“खान” त्रयीच्या किल्यात सर्वात प्रथम सुरंग लावला तो ह्रतिकने.

सलग काही सिनेमे फ्लॉप. मेंदूतल्या गाठीमुळे करावी लागणारी ब्रेन सर्जरी. बाहेर अभिनेत्रीसोबत संबंधाची प्रेक्षकांमध्ये अनेक दिवस चघळत असलेली चर्चा, त्याच दरम्यान गेल 14 वर्षे बॉलीवूड मध्ये एक आयडीयल कपल म्हणून मिरवण्यात आलेल्या नात्याचा शेवट अन पत्नीसोबत घटस्फोट.

परत एक सिनेमा फ्लॉप. अजून एका अभिनेत्रीने अक्षरशः चव्हाट्यावर आणलेले त्याच्यासोबतचे संबंध, काही गंभीर आरोप, आणि त्यातून बाहेर पडत नाही तोवर सगळ्यात महत्वाकांक्षी सिनेमे देखील फ्लॉप.

ह्या सुपरस्टारच्या पुढच्या महत्वाच्या सिनेमाची शूटिंग चालू असतानाच त्या दिग्दर्शकावर केलेले सेक्शुअल हॅरेसमेंट चे आरोप, त्या प्रॉडक्शन हाऊस चं विभक्त होऊन शेवटच्या मरणकळा बघणं, आणि ज्या रियल लाईफ हिरो ‘आनंद कुमार’ चा बायोपिक म्हणून सिनेमाची प्रसिद्धी चालू होती, त्या आनंद कुमार वर केले गेलेले अफरातफरीचे आरोप!!

हृतिक रोशन चं गेल्या काही वर्षातले चढउतार आणि अपयशाची शृंखला पाहिल्यावर असं वाटतं की हा माणूस अजूनही बॉलीवूड चं सुपरस्टार पद टिकवून आहे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

मावळत्या सूर्याकडे पाठ आणि उगवत्या सूर्याला नमस्कार ही मानसिकता असलेला बॉलीवूडचा प्रेक्षक अजूनही हृतिक कडे आशेने का बघतो याची कारणे शोधण्यासाठी थोडं मागे जावं लागेल.

साल 2000. जानेवारी. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सुपरस्टार अमीर खान चा बहुचर्चित ‘मेला’ प्रदर्शित झाला अन दणक्यात आपटला. अजून 2 आठवड्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा फायदा उचलण्यासाठी शाहरुख चा ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ गाजावाजा करत आला. शाहरुख खान ने दिलेल्या मोजक्या पण सगळ्यात मोठ्या फ्लॉप पैकी एक तो एक होता.

त्याच्या फक्त एक आठवडा आधी 14 जानेवारी ला हृतिक चा ‘कहो ना प्यार है’ प्रदर्शित झालेला.

हिंदी सिनेमा उद्योग हा स्टार यंत्रणेवर चालणारा आहे. मोठ्या स्टारचे सिनेमे सुपरहिट होतात आणि तो पैसा उद्योगात छोट्या सिनेमात झिरपत जातो. त्यामुळे स्टार सिस्टीम टिकून राहणे एका अर्थाने बॉलीवूडसाठी गरजेचे आहे. हृतिक ने बॉलीवूडमध्ये आगमन केले तेव्हा हे पद खानत्रयी, कुमार, देवगन, दत्त यांच्याकडे अबाधित होते. खानत्रयीच्या ह्या किल्ल्याला सर्वप्रथम सुरुंग लावला तो हृतिक रोशन ने.

हृतिक रोशनच्या अभूतपूर्व यशाने ‘हृतिक मेनिया’ (hritik mania) नावाची संज्ञा तेव्हा मीडिया आणि सर्वसामान्य प्रेक्षकात रूढ झाली. त्याने अनेकांना स्वतःच्या स्टारपदाबद्दल गंड दिलाय. सैफ अली खान एका मुलाखतीत असे म्हणलेला की,

‘मी टीव्ही कधीच पाहत नाही. कारण चुकून जर त्यात हृतिक रोशन दिसला तर त्याची शरीरयष्टी पाहून मला कॉम्प्लेक्स येतो अन दुसऱ्या दिवशी जिम जॉईन करावी लागेल.’

ज्यांच्याकडे पाहून खास काही रोल लिहिले जातात असे मोजके अभिनेते बॉलीवूड ला लाभले. हृतिक त्यापैकीच एक.

दुसऱ्या कलाकाराने नाकारलेले रोल स्वतःसाठी स्वीकारणे अनेकांना कमीपणाचे वाटते. हृतिक ने नाकारलेला स्वदेस चा रोल शाहरुख ने स्वीकारला हे विशेष. नव्या पिढीचा तरुण सुपरस्टार टायगर श्रॉफ म्हणतो की,

‘मी आयुष्यात असा एकही रोल स्वीकारणार नाही, जो दुसऱ्या कुणासाठी लिहिलाय आणि त्याने नाकारल्याने माझ्याकडे आलाय. फक्त हृतिक रोशन चा सोडून!’

हृतिक प्रस्थापितांना कायम सिनेमाच्या निमित्ताने टक्कर देत आलाय हे विशेष. त्याचा ‘क्रिश’ ज्या दिवशी रिलीज झाला त्याच दिवशी हॉलीवूडचा ‘सुपरमॅन रिटर्न’ भारतात प्रदर्शित झालेला. क्रिश ला अर्थातच बंपर ओपनिंग होती तर सुपरमॅन फ्लॉप. यशापयशाची पर्वा न करता त्याचं हे भिडत जाणं मला सगळ्यात जास्त आकर्षित करतं.

नव्या शतकात खान त्रयींनी पुन्हा आपलं बस्तान पक्कं केलं अन प्रत्येकाने आपल्या फिल्म रिलीजच्या तारखा पक्क्या करत गेले. ज्या दिवशी कुणीच फिल्म करण्याची हिम्मत करत नाही.

शाहरुख च्या रईस सोबत त्याने आपला ‘काबिल’ तर अक्षय कुमार च्या ‘रुस्तम’ सोबत त्याने ‘मोहेंजोदडो’ प्रदर्शित केला. त्याच्या ह्या दोन्ही फिल्म अपयशी होऊन सुद्धा पुढच्या कामाची लोकं अजूनही आतुरतेने वाट पाहतात यातच त्याच्या यशाची व्याप्ती समजून येते.

There is no failure in the life, there is just feedback and consequences.

हे तो सातत्य आणि कामातील मेहनतीने दाखवून देत आलाय.

हृतिक रोशन चं आयुष्य त्याच्याच एखाद्या व्यावसायिक सिनेमाहून फिल्मी आहे.

खरं सांगायचं तर त्याच्या वडिलांच्या ‘राकेश रोशन’ ने दिग्दर्शित केलेल्या फिल्म सारखं. ज्यात पूर्वार्धात हिरो ला अनेक वेळा हार पत्करावी लागते. पण जितका तो ह्या अपयशाच्या गर्तेत जातो, सिनेमाच्या उत्तरार्धात तितकाच जोरात वर उसळी मारून येतो.

भारतीय सिनेमातील पहिला सुपरहिरो म्हणून जी फिल्म सिरीज जनमानसात घर करून होती, त्या क्रिश सिरीजच्या पुढच्या भागाची तयारी चालू असतानाच अजून एक वाईट बातमी येऊन धडकली. राकेश रोशन ह्यांना गळ्याचा कॅन्सर असल्याचे निदान झाले!

मला स्वतःला हा हृतिक आणि राकेश रोशनच्या फिल्म चा इंटरवल वाटतोय.

अशा माणसाने पुन्हा घेतलेली झेप ही कमाल असते. सगळ्यांना बोटे तोंडात घालवायला लावणारी. वॉर सिनेमाच्या निमित्ताने त्याने दाखवून दिल की आपण संपलेलो नाहीय.

आता पिता पुत्रांनी ही उसळी पुन्हा घ्यावी हीच त्याच्या वाढदिवसाला सदिच्छा.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.