BCCI ला ४८ हजार कोटी मिळाले खरे, मात्र लिलावात स्टारपेक्षा मोठा बादशहा ‘VIACOM-18’ ठरलंय

२००८ साल होतं. तुम्ही कदाचित शाळेत असाल किंवा कॉलेज. भारतीयांचं खेळातलं पहिलं प्रेम असणाऱ्या क्रिकेटमध्ये क्रांती होत होती. २००७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतानं सपाटून माती खाल्ली, देशात फुल जाळपोळ झाली. लोकांनी क्रिकेटर्सला थेट देशद्रोही ठरवलं.

याच वर्षी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतानं टी२० वर्ल्डकप जिंकला आणि धुव्वा झाला. क्रिकेट पुन्हा आवडता गेम झाला आणि क्रिकेटर्स हिरो.

भारतीय क्रिकेटला खरा जॅकपॉट लागला २००८ मध्ये, इंडियन प्रीमिअर लीग आली तेव्हा. आयपीएलनं क्रिकेटचं रुप पूर्णपणे बदलून टाकलं. प्लेअर्सच्या लिलावापासून ते चिअरलीडर्सच्या डान्सपर्यंत. याचवेळी आणखी एक गोष्ट बदलली ती म्हणजे, क्रिकेट पाहण्याची सवय. डीडी नॅशनल, टेन स्पोर्ट्स, निओ स्पोर्ट्स अशा चॅनेलवर क्रिकेट बघायची सवय मोडली आणि जिथं सूर्यवंशम बघायचो त्या ‘सेट मॅक्स’वर आपण क्रिकेट बघू लागलो.

गेल्या १५ वर्षांत आयपीएल सेट मॅक्स, स्टार स्पोर्ट्स, युट्युब अशा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळाली. आयपीएल दाखवणार कोण यावरुनही मोठे लिलाव झाले. पुढचे शून्य मोजायला २-३ मिनिटं लागतील इतके मोठे आकडे आले; मात्र यावर्षी कहर झाला.

पुढच्या पाच वर्षांसाठी आयपीएलचे मीडिया राईट्स विकले गेलेत एकूण ४८,३९०.५ कोटी रुपयांना.

नका शून्य मोजत बसू आकडा लई मोठाय. बरं हा एवढा मोठा आकडा एकूण चार पॅकेजेसचा मिळून आहे. यात टीव्ही हक्क जरी स्टार मीडियानं घेतलेले असले, तरी

सगळ्यात जास्त फायद्यात आलंय ‘VICOM-18’.

सगळा मॅटर विस्तारुन सांगताना, आधी आयपीएलच्या पॅकेजचा काय लोचाय ते बघू-

सगळ्यात आधी येतं पॅकेज ए. यात भारतीय उपखंडासाठीच्या टीव्ही राईट्सचा समावेश होता. गेल्यावेळी हे हक्क डिस्ने स्टारकडे होते. यंदाही त्यांनी फुल पॉवर लावली आणि २३ हजार ५७५ कोटी देत आयपीएलचे टीव्ही राईट्स घेतले. लिलावात देण्यात आलेली ही सगळ्यात मोठी रक्कम ठरली.

पण खरा गेम पुढं होता, जितकं पॅकेज ए महत्त्वाचं होतं तितकंच पॅकेज बी आणि सी सुद्धा.

पॅकेज बीमध्ये काय होतं, तर भारतीय उपखंडात आयपीएल दाखवण्याचे डिजिटल राईट्स. आपल्या आजूबाजूची माणसं जरी बघितली, तरी मोबाईल किंवा लॅपटॉपवर आयपीएल बघणारी जनता किती आहे याचा सहज अंदाज तुम्हाला येईल. त्यामुळं हे डिजिटल राईट्स महत्त्वाचे होतेच.

या पॅकेज बी मधून बीसीसीआय खोऱ्यानं पैसे ओढणार होतीच, पण त्यांनी एक स्कीम टाकली… ती म्हणजे पॅकेज सी.

यात आयपीएलच्या ठराविक १८ मॅचेसचे डिजिटल राईट्स देण्यात येणार होते. या मॅचेस कुठल्या तर आयपीएलच्या सीझनची पहिली मॅच, प्लेऑफ्स, शनिवार-रविवारचे डबल हेडर्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनल. जी कंपनी पॅकेज सी घेणार तिलाच या १८ मॅचेस दाखवता येणार, इतका सोप्पा विषय.

पॅकेज बी घेतलेल्या कंपनीकडं जर पॅकेज सी नसेल, तर त्यांचं मोक्कार नुकसान होणार होतं.

डिजिटल राईट्सचं पॅकेज बी घेतलं ‘व्हायकॉम १८’ नं. व्हायकॉम-१८ ची पॅरेंट कंपनी कोण?

तर मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज. 

व्हायकॉमनं २० हजार ५०० कोटींना पॅकेज बी घेतलं. त्यामुळं जर पॅकेज सी नसतं, तर हे २० हजार कोटी घाट्यात होते. साहजिकच त्यांनी पॅकेज सी ला जोर दिला आणि स्टारवाल्यांनीही पॉवर वाढवली.

व्हायकॉमनं लाऊन धरलंच आणि ३ हजार २५७.५ कोटींना पॅकेज सी वर ताबा मारला. इथवर त्यांचेही २३ हजार कोटी खर्च झाले होतेच.

आता मुद्दा राहतो पॅकेज ‘डी’चा. इथं भारतीय उपखंड सोडून बाकीच्या जगासाठी टीव्ही आणि डिजिटल राईट्सचा विषय होता. त्यात बीसीसीआयनं याच्यातही दोन भाग केले होते. एक होता, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि युनायटेड किंगडमचा, तर दुसरा होता मिडल ईस्ट कंट्रीज (आपलं दुबई वैगरे ओ), नॉर्थ आफ्रिका आणि अमेरिका.

मिडल ईस्ट असेल किंवा अमेरिका इकडं भारतीयांची संख्या जबरदस्त आहे, यात शंकाच नाही. त्यामुळं इथं आयपीएल पाहिलं जाणारच. पण दुसऱ्या बाजूला त्याहून मोठ्ठ मार्केट आहे, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि इंग्लंड, या SENA देशांमध्ये. इथं विषय कुणी रंगवला, पुन्हा एकदा व्हायकॉम-१८.

क्रिकेटवेड्या सेना देशांमध्ये जर आयपीएल बघायची झाली, तर त्याचे टीव्ही आणि डिजिटल राईट्स व्हायकॉम-१८ कडेच आहेत. तर मिडल ईस्ट आणि अमेरिकेत टाइम्स इंटरनेटनं बाजी मारलीये. हे पॅकेज डी गेलं १ हजार ५८ कोटींना.

या मीडिया राईट्सच्या लिलावात व्हायकॉम-१८ भारी का ठरलं..?

कारण एकदम सिम्पल आहे. मोबाईलवर मॅच बघणारी सगळी जनता व्हायकॉम-१८ कडे गेलीये. हा आकडा फक्त भारताचा नाही, तर जगभरातला आहे.

त्यात आयपीएल ही व्हायकॉम-१८ कडे असलेली एकमेव स्पर्धा नाहीये, याचवर्षी कतारमध्ये होणारा फिफा वर्ल्डकप, जगभर लोकप्रिय असलेली नॅशनल बास्केटबॉल लीग म्हणजेच एनबीए, ला लिगा, सिरी ए सारख्या मोठ्या फुटबॉल लीग्स, टेनिसमध्ये एटीपी इव्हेंट्स आणि बॅडमिंटनचे जागतिक इव्हेंट्स या सगळ्याचे भारतीय उपखंडातले डिजीटल राईट्स व्हायकॉम १८ कडे आहेत.

 क्रिकेटमध्ये त्यांचं घोडं फक्त अबूधाबी टी१० लीगवर अवलंबून होतं, मात्र आता थेट आयपीएलसाठीची पेज जिंकत त्यांनी लय मोठा हात मारलाय.

व्हायकॉम-१८ चा सध्यातरी एकच ओटीटी प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे Voot. बिग बॉसची फॅन जनता वगळता आपल्याकडे वूटचं सबस्क्रिप्शन घेणारे कार्यकर्ते तसे लई कमी असतील. मात्र एका आयपीएलमुळं हे चित्र बदलू शकतं अशी पैज कुणीही लावेल आणि जिंकेलही.

व्हायकॉम-१८ मध्ये ५१ टक्के भागीदारी अंबानींच्या रिलायन्सची आहे. मुंबई इंडियन्स दोन वर्ष गुणतक्त्यात तळाला असली, तरी मार्केट व्हॅल्यू एकदम मापात आहे. त्यात आता टीव्ही राईट्स जरी स्टारनं घेतले असले, तरी फक्त अंबानीच म्हणू शकतायत…

अक्ख मार्केट आता आपलंय.

जाता जाता आयपीएल कुठं बघायची सांगून ठेवतो, 

भारतातली जनता – टीव्हीवर स्टार आणि डिजिटलसाठी व्हायकॉम-१८.
भारताबाहेर पण SENA देशात – टीव्ही आणि डिजिटल दोन्हीसाठी व्हायकॉम-१८.
मिडल ईस्ट, नॉर्थ आफ्रिका आणि अमेरिका – टीव्ही आणि डिजिटल दोन्हीसाठी टाइम्स इंटरनेट.

म्हणूनच म्हणलं डिस्ने स्टारनं भले २३ हजार कोटी दिले असतील, पण खरे बादशहा व्हायकॉम-१८ वालेच ठरलेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.