पहिला ‘ठाकरे’ ज्याने निवडणूक लढवली अन मंत्रीपद मिळवलं…अडीच वर्षात काय साध्य केलं ?

गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्रात घोंगावत असलेलं वादळ आता कुठे तरी शांत होताना दिसत आहे. पक्षफुटीतून निर्माण झालेल्या या वादळाने अखेर महाराष्ट्रातील सत्ता गिळंकृत करूनच नमतं घेण्याकडे वाटचाल केलीये.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची रिकामी झाली, उपमुख्यमंत्री पद रिकामं झालं, सगळं मंत्रिमंडळ बरखास्त झालं…

आता नवीन सत्ता येणार, नवीन मंत्रिमंडळ असणार….

या अडीच वर्षात महाविकास आघाडीने काय केलं? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि हाच प्रश्न देखील विचारला जात आहे.. मात्र सरकार म्हणून एका गटाचा प्रवास कसा राहिला हे बघत असताना काही वैयक्तिक नेत्यांची कामगिरी बघणं, त्यांचा एकट्याचा प्रवास बघणं महत्वपूर्ण ठरतं.. यातील एक नाव म्हणजे

आदित्य ठाकरे

सध्याच्या घडीतील ठाकरे कुटुंबातील सर्वात तरुण राजकारणी ज्यांना पहिल्याच टर्मला डायरेक्ट मंत्रिपद मिळालं…

२०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्याआधी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं…”उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या”

फक्त २२ वर्षांच्या आदित्य युवा सेनेचे अध्यक्ष म्हणून नुकतीच वाटचाल तेव्हा सुरु झाली होती. २०१० साली दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनीच युवा सेनेची घोषणा केल्यानंतर ही जबाबदारी आदित्य यांच्यावर सोपवली होती.

शिवसेनेने अनेक वर्ष व्हॅलेंटाईन डे ला कडाडून विरोध केला. हा परकीय सण आम्ही साजरा करणार नाही, असं शिवसैनिक म्हणायचे. पण आदित्य ठाकरेंनी याच्या विरुद्ध भूमिका घेतली. ‘तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल, तर ही भूमिका बदलावी लागेल’ असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

एक यशस्वी राजकारणी आणि युवा नेता होण्यासाठी तरुणाकडे आवश्यक असलेले सर्व काही आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. ते आपल्या फेसबुक पेजवरील कॉल आणि मेसेजेस, कमेंट्सना उत्तर देतात आणि ट्विटरवर व्यक्त होतात, असं ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक २०१४ मध्ये म्हटले होते.

वडील उद्धव ठाकरेंसारखं आदित्य यांचं व्यक्तिमत्व. शांत आणि संयमी नेते. आजोबांसारखा  खणखणीत आणि दमदार आवाज आणि शैली त्यांच्याकडे नाही. मात्र त्यांनी महाराष्ट्रभर फिरायला सुरुवात केली आणि शिस्तबद्ध राजकारण्याची प्रतिमा बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. उत्तम शिक्षण घेतल्यानं प्रत्येक मुद्दा अभ्यासपूर्ण रीतीनं मांडू लागले. 

याचमुळे मनसेकडे गेलेला तरुणही त्यांच्याकडे वळताना अक्ख्या महाराष्ट्राने बघितलं…

२०१९ ची विधानसभा निवडणूक लागली… जोरात शिवसेनेने प्रचाराला सुरुवात केली. यामध्ये आदित्य ठाकरेंवर शिवसेनेचा मुख्य फोकस राहीला. आदित्य यांना अधिकृतरीत्या राजकारणात लॉन्च करायची वेळ आली आहे, हे तेव्हा सगळ्यांनी टिपलं होतं.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली. निवडणूक लढवणारे ठाकरे घराण्यातील ते पहिले व्यक्ती ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या सुरेश माने यांचा ७० हजारांहून अधिक मत मिळवत आदित्य ठाकरेंनी पराभव केला होता.

त्यावेळी त्यांचं वय होतं २९.

तेव्हा शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा होती. शिवसेनेला सौदा करण्यासाठी पुरेशी जागा मिळाल्यास आदित्य ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र तसं झालं नाही आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आदित्य ठाकरे यांना पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. 

आदित्य ठाकरे यांनी राजकीयदृष्ट्या फारसे आकर्षक किंवा हायप्रोफाइल नसलेले विभाग निवडलं होतं मात्र हे विभागही किती महत्वाचं आहे, हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मुद्दा पेट घेत असताना एक तरुण आणि सुशिक्षित नेता म्हणून या खात्याची आदित्य यांची निवड सूचक ठरली होती. 

महाविकास आघाडी सरकारच्या सुरुवातीच्या काळात आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांसोबत अनेक आढावा बैठका आणि क्षेत्र भेटींना हजेरी लावली होती. त्यांच्या विभागाचा ज्या विभागांशी संबंध नव्हता त्या बैठकींनाही ते हजेरी लावत होते. 

उदाहरणार्थ, निसर्ग चक्रीवादळाचा रायगडला फटका बसला तेव्हा ते उद्धव ठाकरेंसोबत आढावा घेण्यासाठी गेले. २०२० मध्ये लॉकडाऊन वाढवणं आणि टप्प्याटप्प्यानुसार शिथिलता आणणं या राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ च्या बैठकांना उपस्थित राहिले. अगदी ते इतर मंत्र्यांच्या अखत्यारीतील जिल्ह्यांमधील साथीच्या आढावा बैठकीसही उपस्थित राहिले. 

प्रत्येक वेळी आदित्य यांची ही उपस्थिती बघून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना सरकारमधील आदित्य यांच्या भूमिकेबद्दल शंका असल्याचं, काही नेत्यांनी माध्यमांना सांगितलं होतं.

मात्र हळूहळू हे चित्र बदललं आणि आदित्य यांनी स्वतःच्या पर्यावरण खात्यावर भर द्यायला सुरुवात केली.

जवळजवळ प्रत्येक प्रकल्पासाठी, क्षेत्रासाठी आदित्य यांनी विभागातील सरकारी अधिकारी तसेच खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची बॅक-अप टीम तयार केली. वेगवेगळे निर्णय घेण्यास सुरुवात केली…

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्प त्यांनी रद्द केला.

त्याला कांजुरमार्गला बांधण्याचा निर्णय घेतला. शिवाय आरेमधील कारशेडला विरोध करणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.

राज्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्यास सुरुवात केली. इलेक्ट्रिक व्हेइकल वापरकर्ते आणि कंपन्यांना विविध प्रोत्साहन देण्यासाठी ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१’ ची घोषणा केली.

हवामान बदल कमी करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ सुरू केलं. ज्याचं नुकतच सद्गुरू जग्गी वासुदेव याच्या उपस्थितीत माझी वसुंधरा अभियान ३.०’ व्हर्जन लॉन्च झालं होतं.

शिवाय नवी मुंबई उड्डाणपुलाखालील झाले तोडण्याला रोख लावण्यापासून ते नागपुरातील एक २०० वर्ष जुनं झाड तोडू न देणं, इथपर्यंत त्यांनी मुद्दे हाताळले. अशा छोटेच पण महत्वाच्या धाडसी निर्णयांमुळे आणि धोरणांमुळे आदित्य ठाकरे यांना स्वत:साठी एक वेगळं स्थान निर्माण करण्यास मदत केली.

महाराष्ट्रातील हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी आदित्य यांनी राज्य सरकारला ‘स्टेट कौन्सिल फॉर क्लायमेट चेंज’ स्थापन करायला लावलं. २०२१ मध्येच त्यांनी ग्लासगो इथे पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषद, सीओपी-२६ मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. 

यात त्यांनी महाराष्ट्राच्या नेट-झिरो प्रकल्पाबद्दल, महाराष्ट्रातील शहरांसाठी हवामान अंदाजपत्रक तयार करण्याबद्दल वेगवेगळे देश आणि शहरांमधील मंत्री, राज्यपाल आणि महापौरांशी संवाद साधला. 

पर्यावरणाव्यतिरिक्त आदित्य यांनी मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामांवरही लक्ष केंद्रित केलं. मुंबईच्या उपनगरांसाठी प्रभारी मंत्री असलेले आदित्य हे साप्ताहिक किंवा द्विसाप्ताहिक आढावा बैठका घ्यायचे आणि शहरातील वाहतूक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नियमित क्षेत्रीय दौरे देखील करायचे, अशी माहिती आहे.

कोरोना काळात नागरी संस्थेच्या कोव्हिड लसीकरण मोहीम, कोरोनाचे नियम आणि कायदे, कोस्टल रोडसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा नियमित आढावा ते घेत होते. त्यांनी प्रोटोकॉल पोर्टफोलिओ देखील बनवला होता. आणि प्रोटोकॉल मंत्री या नात्याने आदित्य यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांची भेट घेतली होती.

यासर्व काळात ते कोणत्याही वादात पडले नाही. फक्त सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात त्यांचं नाव आलं तेव्हा त्यांना ट्रोल केलं गेलं, तरी ते शांत राहिल्याचं दिसलं. दोन वर्ष कामात गेले, संयमाने गेले. 

मात्र अलीकडे आदित्य ठाकरे यांना हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पक्षाने लॉन्च करायला सुरुवात केल्याचं दिसलं. 

त्याचं कारण म्हणजे गरज ! कसं ?

एकीकडे भाजप आणि दुसरीकडे मनसे सारखे पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन जेव्हा पुढे येऊ लागले आणि गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात हिंदुत्वाचा झेंडा ज्यांच्याकडे राहिला त्या शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले तेव्हा शिवसेनेनला पुढे येणं भाग पडल्याचं दिसलं.

हिंदुत्व मुद्दा येताच आदित्य आक्रमक होताना दिसू लागले. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. योगी यांनी धर्मांमधील द्वेष वाढला आहे आणि आता बदल करण्याची वेळ आली आहे, असं ते फेब्रुवारी २०२२ मध्ये म्हणाले होते.

राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला तेव्हा शिवसेनेच्या वतीने आदित्य यांच्यावर अयोध्या दौऱ्याची धुरा देण्यात आली. या मुद्यावरून देखील ते खूप आग्रही राहिल्याचं दिसलं.

मात्र विधान परिषद निवडणुकांनंतर आदित्य जास्त आक्रमक झाले. त्यांच्याच पक्षातील ४० आमदारांनी बंड केलं तेव्हा आदित्य यांची वक्तव्य खोचक राहिली.

“ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केली याचे वाईट वाटतं. या आमदारांत जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती, ठाण्यात राहता आलं नसतं का? असो, बरं झाली घाण सेनेतून निघून गेली” असं आदित्य म्हणाले होते. 

मवाळ नेता म्हणून भूमिका राहिलेल्या आदित्य यांना अचानक भूमिका बदलावी लागली अशी स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती. मात्र अखेर यातून निष्पन्न काय झालं? तर सद्याच्या घडामोडी ज्या आपण रोज पाहतच आहोत.

एकंदरीत आदित्य ठाकरे यांचा मंत्री म्हणून राहिलेला प्रवास बघता सरकार पडल्यानंतर शिवसेनेचा पुढचा प्रवास कसा राहील? हा प्रश्न उपस्थित होत असताना केवळ अडीच वर्ष कामासाठी मिळालेल्या आदित्य ठाकरेंचा पुढचा प्रवास कसा राहील? त्यांची पुढची घौडदौड कशी राहील ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय…

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.