UPSC पास होवून IAS होण्याची शक्यता 0.00018 असते…!!!

पप्पा पुढच्यावेळीला नक्की, ह्यावेळी अगदी जवळ होतो.

अवघ्या २-३ मार्कांसाठी हुकलं.

युपीएससीच्या पूर्वपरीक्षेतच पुन्हा एकदा अपयश आल्यानंतर राम्यानं वडलांना फोन लावला होता. राम्या हुंदके देतंच सगळं सांगत होता. बरोबरीला आलेल्या पोराचं असं रडणं बापाला पण सहन होत नव्हतं. तसं घरच्याना पण कळत होतं कि पोरगं जीवाचं रान करून अभ्यास करतंय पण चार वर्षांनंतर पण राम्याकडून कुठलाच रिझल्ट आला नव्हता त्यामुळे घरच्यांचे पण पेशन्स संपले होते. शेवटीं मग बापाने

 ” तुमचं तुम्हालाच कळू द्या, आता बारकं नाही राहिला तुम्ही”

असं म्हणत फोन ठेवला.

मागच्या प्रत्येक परीक्षेच्या निकालानंतर वडिलांनी राम्याला धीर दिला होता, मात्र यावेळी वडलांच्या बोलण्यातली नाराजी राम्यापासून लपून राहिली नव्हती. गावातलं सगळ्यात हुशार पोरगं म्हणून घरच्यांनी त्याला पुण्याला पाठवला होतं. मात्र त्यांचाही विश्वास आता कमी होत चालला होता. फोन ठेवल्यापासून त्याचं डोकं सुन्न झालं होतं. आता आपलं पुढं काय होणार हा एकंच प्रश्न त्याला सतावत होता.

रूम-लायब्ररी-मेस या सायकलमध्ये चार-पाच वर्षे कशी गेली हे राम्याला कळलंच नाही. खिडीकीतनं एक टक बाहेर बघत राम्या विचार करत होता. तेवढ्यात त्याची नजर भिंतीवर लिहलेल्या  एका वाक्याकडे त्याची नजर गेली. 

शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही

झालं राम्या पुन्हा पेटला आणि बाजूला पढलेलं दफ्तर उचललं आणि पुन्हा लायब्ररीची वाट धरली. मात्र  शांततेच्या काळात घाम गाळून देखील यश का हाती लागत नाहीये याचा विचार नं करताच पोरगं.. 

अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहायचाय, ज्या शत्रूचा कुणी पराभव कुणी करु शकत नाही अशा शत्रूला मला हरवायचाय.

असं स्वतःशीच बडबडत पुन्हा तयारीला लागलं  होतं.

पण राम्या जे IAS होण्याचं स्वप्न पाहता होता त्याची प्रोबॅबेलिटी आहे फक्त आणि फक्त 0.00018.

जरवर्षी यूपीएससीची जी जाहिरात काढते त्यात फक्त १८० च जागा IAS च्या असतात. आणि २०२१ मध्ये राम्यासारखंच IAS होऊन कलेक्टर होण्यासाठी यूपीएससीचे फॉर्म भरले होते ९,७०,००० पोरापोरींनी. अभ्यास करून देखील लॉटरी लागल्यासारखीच ही सिस्टिम आहे.

त्यातही यूपीएससी देणाऱ्या पोरांचा आकडा दिवसेंदिवस काय कमी होत नाहीये. २०१४ पासून हा यूपीएससी अस्पिरंटसचा आकडा हा नेहमी ९ लाखांच्याच आसपास राहिला आहे . मात्र त्याचवेळी यूपीएससी जागा कमीच करत चालली आहे. 

द प्रिंटच्या एका वृत्तानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) निवडलेल्या  उमेदवारांच्या संख्येत २०१४ पासून जवळपास ४० टक्क्यांनी घट झाली आहे. 

UPSC ने २०१४ मध्ये १२३६ उमेदवार निवडले होते, तर २०१८ मध्ये ही संख्या फक्त ७५९ वर आली. त्यानंतर २०१९ ते २०२१ मध्ये हा आकडा ७०० ते ८०० च्या घरातच राहिला आहे. ह्यातपण  IASच्या  नेहमी १८० आणि IPS च्या १५० च जागा जरवर्षी सरकार भरतं.

सरकारकडे IAS ऑफिसर्सची कमतरता असूनही एवढ्या कमी जागा भरल्या जात आहेत. 

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की १ जानेवारी २०२१ पर्यंत देशात ५२३१ IAS अधिकारी होते. ६७४६ च्या मंजूर संख्यापेक्षा १५१५ ने हो संख्या कमी आहे .

म्हणजे देशात १५१५ IAS अधिकाऱ्यांचा तुटवडा आहे.

गुरुवारी, सुशील कुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय विभाग-संबंधित संसदीय स्थायी समितीने संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडलेल्या ११२ व्या अहवालात म्हटले आहे:

 “आयएएस अधिकार्‍यांची मंजूर संख्या आणि पदावरील संख्या यांच्या मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. आयएएस अधिकार्‍यांची मंजूर संख्या आणि पदावरील संख्या यांच्यातील अंतर यूपी कॅडरमध्ये १०४ बिहार कॅडरमध्ये ९४ आणि AGMUT कॅडरमध्ये ८७ इतके जास्त आहे.

पण हा तुटवडा आत्ताचाच आहे असा पण नाहीये.

१९५१ मध्ये सुद्धा, १२३२ च्या मंजूर संख्या असतानादेखील भारतीय नागरी सेवा (ICS) मधील ३३६ सह ९५७च अधिकारी  होते. म्हणजे २७५ म्हणजेच २२.३२ टक्के जागा रिक्त होत्या. तेव्हापासून ही कमतरता कायम राहिली आहे. यूपीए सरकारच्या १०वर्षांमध्ये सरासरी १९टक्के जागा रिक्त होत्य. तर एनडीए सरकारच्या गेल्या सात वर्षांच्या काळात हा आकडा २२.५८ टक्क्यांवर गेला आहे.

मग एवढा तुटवडा आहे, तो ही इतक्या दिवसांपासून आहे तरी सरकार IASची  १८० पेक्षा जास्त जागा भरण्याची जाहिरात का काढता नाही.

तर याचं उत्तर मिळतं केंद्र सरकारने स्थापना केलेल्या बीएस बसवान समितीच्या रिपोर्टमध्ये.

या समितीची स्थापना “आयएएस अधिकार्‍यांच्या आवश्यकतेचा दीर्घ कालावधीसाठी सर्वंकष विचार करण्यासाठी” करण्यात आली होती.  २०१६ मध्ये सादर केलेल्या अहवालात या कमिटीने म्हटले आहे की

  1. १८०च्या वर आकडा नेला तर आयएएस कॅडरच्या  गुणवत्तेशी तडजोड करेल.
  2. LBNSAA  (लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन)  जिथं IAS साठी निवडलेल्या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग होतं तिथं क्षमतेपेक्षा जास्त  ट्रेनी होतील.
  3. आयएएस अधिकार्‍यांच्या करिअर पिरॅमिडमध्येही जास्तीचे उमदेवार बसवता येणार नाहीत. कारण १८० पेक्षा जास्त IAS घेतलॆ तर त्यांना पुढे प्रोमोशन देऊन भारत सरकारमधील वरिष्ठ पदांवर घेणं अवघड जाईल.

मात्र याचवेळी सुशील मोदी यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने असे नमूद केले आहे:

 “नोकरशाहीतील तूट,  कॅडर पदांवर नॉन-केडर अधिकार्‍यांची नियुक्ती करणे आणि नोकरीचा कालावधी संपला असतानाही अधिकार्यांना पदांवर चालू ठेवणे, एकाच अधिकार्‍यांना अनेक प्रभार देणे. …अशा उपायांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर तडजोड होते. त्यामुळे समितीने भारतीय प्रशासनाच्या  गरजा लक्षात घेऊन आयएएस अधिकाऱ्यांची वार्षिक संख्या लक्षणीयरीत्या वाढवण्याची शिफारस डीओपीटीला केली आहे.”

केंद्रसरकार जागा वाढवून राम्यासारख्या पोरांना संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. मात्र सध्यातरी केंद्र सरकार लॅटरल एंट्रीच्या डायरेक्ट खाजगी क्षेत्रातून माणसं घेत आहे. त्यामुळे राम्याला तरी अजून या सगळ्याचा विचार नं करता अभ्यास करण्याशिवाय गत्यंतर नाही एवढं नक्की आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.