आपल्या सेहवागमुळं पाकिस्तानचा अंपायर असद रौफ गोत्यात आला होता…

सकाळी सकाळी बातमी आली, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि आयसीसीच्या एलिट पॅनलमधला माजी अंपायर असद रौफ याचं हार्टअटॅकनं निधन.

आता आपल्याला क्रिकेट इतकं आवडतंय की फक्त क्रिकेटरच नाही तर अंपायर लोकांचेही बरेच किस्से नुसतं नाव घेतलं तरी लगेच आठवतात. हा असद रौफ प्लेअर म्हणून लय मोठी चमक दाखवू शकला नाही, पण अंपायर म्हणून त्याची कारकीर्द मस्त सुरू होती.

पण आयपीएलच्या वेळी बुकींशी संबंध असल्याच्या आणि त्यांच्याकडून महागडे गिफ्ट स्वीकारल्याच्या आरोपावरुन त्याची चौकशी सुरु झाली आणि बीसीसीआयनं त्याला बॅन केलं. 

असद रौफवर संशय वाढला याचं आणखी एक कारण होतं, आपला विरेंद्र सेहवाग. 

विरेंद्र सेहवाग म्हणजे भारतीय क्रिकेटने पाहिलेला आत्ता पर्यंतचा सर्वात बिनधास्त प्राणी. मस्त कलंदर माणूस. आयुष्यभर सगळे कॅप्टन कोच  सिनियर खेळाडू त्याला सांगून सांगून थकले ,

“विरू थोडा देख के खेल, पेहले सेट हो जा और फिर धुलाई कर.”

पण यानं कधी कोणाच ऐकलं नाही. मस्त गाणं गुणगुणत खेळायला यायचा, समोरचा बॉलर कोणीही असो पाय न हलवता पिटाई सुरु करायचा.  आता तो रिटायर झालाय पण आजही कधी काय करेल, कधी काय बोलेल सांगता येत नाही.

व्हॉट द डक नावाच्या शोमध्ये कुंबळे आणि सेहवाग आले होते, त्यावेळी बोलताना अनिल कुंबळेनी एक किस्सा सांगितला.

झालं काय होतं की, कुंबळे लेग स्पिनर होता, पण त्याचे बॉल काय विशेष वळायचे नाहीत. एकदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीज चालू होती. तिथल्या अंपायरला कुंबळेची बॉलिंग ठाऊक नव्हती. त्यामुळे व्हायचं काय की, बऱ्याचदा अंपायर एलबीडब्ल्यू आउट द्यायचेच नाहीत. कुंबळे वैतागला. अखेर त्याने पुढच्या मॅचच्या आधी नेट सेशनच्या वेळी अंपायरला बोलवलं आणि दाखवलं की आपले बॉल वळत नाहीत. त्या मॅचपासून ऑस्ट्रेलियन अंपायर बरोबर निर्णय देऊ लागले.

कुंबळेचा हा किस्सा ऐकून सेहवागलाही आपली स्टोरी सांगायची खुमखुमी आली.

कुंबळेचा जसा बॉल वळत नाही हा प्रॉब्लेम होता, तसाच सेहवागचा पाय हालत नाहीत हा प्रॉब्लेम होता. यामुळे सेहवाग हमखास एलबीडब्ल्यू आउट व्हायचा. कुंबळेनं आपल्या स्टाईलनं अंपायरना दाखवून दिलं होतं पण सेहवागचा सगळा कारभारच वेगळा होता.

भारताची फिल्डिंग चालू असतानाच सेहवाग अंपायरकडं आपली सेटिंग लावण्यासाठी गोड गप्पा मारायला सुरु करायचा. कधी त्यांना दिवसभर उभे राहून किती त्रास होतो याबद्दल सहानूभूती दाखवायचा.  तर कधी जोक सांगून हसवायचा. मग अंपायर आपल्या टप्प्यात आला असं जाणवलं की मग हळूच जाळं टाकायचा,

“do you want something? तुम्हाला भारतात काही हवं असेल तर मिळवून देऊ शकतो. मी भारतात सुपरस्टार आहे.”

सेहवाग एके ठिकाणी सांगतो, ‘माझ्या या जाळ्यात बरेच अंपायर अडकायचे. पाकिस्तानचा अंपायर असद रौफला चष्मे आणि गॉगलची प्रचंड आवड होती. मी तेव्हा आदिदासचा ब्रँड अम्बॅसिडर होतो. त्यामुळं त्याला कधी चष्म्यांची तर कधी बाहेर जेवणाचं अमिष दाखवायचो आणि निर्णय माझ्या बाजूनं लागायचे.’

एकदा असच झालं. २००८ सालची गोष्ट, मोहाली येथे भारत ऑस्ट्रेलिया सामना सुरु होता. सेहवाग बॅटिंग करत होता. असद रौफ अंपायर होता. सेहवागनं नेहमीप्रमाणे त्याच्याजवळ सेटिंग लावली होती. एका बॉलला कव्हर ड्राईव्ह मारण्याच्या नादात सेहवागच्या बॅटला घासून बॉल किपरच्या हातात जाऊन पोहचला.

मोहालीच्या ग्राउंडवर जास्त पब्लिक नसल्यामुळे शांतता होती . बॉल बॅटला लागलेला आवाज पार ड्रेसिंग रूमपर्यंत गेला असेल पण तरी असद रौफनं सेहवागला आउट दिलं नाही. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉंटिंग भडकला. त्याने सेहवागला विचारलं,

“तुझ्या बॅटला बॉल लागलेला ना?”

सेहवागनं हो म्हणून सांगितलं. सगळ्यांनाच आवाज गेला होता. सेहवागनं नाही म्हणणे शक्यच नव्हतं. मग रिकी पॉंटिंग म्हणाला, “आउट आहेस तर ग्राउंडमधून बाहेर का गेला नाहीस?”

सेहवाग शांतपणे म्हणाला,

“जोपर्यंत अंपायर आउट देत नाही तोपर्यंत तू कधी बाहेर जात नाहीस, मी का जाऊ ? अंपायरला जाऊन विचार. त्यानं आउट दिला तरच मी बाहेर जाईन”

पॉंटिंग अंपायरकडे गेला. त्यानं त्याला सांगितलं की, ‘विरू मान्य करतोय की त्याच्या बॅटला बॉल लागलेला.’ मग असद रौफ आणि पॉंटिंग परत सेहवागकडे आले. पण तेव्हा सेहवागने पलटी मारली.

“आपण असं कधी बोललोच नाही, पॉंटिंग नेहमीप्रमाणे खोटं बोलतोय.”

असद रौफनं त्याला नॉटआउट देऊन पुढचा खेळ सुरु केला. त्या दिवशी सेहवागने धडाकेबाज ९० धावा ठोकल्या.  बिचाऱ्या रिकी पॉंटिंगचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

पण हे सगळं जेव्हा मीडियासमोर आलं तेव्हा असद रौफनं सेहवागचे आरोप झिडकारले, आपण कधीच अशी लाच स्वीकारली नाही असं सांगितलं. मात्र २०१३ च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचं नाव आलं, मुंबई पोलिसांनी त्याची चौकशी केली, बीसीसीआयनं त्याच्यावर बंदीही आणली आणि पुढं जाऊन आयसीसीनंही.

आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यानं लाहोरमध्ये चपला आणि कपडे विकायचं काम केलं. हे दुकान बंद करुन जात असतानाच हार्ट अटॅकमुळं त्याचं निधन झालं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.