अमेरिका जगाचा बाप कसा झाला त्याची ही गोष्ट…
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती हेनरी किसिंजर यांच एक वाक्य प्रसिद्ध आहे,
अमेरिकेला मित्र नाहीत तर फक्त हितसंबंध आहेत
आपल्या एका निर्णयावर जगातल्या अनेक देशांचे भवितव्य बदलणारा देश आहे अमेरिका. वसाहतवादातून जन्मलेलं पिल्लू आज जगाचा बाप बनलय. कुछ तो दम है ना बॉस..
हा अमेरिका आज सगळ्या जगाचा बापू कसा झालाय, बाप बनण्यासाठी त्याने केलं तरी काय याची एक छोटीशी गोष्ट..
अठराव्या शतकात भारत आणि चीन हे जगातले सगळ्यात मोठे व्यापारी देश होते. या देशांच्या भोवती सगळा व्यापार चालायचा. पण एकोणिसाव्या शतकात अमेरिकेने आपला वर्चस्व सिद्ध केलं.
सन १४९२ मध्ये इटालियन खलाशी क्रिस्तोफर कोलंबसने नॉर्थ अमेरिकेजवळील काही कॅरेबियन बेट शोधून काढली. याच वेळेस युरोपियनांना अमेरिका या भूभागाविषयी समजले. त्यावेळचे युरोपियन राज्यकर्ते वसाहतींचे भुकेले होते. त्यांनी लागलीच आपल्या वसाहती अमेरिकेत स्थापल्या.
वसाहतींची सुरुवात होण्याआधी अमेरिकेत रेड इंडियन्स राहत होते. ज्यांना नेटिव्ह अमेरिकन्स असही म्हंटल जायचं. सुरवातीच्या वसाहती स्पेनने सुरु केल्या. त्यांनी साऊथ अमेरिका कॅप्चर केलं. आज त्या भागाला लॅटिन अमेरिका म्हटलं जातं.
१६०० च्या काळात ब्रिटन आणि फ्रान्सने यांनीही आपल्या वसाहती अमेरिकेत वसवल्या. याच दरम्यान अमेरिकेत राहणारे मूळ अमेरिकन्स म्हणजेच रेड इंडियन्स किंवा नेटिव्ह इंडियन्स यांची लोकसंख्या नव्वद टक्क्यांपर्यंत घटली.
याचं कारण होतं, युरोपियन लोकांनी अमेरिकेत येताना आपल्यासोबत वेगवेगळे साथीचे रोग आणले होते. त्या साथीच्या रोगांना रेड इंडियन्स बळी पडले.
पुढे ४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेतील वसाहतवाल्यांनी ‘अमेरिकन्स वसाहतवाले’ स्वतंत्र असल्याचं घोषित केलं. अमेरिका हा आता स्वतंत्र लोकशाही असा देश बनला. त्यावेळी अमेरिका हा जगातला पहिला लोकशाही देश होता.
याच दरम्यान अमेरिकेच्या आसपास असणारी राज्य ब्रिटन, फ्रान्स, स्पेन यांच्या आधिपत्याखालून स्वतंत्र होऊ लागली होती. आधीच वसाहतींची गुलामगिरी सहन केलेल्या या राज्यांना लोकशाही असणाऱ्या अमेरिकेचा आसरा घेणं योग्य वाटलं. या राज्यांमध्ये फ्लोरिडा, ओहायो, टेक्सास ही राज्य होती.
अशाप्रकारे एकाला एक अशी राज्य अमेरिकेत सामील होत गेली आणि या सर्वांचा मिळून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असा देश बनला.
पुढं जाऊन याच अमेरिकेन जगावर आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी नवीन भूभाग खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यांनी रशियाकडून ३० मार्च १८६७ अलास्का खरेदी केले. या भूभागासाठी अमेरिकेने रशियाला ७.२ मिलियन यु.एस डॉलर दिले.
अशाच प्रकारे त्यांनी १८९८ मध्ये पॅसिफिक समुद्रात असणाऱ्या हवाई या देशावर आक्रमण करून तेथील राजघराण्याचे उच्चाटन करून सत्ता काबीज केली. आता बघायला गेलं तर अमेरिका काही वसाहतवादाला खतपाणी घालणारा देश नव्हता. पण त्याचं वागणं वसाहतवादी देशाला साजेस होत. उदाहरणादाखल बघायला गेलं तर १८९८ मध्ये अमेरिकेने पोर्टारिको आणि फिलिपाईन्स काबीज केले. फिलिपिन्सला आपल्या ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने स्पेनला २० मिलियन डॉलर्स दिले. पण १९४६ ला फिलिपाइन्स एक स्वतंत्र देश झाला. थोडक्यात पैसा फिलिपिन्सच्या पाण्यात गेला.
भूभागाच्या हव्यासामुळे अमेरिका वाढतच राहिली. जशी का अमेरिका वाढत गेली तेवढीच अर्थव्यवस्था वाढली. आणि वाढला त्यांचा जीडीपी.
पण अमेरिका बाप होण्यासाठी महत्वाचं ठरलं १ ले विश्व महायुद्ध.
या काळात अमेरिकेने अद्यायावत हत्यारे, दारुगोळा बनविण्यात आपली प्रगती केली होती. आणि विशेष म्हणजे अमेरिका हत्यारांचा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला होता. किंबहुना अमेरिका हा एकमेव देश होता ज्याने युद्धातूनही नफा कमावला होता. अमेरिका सोडून सर्व युरोपियन देश या युद्धात सहभागी होते.(नंतर अमेरिका ही सामील झाली.)
हे युद्ध ही युरोपच्या भूमीवर लढले गेले. या युद्धात अमेरिकेचे काही सैनिक मारले गेले पण अमेरिकेचे फार मोठे नुकसान झाले नाही.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या २ गोष्टी घडल्या. एक म्हणजे युद्धामुळे युरोपची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. लोकांचा असा समज झाला की आता आमच्या करन्सीचा सत्यानाश झालाय. त्यापेक्षा यु. एस डॉलर खरेदी करूया. यु. एस डॉलर ही त्यावेळची एक स्टेबल करन्सी होती. त्यामुळे जगात सगळ्यात जास्त डॉलरची खरेदी झाली. यामुळे डॉलरची किंमत वाढली.
१९४४ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यावर सर्व युरोपियन देशांनी असे ठरवले की,
आपण आपली करन्सी यू. एस डॉलरला लिंक करू आणि यू. एस डॉलर गोल्डला. जेणेकरून सर्व देशांची करन्सी स्टेबल राहिल. या युद्धात मित्र देश जिंकले आणि अशाप्रकारे अमेरिकेचा डॉलर जगाची करन्सी झाला.
यानंतर अमेरिकेने इंटरनॅशनल मोनेटरी फंड आणि संयुक्त राष्ट्र अशा संघटनांची स्थापना केली. १९४७ मध्ये अशीच एक संघटना तयार करण्यात आली. जिचे नाव ‘गॅट’ द जनरल एग्रीमेंट ऍण्ड ट्रेड असे होते. सुरवातीच्या टप्प्यात यात २३ देश सहभागी होते. या देशांनी आपल्या सीमा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुल्या केल्या. याचा फायदा या २३ देशांना किती झाला माहित नाही. पण अमेरिकेला आपल्या देशातील उद्योजकांना पुढे नेण्यासाठी या कराराचा मोठा फायदा झाला. पुढे जाऊन १९५५ मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
१९५० नंतर अमेरिका आणि सोविएत युनियन अशा दोन महासत्ता उदयाला आल्या.
या दोन्ही देशांत शीतयुद्ध सुरू झाले. शीतयुद्ध हे एक शांततामय पद्धतीने कुरघोडी करणे असे युद्ध होतं. यात भांडवलशाही आणि साम्यवादी अशा दोन व्यवस्थांची रचना होती. आता हे युद्ध त्यांनी समोरासमोर खेळले नाही. तर जगाच्या नकाशावर असणाऱ्या प्रत्येक एका देशाला हाताशी धरून त्यांच्या भूमीवर युद्ध खेळण्यात येत होते.
जसं की जिथ जिथ साम्यवाद रुजू पाहत होता त्या त्या देशात अमेरिका अंतर्गत हस्तक्षेप करून विरोधकांना हाताशी धरून सरकार पाडत होती. तर कधी दहशतवादी संघटनांना पाठिंबा देऊन, त्यांना हत्यारे,पैसा पुरवून तर कधी डायरेक्ट सी. आय. ए. कडून हत्या करणे असे प्रकार या शीतयुद्धात सुरु होते.
१९६४ मध्ये क्रांतिकारी चे गव्हेराची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. ऑपरेशन सायक्लॉन मध्ये अफगाणिस्तानात जाऊन तालिबान्यांना फंडिंग करून सोवियत युनियनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि अशामुळेच जगभरात दहशतवादी संघटना वाढू लागल्या.
इतर देशांत केलेल्या अंतर्गत हस्तक्षेपामुळे बरेच देश सुरक्षा आणि परराष्ट्र संबंधांसाठी अमेरिकेवर विसंबून राहू लागले. यातून अमेरिका जास्तच पॉवरफुल होऊ लागली. हेच कारण आहे की आज जगभरात ८०० हून अधिक मिलेटरी बेसेस अमेरिकेचे आहेत. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने आपल्या सैन्यावर प्रचंड खर्च केल्यामुळे आज अमेरिकेचे सैन्य जगातले एक नंबरचे अद्यायावत आणि प्रशिक्षित सैन्य म्हणून ओळखले जाते.
१९४९ मध्ये अमेरिकेने सोवियत युनियनला शह देण्यासाठी ‘नाटो’ नॉर्थ अटलांटिक सिटी ऑर्गनायझेशन ही संघटना बनवली गेली. अमेरिकेने ही संघटना ज्या युरोपियन देशांसमवेत बनवली त्या देशांना सुद्धा अमेरिकेवर सुरक्षेसाठी अवलंबून राहू लागले.
आज अमेरिका महासत्ता आहे याला प्रत्येक वेळेस नवीन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पॉलिसी जबाबदार आहे. यातील काही राष्ट्राध्यक्षांनी मिलिटरी पॉवरवर लक्ष केंद्रित केले. यात रोनाल्ड रेगन, रिचर्ड निक्सन, जॉर्ज बुश डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश होईल. तर काही राष्ट्राध्यक्ष जे शांततापूर्ण सहयोगावर विश्वास ठेवायचे यात रूझवेल्ट, रोबिन्सन, जिमी कार्टर, बराक ओबामा हे होते.
अशा पद्धतीने शीतयुद्धात अमेरिका आणि रशिया या दोन सुपर पॉवर होत्या. त्या वेळेसचा जगाचा नकाशा पाहिल्यास लक्षात येईल की अर्धे देश सोवियत युनियनच्या बाजूने तर अर्धे देश अमेरिकेच्या बाजूने होते. संपूर्ण जग विभागले होते.
पण ज्यावेळेस सोवियत युनियनचे पतन झालं त्यावेळी जगात फक्त आणि फक्त अमेरिकाच महासत्ता म्हणून उभी राहू शकली. भूभागाच्या राजकारणा व्यतिरिक्त अमेरिकेने अंतर्गत प्रगतीसाठी अनेक धोरण राबवली. ज्याचा परिणाम म्हणून आज अत्याधुनिक तंत्रविज्ञान अमेरिकेकडे आहे.
आणि अशाप्रकारे अमेरिका जगाचा बाप झाला.
हे ही वाच भिडू
- इंडियन आर्मीच्या ऐतिहासिक बॅण्डने अमेरिका ते रशिया सगळं काही जिंकून दाखवलय
- जगातला पहिला आतंरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा असा रंगला होता
- अमेरिका रशियाला मागे सारून या आफ्रिकन देशाने मंगळावर माणूस पाठवायची मोहीम आखली होती