फक्त माला डी नाही, बायकांच्या कुटूंब नियोजनाचा इतिहास त्याहून मोठ्ठाय

रुप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना, भूल कोई हमसे ना हो जाये..

८० च्या जमान्यात हि जाहिरात दूरदर्शनवर सारखीच लावली जायची. आताच्या काका लोकांना आठवेल ही जाहिरात, खरं नव्या जनरेशनला याबद्दल काहीच माहिती नसणार. जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे आम्ही या गाण्याचा अर्थ तुम्हाला समजून सांगणार..

तर गोष्ट अशी होती की, जुन्या जमान्यात कपल्सकडून चूकभूल व्हायची आणि लोकसंख्येत एकाची भर पडायची. ही भर पडू नये म्हणून भारत सरकारनेच मनावर घेतलं. मोठ्या प्रमाणावर कुटुंबनियोजनाच्या जाहिराती करायला सुरुवात केली. प्रामुख्याने माला-डी सारख्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पील सारख्या जाहिरातींचं प्रमोशन केलं. थोडक्यात माला-डी ही एक गर्भनिरोधक गोळी आहे.

आज तुम्ही हीच चूक भूल होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारची साधन वापरता. जस की, कंडोम, कॉपर टी, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पील etc etc.. आणि यासाठी आजची जनरेशन डॉक्टरचा सल्ला घेतेच असं नाही कारण हे खूप कॉमन झालंय आज.

पण त्यावेळी भारत सरकारला सांगावं लागलं होत की,

डाक्टर की सलाह लिजिए, वह आपको माला डी की राय देंगे.. 

८० च्या दशकात जर हे वापरण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागत असेल तर फार पूर्वी म्हणजे बाबा आदमच्या काळात लोक काय करत असतील असा प्रश्न पडणं साहजिकच आहे.

तर फार पूर्वी, म्हणजेच इ.स.पूर्व काळात ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पीलचा संदर्भ मेसोपोटेमियन हस्तलिखितात सापडतो. नको असलेली प्रेग्नन्सी किंवा जन्म नियंत्रण करण्याची सर्वात प्राचीन पद्धती ख्रिस्तपूर्व १८५० मधली आहे. प्राचीन इजिप्शियन, ग्रीक आणि रोममध्ये जन्म नियंत्रणाचे विविध प्रकार होते.

जन्म नियंत्रणाच्या आणि गर्भपात करण्याच्या अप टू डेट नोंदी प्राचीन इजिप्तच्या इतिहासात सापडतात. जस की, इ.स.पू. १५५० मधील एबर्स पपायरस आणि इ.स.पू. १८५० मधील काहुन पपायरसच्या नोंदींमध्ये पुरुषांनी स्त्री योनीत सोडलेल्या वीर्याला अडथळा आणण्यासाठी योनीमध्ये ठेवली जाणारी मध आणि बाभळाची पाने आणि लिंट (एक प्रकारचा कापडाचा तुकडा) या पद्धतींचे कागदोपत्री वर्णन करण्यात आले आहे.

आणखी एक प्रारंभिक कागदपत्रात पेसरीजचा स्पष्टपणे उल्लेख आढळतो. पेसरीज हे एक प्रकारच गोलाकार साधन असत जे स्त्री योनीत बसवलं जात. काहून स्त्रीरोग तज्ञ हे पेसरीज बाभळीच्या चिकट डिंकापासून बनवत. अलीकडील संशोधनात अस दिसून आलय की या बाभळीच्या डिंकात  शुक्राणुनाशक गुण आहेत आणि अद्याप ही गर्भनिरोधाच्या जेलीमध्ये याचा वापर केला जातो.

पपायरस मध्ये नमूद केल्याप्रमाणे जन्म नियंत्रण पद्धतींमध्ये “गर्भाच्या तोंडावर” (म्हणजे गर्भाशयाला) झाकण्यासाठी चिकट पदार्थांचा वापर करणे, ज्यात मध आणि सोडियम कार्बोनेटचे मिश्रण योनीच्या आतील भागावर चिटकवणे आणि मगरीच्या विष्ठेपासून बनवलेल्या पेसरीज यांचा समावेश आहे.

प्राचीन इजिप्तमध्ये जन्म नियंत्रणाच्या उद्देशाने मुलांना तीन वर्षांपर्यंत स्तनपान केले जायचे. कारण प्रसुतिनंतर त्या महिलेला पुन्हा पाळी येण्यास काही महिने जावे लागतात. ज्या महिला आपल्या बाळाला पूर्णतः स्तनपान करवतात त्यांच्यामधे हा कालावधी वाढतो. या काळात, पुन्हा गर्भधारणा राहण्याची शक्यता कमी असते.

त्यातल्या त्यात जन्म नियंत्रणातील सर्वात प्रसिद्ध प्रकारांपैकी एक म्हणजे सिल्फियम वनस्पती. या वनस्पतीच मूळ आफ्रिकेत आहे. ही वनस्पती तोंडावाटे घेतले जाणारे गर्भनिरोधक म्हणून वापरली जात होती आणि प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये खूप लोकप्रिय होती. सध्याच्या लिबियाच्या क्षेत्रात याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जायची. जास्त प्रमाणात लागवड केल्याने त्याचे शेवटचे अस्तित्व नष्ट झाले असं म्हणतात.

प्राचीन ग्रीसमध्ये, सिल्फियमचा जवळचा भाऊ म्हणून हिंग यासारख्या अनेक वनस्पतींचा जन्म नियंत्रण म्हणून वापरला करण्यात येत असे. जंगली गाजर किंवा चटक चांदणी ही आणखी एक लोकप्रिय गर्भनिरोधक वनस्पती होती आणि भारतातील काही भागात आजही याचा वापर जन्म नियंत्रणासाठी केला जातो.

पुल आउटची आणखी एक पद्धत पुरातन लोक गर्भधारणा रोखण्यासाठी वापरत असत. या पध्दतीत वीर्य योनीत सोडलं जाण्यापूर्वीच शिश्न योनीतून बाहेर काढलं जातं. ही काही प्रभावी पध्दत नाही कारण ती नेमकी वेळ चुकू शकते आणि योनी तसंच योनीमुखाशी संपर्क टाळणं अवघड असतं. त्यातच शिश्न ताठ होताच थोड्या प्रमाणात शुक्राणू सोडले जातात, गर्भधारणा होण्यास ते पुरेसे असतात.

गर्भधारणा रोखण्यासाठी प्राचीन ग्रीसमध्ये स्त्रियांना कॉपर सॉल्ट पाण्यात टाकून पिण्याचा सल्ला देण्यात येई. कॉपर सॉल्ट विषारी असत.

असे बरेच प्राचीन प्रकार कुचकामी होते. जन्म नियंत्रणाचे हे असले प्रकार खूप धोकादायक होते. वैद्यकीय हस्तक्षेप न करता केवळ गर्भधारणा होऊ नये म्हणून सेक्स दरम्यान आणि बाळंतपणात लाखो महिला जीवानिशी गेल्या.

गोळ्यांचा शोध असा लागला..

१८०० च्या सुरूवातीला, अमेरिकेचा जन्मदर सातत्याने वाढत होता. अमेरिकेत जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या होती असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. त्या काळात अमेरिकेतील एका महिलेने सरासरी ८ मुलांना जन्म दिला असेल. आणि हेच प्रमाण घटत घटत १८०० च्या अखेरीस, सरासरी ३ मुलांच्या जन्मावर थांबलं. यावेळी, अनेक धार्मिक आणि राजकीय संघटनांनी कुटुंब नियोजनाच्या साधनांविरुद्ध बरेच इशारे दिले. परंतु हे इशारे न जुमानता अमेरिकन महिलांनी कौटुंबिक नियोजनाचा आधार घेतला.

१९५० च्या दशकात, पॅरेंटहुड फेडरेशन ऑफ अमेरिका आणि ग्रेगरी पिनकस आणि जॉन रॉक यांनी प्रथम जन्म नियंत्रणच्या गोळ्या तयार केल्या. गोळ्या तयार होऊन ही या गोळ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या नाहीत. १९६० च्या दशकाच्या मध्यावर, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने  ग्रिसवॉल्ड विरुद्ध कनेक्टिकट प्रकरणात विवाहित जोडप्यांसाठी गर्भनिरोधकांवरील बंदी रद्द केली. १९७२ मध्ये, या गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा अधिकार अविवाहित जोडप्यांसुद्धा मिळाला.

पण भारतात मात्र ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पील येण्यासाठी भारतीय सरकारच प्रयत्नशील राहिले.

भारताची पहिली जनगणना १८७१ मध्ये झाली, तेव्हा भारताची लोकसंख्या जवळजवळ २५.४ कोटी होती. १९७१ च्या जनगणनेप्रमाणे ती ५४.७ कोटींपर्यंत वाढली. सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येवर उच्चभ्रू आणि सुशिक्षित पुरुषांनी आपली लेखणी चालवली. त्यांच्यापैकी बर्‍याच जणांनी, भारताच्या प्रगतीतील सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणून अतिरिक्त लोकसंख्येला दूषणे दिली. साहजिकच त्याचा दोष कामगार वर्ग, गरीब भारतीयांवर लावला गेला.

१९२७ च्या “भारतातील सेक्स प्रॉब्लम” या मोनोग्राफ मध्ये ना. सी. फडके म्हटले आहे,

“जेव्हा आमचे डोळे गटारातल्या लोफर्सवर पडतात तेव्हा आम्ही गटारातल्या किड्यांपेक्षा जास्त मुले असलेली पाहतो. आणि त्या कुत्रीची आठवण येते जी वर्षातून चार वेळा पिल्लांना देते.

भारतीय जनतेलाही उत्स्फूर्तपणे कुटुंबनियोजनाचे महत्त्व पटून त्याचा सार्वत्रिक स्वीकार होण्यास बराच दीर्घ कालावधी लागला. त्यामुळे सरकारी धोरण म्हणून कुटुंबनियोजनाचा पुरस्कार करून ते जनतेने कार्यान्वित करण्याचा मार्ग भारताला स्वीकारावा लागला.

कुटुंबनियोजनाचा सरकारी पातळीवरून पुरस्कार करून ते कार्यान्वित करण्याचे आस्थेवाईक प्रयत्न करणारे भारत हे जगातील पहिले मोठे राष्ट्र आहे.

चौथ्या पंचवार्षिक योजनेत कुटुंबनियोजन-कार्यक्रमाला अग्रक्रम देण्यात आला. ग्रामीण आणि शहरी भागांत कुटुंबनियोजन-केंद्रे उघडली गेली. मोठ्या प्रमाणावर कुटुंबनियोजनाची साधनं भारतात तयार होऊ लागली. ही साधन तयार करण्यात कारखाने धडधडू लागले. यात माला-डी ही गोळी मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागली.

काय आहे माला-डी

असुरक्षित सेक्सनंतर, एखाद्या महिलेला तिच्या इच्छेविना सेक्स करण्यास भाग पाडले असेल (बलात्कार), कंडोम फाटला असेल किंवा अचानक सेक्स झाला असेल तेव्हा आपात्कालीन गर्भनिरोधक गोळीने गर्भधारणा टाळता यावी यासाठी तोंडावाटे घ्यायची गर्भनिरोधक गोळी म्हणजे  माला-डी किंवा माला-एन.

जेव्हा कुटुंबनियोजन हिटलिस्टवर होते तेव्हा भारतात साक्षरतेच प्रमाण कमी होत. त्यामुळं  प्रचारतंत्रांमध्ये रेडिओ, चित्रपट, प्रदर्शने, गाणी, लोकनाट्य इत्यादींचा उपयोग होऊ लागला. आणि टीव्हीवर ८० च्या दशकात गाणं वाजू लागलं.

भूल कोई हमसे ना हो जाए…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.