला जाताना, ती मैत्रिणीच्या घरी गेल्यावर फोनवर बोलणं व्हायचं खरं, पण रिचार्ज ही काय परवडणारी गोष्ट नव्हती. कित्येक जण तर मिसकॉलवर कारभार सांभाळायचे. तिच्याशी बोलायचंय पण मोबाईलमध्ये बॅलन्स नाही… या कित्येकांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन द्यायला मार्केटमध्ये एक मसीहा आला…

त्याचं नाव युनिनॉर.

कमी पैशात जास्त मिनिटं कॉलिंग, स्वस्तात मस्त मेसेज पॅक या स्कीमपेक्षा युनिनॉरची दणका उडवणारी ऑफर होती, ती म्हणजे युनिनॉर टू युनिनॉर अनलिमिटेड कॉलिंग. ३५ रुपयात आठवडाभर कितीही बोला… मिसकॉलचं लफडं नाही आणि कुणीही कॉल करायचं स्वातंत्र्य. आपण तर घेतलं, पण तिला सिमकार्ड कसं दिलं… याची प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी असणार अगदी फिक्स. कागदाच्या पुडीत, गणिताच्या वहीत, कानातल्याच्या डब्बीत आणि क्रमश:…

पण हे युनिनॉर भारतात आलं कसं?

आपल्याकडच्या जनतेला वाटायचं, की युनिनॉर बांगलादेशी किंवा पाकिस्तानी आहे. पण ते काय खरं नाय भिडू. टेलिनॉर ही नॉर्वे देशातली कंपनी. २००८ मध्ये जेव्हा सरकारनं टेलिकॉम सेक्टरमधली लायसन्स खुली केली, तेव्हा टेलिनॉरनं भारतात एंट्री मारायची ठरवली. त्यासाठी त्यांनी युनिटेक कंपनीची मदत घेतली आणि या एकत्र आलेल्या कंपनीला नाव मिळालं युनिनॉर.

एअरटेल आणि वोडाफोन पोस्टपेड प्लॅन्स आणण्यात बिझी होतं, तेव्हा युनिनॉरनी तरुण जनता धरली. गरजेच्या खर्चातून उरलेल्या पैशातून रिचार्ज करणाऱ्या या पोरांसाठी युनिनॉर हे वरदान होतं. फक्त दोन वर्षात त्यांनी देशातल्या १३ टेलिकॉम सर्कल्समध्ये ३० मिलियन ग्राहकांपर्यंत मजल मारली. कित्येक पोरांकडं दोन नंबर असायचे एक दुनियेसाठी आणि दुसरा फक्त तिच्यासाठी. जवळपास चार वर्ष युनिनॉरनी मार्केटमध्ये राडा घातला.

२०१२ मध्ये मात्र एक ट्विस्ट आला, सुप्रीम कोर्टानं २००८ मध्ये दिलेले काही लायसन्स रद्द करण्याचं ठरवलं, त्यात युनिनॉरच्या २२ लायसन्सचा समावेश होता. त्यामुळं युनिनॉरचं मार्केट फक्त सहा सर्कल्सपुरतं मर्यादित राहिलं. मुंबई आणि कोलकाता ही गजबजलेली शहरं त्यांच्याकडून गेली. हे कमी की काय म्हणत त्यांचे पार्टनर युनिटेकसोबत राडे झाले, मॅटर कोर्टात गेला आणि युनिटेकनं बॅकआऊट करायचं ठरवलं. साहजिकच युनिनॉरचं टेलिनॉर झालं.

लफडं घरी घावल्यावर पोरगं आणि पोरगी दोघं मार खातात, घरचे वॉच ठेवतात, ब्रेकअप करायला सांगतात… पण अशाही परिस्थितीत जे टिकून राहतं तेच खरं प्रेम. टेलिनॉरवाल्यांनीही तेच केलं.

हार मानायची नाही म्हणत त्यांनी मार्केटमध्ये राहायचं ठरवलं. आधीच कमी असलेले रेट त्यांनी आणखी कमी केले. मेसेज आणि कॉलिंग तर सुट्ट्या पैशांमध्ये होत होतं. पण त्याचवेळी मार्केटमध्ये सोशल मीडिया आलं. इंटरनेट आलं… दुनिया थ्रीजीवर शिफ्ट झाली पण टेलिनॉर टूजीवर अडकलं आणि गंडलं. त्यांच्या इंटरनेटचा स्पीड लय मागे राहिला आणि टेलिनॉर गर्दीत हरवून गेलं. पुढं २०१८ मध्ये भारती एअरटेलनं टेलिनॉरला टेकओव्हर केलं आणि लव्हस्टोरीची साक्षीदार असणारी एक कंपनी बंद झाली.

कित्येकांची लव्हस्टोरी टेलिनॉरसोबत सुरू झाली… आणि बघता बघता टेकओव्हरही झाली. एक कॉईननं खोडायचं रिचार्जचं कार्ड आजही जवळ आहे… तिचं लग्नानंतरचं नाव विसरलं जाईलही… पण ज्या युनिनॉरच्या नंबरवरुन तिनं लग्नाचं प्रॉमिस केलेलं… तो आजही लक्षात आहे… ८४८४७३… जाऊद्या राव… गोष्टी घडतात, बिघडतात… पण प्रेम ही लय भारी गोष्ट आहे, हे नक्की.

हे ही वाच भिडू:

2 Comments
  1. Manmohan says

    अहो शब्दांची मांडणी आणि लिहिले काय आहे समजत नाही कृपया ते नीट व्यवस्थित मांडावे

  2. Ramjan Shaikh says

    Aapan jo lekh lihila aahe to khip chan aahe. Asech nav navin lekh vachnyas milo aamhala.

Leave A Reply

Your email address will not be published.