ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन : अशी होती कारकिर्द

आपल्याकडे राजकीय नेत्यांना थोडं काही झालं की बातमी होते. मात्र ब्रिटनमध्ये असं होत नाही. खुद्द ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबाबत प्रसिद्धीपत्रक खूपच मोठं काही असल्याशिवाय काढलं जात नाही. गेल्यावेळी राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा प्रसिद्धीपत्रकामार्फत कळवण्यात आलं होतं. आणि यानंतर काल ८ सप्टेंबरला असं प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं.

“आज सकाळी क्वीन एलिझाबेथ यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. राणी त्यांच्या बालमोराल कॅसल या निवासस्थानी विश्रांती घेत असून त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.” असं पत्रकात नमूद करण्यात आलं होतं.

प्रसिद्धी पत्रकानंतर एकाएकीच कॅसलबाहेर राणी एलिझाबेथ यांच्या हितचिंतकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यांचे कुटुंबीय देखील कॅसलमध्ये दाखल झाले. सोशल मीडियावर राणीसाठी प्रार्थना करण्यात येऊ लागली अनेक राजकीय नेत्यांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या मागे उभं असल्याचं सांगितलं.

या सगळ्या घटना ज्या गोष्टीकडे इशारा करत होत्या तेच झालं आणि ९६ वर्षांच्या राणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या पदाचा आणि जगाचा निरोप घेतला.

जगभरातून सगळ्यात जास्त आदर आणि प्रेम मिळवणाऱ्या या राणीच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असायची. जगातील सर्वात प्रसिद्ध स्त्रियांमध्ये त्यांना गणलं जातं.  १९५२ मध्ये  टाइम्स मॅगझिनने वुमन ऑफ द इयर म्हणून त्यांना मान दिला होता. 

ब्रिटीश इतिहासात इतर कोणत्याही सम्राटापेक्षा सर्वात जास्त काळ राज्य करणारी राणी म्हणून एलिझाबेथ यांना ओळखलं जातं. तर जगातील दुसऱ्या क्रमांकाला सर्वात जास्त राज्य करणारी राणी म्हणूनही त्या आहेत. नेहरूंपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत भारताचे सगळे पंतप्रधान त्यांनी बघितले आहेत. 

जवळपास १५ पंतप्रधानांना त्यांनी शपथ दिली आहे. अमेरिकेच्या १३ राष्ट्राध्यक्षांची त्यांनी भेट घेतली आहे. 

इतकंच नाही विन्स्टन चर्चिल सारखे जगप्रसिद्ध राजकारणी त्यांच्या अंडर काम करणारे पहिले पंतप्रधान होते. आणि जाता जाता देखील त्यांनी दिवसांपूर्वी म्हणजेच ६ सप्टेंबरला औपचारिकपणे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.

आज त्यांचा ७० वर्षांचा कार्यकाळ जेव्हा संपलाय तेव्हा त्यांच्या दीर्घ कारकीर्दीतील आणि आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण बघणं गरजेचं ठरतं… 

अशा या राणीचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी लंडनमध्ये झाला. तेव्हा त्यांचे आजोबा जॉर्ज पंचम गादीवर विराजमान होते. डिसेंबर १९३६ मध्ये त्यांचे काका एडवर्ड आठवे यांनी पदत्याग केला आणि राणीचे वडील किंग जॉर्ज सहावे ब्रिटनचे राजा झाले. त्यावेळी राणीचं वय केवळ १० वर्ष होतं.

एलिझाबेथ जेव्हा २१ वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांनी त्यांचं आयुष्य जनतेसाठी वाहिल्याचं जाहीर केलं होतं. १९४७ मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिका ब्रिटिश साम्राज्याचा भाग होता तेव्हा त्यांनी त्याचा दौरा केला होता. तेव्हा केपटाऊनहून रेडिओवर प्रसारित करण्यात आलेल्या भाषणात त्या म्हणाल्या होत्या “मी तुम्हा सर्वांसमोर जाहीर करते की, माझं संपूर्ण आयुष्य तुमच्या सेवेसाठी असेल” 

१९५१ च्या दरम्यान जॉर्ज यांची तब्येत बिघडायला लागली होती तेव्हा एलिझाबेथ त्यांच्या गैरहजेरीत सामूहिक सभांमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करायच्या. एकाच वर्षात फेब्रुवारी १९५२ मध्ये जॉर्ज यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एलिझाबेथ ब्रिटनच्या राणी म्हणून सिंहासनावर आरूढ झाल्या. त्यावेळी त्या अवघ्या २५ वर्षांच्या होत्या.

WhatsApp Image 2022 09 08 at 111046 PM
source – social media

जून १९५३ मध्ये त्यांचा अधिकृत राज्याभिषेक झाला त्यावेळी राणी २७ वर्षांच्या होत्या. हा कार्यक्रम प्रथमच तेव्हा टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आला होता. राणीचे पती फिलिप यांच्या आयडियामुळे ब्रिटन आणि जगभरातील लाखो लोकांनी बीबीसीवर त्यांच्या राज्याभिषेक सोहळा बघितला होता.

“माझा अनुभव जरी कमी असला आणि माझं कामंही नवीन असलं तरी माझ्या वडिलधाऱ्यांचा आदर्श घेऊन मी निश्चितपणे तुमच्या अपेक्षांवर खरी उतरेल” असं एलिझाबेथ त्यावेळी देशाला संबोधित करताना म्हणाल्या होत्या.

त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी ९० पेक्षा जास्त राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत. यामध्ये भारत, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड सारख्या देशांशी मित्रत्वाचे संबंध ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे.

राणी म्हणून त्यांनी १९५७ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेला भेट दिली होती. जेम्सटाऊनमध्ये झालेल्या पहिल्या कायमस्वरूपी इंग्रजी वसाहतीच्या ३५० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांच्याशी त्यांनी भेट घेतली होती.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी कधीच मुलाखत दिली नाही. मात्र १९५७ पासून त्यांनी नाताळनिमित्त टेलिव्हिजनवरून जनतेला संबोधित करण्याची प्रथा सुरु केली होती. “मी तुम्हाला युद्ध, कायदे, न्याय अशा कोणत्याही गोष्टी देऊ शकत नाही मात्र मी तुम्हाला माझं मन आणि राष्ट्रपती माझी भक्ती देऊ शकते,” असं त्या पहिल्या भाषणात म्हणाल्या होत्या. 

WhatsApp Image 2022 09 08 at 111100 PM
source – social media

दुसऱ्या एलिझाबेथ राणीच्या कार्यकाळातील उल्लेखनीय सांस्कृतिक क्षणांपैकी एक म्हणजे २६ ऑक्टोबर १९६५ रोजी बीटल्सने लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसला दिलेली भेट. जॉन लेनन, पॉल मॅककार्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार  राणीला भेटायला आले होते तेव्हा हजारो फॅन्सनी राजवाड्याच्या भोवती गर्दी केली होती. पोलिसांवर दबाव टाकून राजवाड्याच्या दारांवर आणि दीपस्तंभांवर लोक चढत असतानाचे फोटो आजही लोकांना आकर्षित करतात.

राणीच्या राजवटीत झालेला मोठा विनाश म्हणजे ऑक्टोबर १९६६ मध्ये घडलेली घटना. पाण्याने भिजलेल्या डोंगरातून कोळशाचे ढीग सैल झाले होते आणि हिमस्खलन होऊन अबेरफानच्या वेल्श शहरात ते वाहून आले होते. या घटनेत १४४ लोक मारले गेले होते ज्यात बहुतांश शाळकरी मुलं होती. 

एलिझाबेथने मात्र घटनास्थळाला जवळपास आठ दिवसांनी भेट दिली होती म्हणून लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यावेळेची राणीने त्यांच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप होत असल्याचं म्हटलं होतं, असं सांगितलं जातं. 

१९६९ मध्ये चंद्रावर उतरणारे पहिले लोक बनल्यानंतर नील आर्मस्ट्राँग, मायकेल कॉलिन्स आणि बझ अल्ड्रिन यांनी ग्लोबल गुडविल टूर केला होता तेव्हा त्यांनी १४ ऑक्टोबर १९६९ रोजी राणीची भेट घेत बकिंगहॅम पॅलेसमध्ये मुक्काम केला होता. 

१९७० मध्ये राणी एलिझाबेथने शतकानुशतकांची परंपरा मोडली होती जेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या शाही दौऱ्यावर असताना जनतेला दूरवरून हात हलवत वंदन करण्याऐवजी लोकांमध्ये जाऊन त्यांना जवळून अभिवादन केलं होतं. तेव्हापासून राजघराण्यातील अनेक सदस्यांसाठी ‘वॉकाउट’ ही प्रथा स्वीकारली होती.

WhatsApp Image 2022 09 08 at 111142 PM
source – social media

ऑक्टोबर १९८६ मध्ये एलिझाबेथ चीनला भेट देणाऱ्या पहिल्या ब्रिटिश राणी बनल्या. त्यांच्या आधी राजघराण्यातून कोणत्याही व्यक्तीने चीनला भेट दिली नव्हती. हाँगकाँगला चीनच्या ताब्यात परत देण्याची तयारी करत असताना ब्रिटनच्या मुत्सद्दी प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून या दौऱ्याकडे पाहिलं जात होतं.

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष नेल्सन मंडेला जुलै १९९६ मध्ये चार दिवसांच्या राज्य भेटीसाठी ब्रिटनमध्ये आले होते. तेव्हा संसदेच्या सदस्यांना संबोधित केलं होतं. या दौऱ्यादरम्यान राणीने  मंडेला याचं बकिंगहॅम पॅलेसमध्ये आदरातिथ्य केलं होतं आणि मध्य लंडनमधून घोडागाडीने प्रवासही केला होता. 

WhatsApp Image 2022 09 08 at 111208 PM
source – social media

२००७ मध्ये, राणीने त्यांच्या ख्रिसमसच्या प्रसारणाला ५० वर्षे पूर्ण केली तेव्हा त्यांनी आधुनिक माध्यमाला स्वीकारत त्यांचं भाषण यूट्यूबवर पोस्ट केलं होतं.

२०१२ च्या लंडन ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत त्यांनी अचानक हजेरी लावून सर्वाना आश्चर्यचकित केलं होतं. ही एंट्री देखील त्यांनी खूप नाटकीय पद्धतीने केली होती. ब्रिटनचा सर्वात प्रसिद्ध गुप्तहेर जेम्स बाँड यांची भूमिका साकारलेल्या अभिनेता डॅनियल क्रेगसोबत त्यांनी ऑडियन्समध्ये एंट्री केली होती. 

९ एप्रिल २०२१ रोजी राणीचे पती प्रिन्स फिलिप यांचं निधन झालं. कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अंत्ययात्रेला केवळ जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. राष्ट्रीय निर्बंध पाळून राणींना काळ्या चेहऱ्याचा मुखवटा परिधान करून प्यूमध्ये एकटीच बसलेलं तेव्हा अनेकांनी बघितलं होतं. 

अशी ही राणी एलिझाबेथ द्वितीय ब्रिटनशिवाय इतर १५ देशांचीही राणी होती.

युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सोलोमन बेटे, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, बेलीझ, अँटिग्वा आणि बार्बुडा या देशांवर राणी राज्य करत होती. याशिवाय त्या राष्ट्रकुलच्या ५४ राष्ट्रांच्या प्रमुख असून ब्रिटिश सम्राज्ञी म्हणून त्या इंग्लिश चर्चच्या सर्वोच्च राज्यपाल होत्या.

खासगी आयुष्यात त्यांना हॉर्सरायडींग आवडायची. त्यांच्याकडे अनेक रेसहॉर्स होते. वारंवार त्या शर्यतींना हजेरी लावायच्या आणि अधूनमधून अमेरिकेतील केंटकी स्टड फार्मला भेट द्यायच्या. त्यांची मालमत्ता बघता त्या जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक बनली होत्या.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.