ज्या कोकणामुळे सेना उभारली त्या कोकणाबद्दल ठाकरेंचा काय प्लॅन आहे..?

ठाणे, मराठवाडा अशा शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यांना शिंदेच्या बंडामुळे भगदाड पडलं आहे. यातच एक नाव म्हणजे

 ‘कोकण’

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर यांच्यासह ठाणे, मुंबई शहर व मुंबई उपनगर हे असे ७ जिल्हे कोकणात येतात.

मात्र ठाणे शहर, मुंबई शहर व मुंबई उपनगर हे तीन जिल्हे सोडून राहिलेल्या सिंधदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यातल्या त्यातही सिंधदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याबद्दल आपण बोलणार आहोत.

कोकणी माणूस कोकणातही आणि मुंबईतही नेहमी शिवसेनेच्याच बाजूने उभा राहिल्याचा इतिहास आहे. कोकणातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात म्हणजेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमध्ये शिवसेनेचे जास्त आमदार निवडून येतात.

या चार जिल्ह्यात मिळून २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१४ सालच्या निवडणुकीच्या निकालाचा विचार केला असता, शिवसेनेचेच आमदार सर्वाधिक असल्याची आकडेवारी सांगते.

शिवसेनेचे सर्वाधिक १० आमदार आणि बाकी राष्ट्रवादी – ३, शेतकरी कामगार पक्ष – २, बहुजन विकास आघाडी – ३, भाजप – २ आणि काँग्रेस – १ अशी २०१४ ची आकडेवारी होती. 

२०१९ मध्ये देखील ही आकडेवारी टिकून राहिली. महाड, अलिबाग, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, कर्जत, पालघर आणि सावंतवाडी या ठिकाणी शिवसेनेचे आमदार झाले.

सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे राज्यमंत्री दीपक केसरकर हे १३ हजार ९४१ मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांचा पराभव केला होता. कुडाळमधून शिवसेनेचे वैभव नाईक हे १४ हजार ३४९ मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार रणजीत देसाई यांचा पराभव केला होता. 

रत्नागिरीत उदय सामंत १ लाख १८ हजार १६६ मत घेत, गुहागरमध्ये भास्कर जाधव ७८ जाहीर ६१४ मत घेत, राजापूरमध्ये राजन साळवी ६५ हजार २५७ मत घेत, महाडमध्ये भरत गोगावले १ लाख २ हजार २७३ मत घेत, अलिबागमध्ये महेंद्र दळवी १ लाख ८ हजार ८१ मत घेत आणि दापोलीत योगेश कदम ९४ हजार ९९३ मत घेत जिंकून आले होते. 

कर्जतमधून महेंद्र थोरवे, पालघरमधून श्रीनिवास वनगा आमदार झाले.

अशाप्रकारे २०१९ च्या निवडणुकीत कोकणात शिवसेनेचे १० आमदार होते. दुसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली होती. यावेळी तर मुख्यमंत्री पद पक्षाला मिळालं. शिवसेनेचा प्राण मुंबई आणि कोकणात वसतो असं म्हटल्यास वावगं वाटू नये, अशी ही स्थिती. मात्र दुर्दैवाने बहुसंख्य पक्षविरोधी बंडही याच प्रांतातून झाले.

२००५ मध्ये नारायण राणेंनी बंड केलं आणि शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्‍न उपस्थित करणारा दावा केला. हा दावा अजूनही इथल्या राजकीय इतिहासात ताजा आहे. त्यानंतर आता २०२२ मध्ये कोकणचाच भाग असलेल्या ठाण्यातील एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेना बॅकफुटला गेली. आता यापुढे शिवसेना पुन्हा एकदा अस्तित्वाची लढाई लढणार अशी चिन्ह उपस्थित झाली आहेत.

कारण आता कोकणात शिवसेनेचे फक्त तीन आमदार शिल्लक राहिले आहेत. वैभव नाईकभास्कर जाधव आणि राजन साळवी. बाकी सर्वांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.  

कोकणात आता स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, तर शिवसेनेला परत एकदा नव्याने पायाभरणी करावी लागणार असं दिसतंय. या प्रक्रियेत जे आमदार शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत त्यांना कोकणात बरोबरीची टक्कर देणारे ‘शिवसेना’ आमदार उभे करावे लागणार आहेत.

सगळ्यात पहिले बघूया वैभव नाईक यांच्याबद्दल…

कोकणातल्या राजकारणावर चर्चा करताना बरीचशी वाक्यं क्रमानं येऊ लागतात. ‘कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला’ हे जसं म्हटलं जातं तसंच ‘कोकण म्हणजे नारायण राणे’ असंही एक वाक्य आहे. 

खरंतर नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा कोकणात ‘आता शिवसेना संपली’ असं बोललं जाऊ लागलं. मात्र राणेंविरोधात लढन्यासाठी एक हुकमी एक्का भेटला तो वैभव नाईक यांच्या रुपाने. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी शिवसेना नेते नारायण राणे यांचा तब्बल १० हजार मतांनी धक्कादायक पराभव केला होता. राणेंचा पराभव केल्याने नाईक चर्चेत आले होते. 

त्यात राणे शिवसेना संघर्षात हळूच एंट्री घेतली दीपक केसरकर यांनी. कोकणात शिवसेना आणि भाजपच्या गेल्या काही वर्षात सुरू असलेल्या संघर्षात नारायण राणे आणि दीपक केसरकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. 

केसरकर सुरूवातीला काँग्रेसमध्ये होते. मग ते राष्ट्रवादीत प्रवेशले. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत राणे यांना विरोध करत त्यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. उध्दव ठाकरे यांनी स्वतः सावंतवाडीत येऊन त्यांना शिवबंधन बांधलं. पाहता पाहता त्यांनी नारायण राणेंना टक्कर द्यायला सुरुवात केली. शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या राणेंचे थेट विरोधक दीपक केसरकर राहिले आहेत. त्यानंतर दोनवेळा ते शिवसेनेचे आमदार होते. मध्यंतरी मंत्री देखील झाले. 

मात्र या बंडानंतर राणे आणि केसरकर हे दोन्ही नेते आता राज्यातील सत्ता असणाऱ्या गटांचे सहयोगी आहेत. त्यामुळे त्यांची राजकारणातील पारंपरिक भूमिका आता बदलणार आहे. या बंडानंतर शिंदे गटात सामिल केसरकरांचं वजन अचानक वाढलं. या गटाचा प्रवक्ता म्हणून त्यांनी आठवड्याभरातच आपली छाप निर्माण केली. थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना नडले. यामुळे पुढच्या मंत्रिमंडळात त्यांचं स्थान निश्‍चित मानलं जात आहे. 

अशात आता त्यांना टक्कर देणारा चेहरा शिवसेनेकडे राहतोय तो वैभव नाईक.

केसरकर यांची भूमिका ‘भाजपाशी युती करावी’ अशी झाल्यानंतरही कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक मात्र सतत राणेंशी संघर्ष करत आले आहेत. राणे मुख्यमंत्री, महसूलमंत्री होते तेव्हापासून आम्ही संघर्ष करत आलो आहोत. त्यामुळे काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार नाईक यांनी दिली होती.

त्यांनी सुरूवातीपासूनच उध्दव ठाकरे यांच्याप्रती निष्ठा जाहीर केली आहे. शेवटचा आमदार राहिला तरीही मी ठाकरे यांच्याच सोबत राहणार असं प्रतिपादन त्यांनी केलं आहे. अशात केसरकर आणि राणेंच्या विरोधात शिवसेना ‘वैभव नाईक’ हा चेहरा इस्टॅब्लिश करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

यामध्ये त्यांना साथ मिळेल सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांची. विनायक राऊत यांचं राजकारणही राणेंविरोधातच राहिलं आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा पराभव करत राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग -रत्नगिरी लोकसभा मतदारसंघ या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. 

मात्र विनायक राऊत यांनी २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन टर्म निलेश राणे यांचा पराभव केल्याने शिवसेनेला सिंधुदुर्ग -रत्नगिरी लोकसभा मतदारसंघात पुन्हा उभा राहता आलं.

रत्नागिरीबद्दल बोलायचं तर या जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर अशा पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. इथले दापोलीचे योगेश कदम आणि रत्नागिरीचे उदय सामंत बंडखोर गटाला मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना पर्याय शोधावा लागेल अशी स्थिती आहे. 

अशात केवळ राजापुरचे राजन साळवी, गुहागरचे भास्कर जाधव हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. 

सलग तीन वेळा राजापूरमधून निवडून आलेले राजन साळवी, उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जातात. राजन साळवी यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उमेदवारी देऊन शिवसेनेने आधीच त्यांच्यावरचा विश्वास स्पष्ट केला आहे. 

तर जाधव हे सेनेचे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. 

उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रं आल्यानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारं पहिलं मोठं नाव होतं, ते म्हणजे भास्कर जाधव. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी हातात शिवबंधन बांधलं आणि आमदारकीची हॅटट्रिक पूर्ण केली. जाधव यांनी महाविकास आघाडीच्या वतीने भाजपला जोरदार विरोध केला होता.

ज्यावेळी भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली होती, अगदी तशीच परिस्थिती असताना ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत, हे नक्कीच लक्षात घेण्यासारखं आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विधानसभेचं २ दिवसीय विशेष अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात भास्कर जाधव यांनी तुफान फटकेबाजी केल्याचं सर्वांनी बघितलं. 

म्हणजेच या दोन नेत्यांना शिवसेना महत्व देत असल्याचं दिसत आहे. म्हणून पक्ष या दोन्ही नेत्यांवर धुरा सोपवणार ही शक्यता नाकारता येत नाही. 

शिवसेनेतर्फे या ठिकाणी आता माजी आमदार सूर्यकांत दळवी, अमोल किर्तीकर आणि माजी खासदार अनंत गिते यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हे तिघेही सक्रिय झाल्यास कदम यांच्यासाठी भविष्यात मोठं आव्हान निर्माण होवू शकतं, असं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे.

रायगडमध्ये महेंद्र दळवी, भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे या तिन्ही आमदारांनी बंडखोरी केली आहे.

त्यामुळे इथे पक्षाचं पुन्हा पुनरुज्जीवन करताना पक्षाच्या बाहेरच्या नेत्यांचा फायदा होऊ शकतो का? याकडे शिवसेना लक्ष देईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये साहजिक नाव घेतलं जातंय ते आमदार अदिती तटकरे यांचं.

२०१९ च्या निवडणुकीत श्रीवर्धनमधून शिवसेना उमेदवार विनोद घोसाळकर यांचा पराभव करत अदिती तटकरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील मिळालं होतं. मात्र त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात शिवसेना आमदारांचं खच्चीकरण होत असल्याचा आरोप सेनेच्या बंडखोर आमदारांनी केला होता. 

जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी पारंपरिक फाइट असताना अदिती तटकरे सेना नेतृत्वाशी मात्र चांगले संबंध राखून होत्या. मार्च महिन्यात शिवसेनेचे युवराज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी तटकरे यांच्या घरी जाऊन स्नेहभोजन घेतलं होतं. 

त्यामुळे पक्षनेतृत्वाकडे आमदारांच्या भावनांना  किंमत नसल्यानं आणि कार्यकर्त्यांसमोर अपमानाची भावना निर्माण होऊन याच रागातून शिवसेनेचे तिन्ही आमदार बंडात सहभागी झाले, असं बोललं जातं.  

महाविकास आघाडी सरकार गेल्याने तटकरे यांचं देखील पालकमंत्री पद गेलं आहे. मात्र सत्ता गेली तरी शिवसेना अजूनही महाविकास आघाडीमध्ये आहे. जर तटकरे बाप-लेकीचा पाठिंबा मिळाला तर रायगडमध्ये शिवसेनेला पुन्हा उभारी घेण्यास मदत होईल, असा अंदाज बांधला जात आहे. 

एकंदरीतच कोकणात बंडखोर आमदार जायचे ते गेले मात्र यासाठी शिवसेनेची पुन्हा पायाभरणी करावी लागणार असल्याचं दिसतंय. आणि यात तिथल्या मतदारांमध्ये बंडखोरांच्या जागी ‘पक्षनिष्ठ चेहऱ्यांची विश्वासार्हता निर्माण करणं’ हे एक शिवसेनेसमोर आव्हान ठरणार आहे.  

 हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.