ते मेक्सिकोला गेले अन् येताना “हम लोग” नावाची मालिका घेऊन आले..

साल होत १९८२. भारतात चालू होणारे एशियन गेम्स लोकांनी रंगीत टिव्हीवर बघावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु झाले. त्याच दरम्यान भारताचे तत्कालीन माहिती आणि प्रसारणमंत्री वसंत साठे हे मेक्सिकोच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा तिथे ‘वेन कोनमिगो’ नावाची एक मालिका पाहिली.

ही नेहमी प्रसारित होणाऱ्या मालिकांपेक्षा कौटुंबिक आशय असलेली थोडीशी वेगळी मालिका होती.

आपल्याकडेही अशाच प्रकारची एक मालिका दूरदर्शनवरून प्रसारित व्हावी,

अशी इच्छा मंत्री साठेंनी व्यक्त केली. पुढे १९८३ मध्ये सुचना आणि प्रसारण खात्याचे सचिव एस. एस. गील यांच्या नेतृत्वात ‘वेन कोनमिगो’ मालिकेचा अभ्यास करण्यासाठी एक टिम मॅक्सिकोला गेली.

ही मालिका तिथे जवळपास १९७५ सालापासून प्रसारित होत होती.

पुढे मे १९८३ मध्ये मॅक्सिकन दिग्दर्शक मिग्युएल सॅबिडो भारतामध्ये आले. यावेळी त्यांनी नवी दिल्लीतील आकाशवाणी भवन येथे ‘हम लोग’च्या टिमसाठी पाच दिवसीय प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबीर घेतले. तसेच मालिकेचा अपेक्षित प्रभाव जाणवण्यासाठी आठवड्यातुन कमीत कमी पाच दिवस तरी प्रसारण करावे असा सल्ला दिला.

पण भारतात अशा प्रकारची मालिका सलग प्रसारित करण्यासाठी मर्यादा होत्या आणि सोबतच उपलब्ध साधनेही कमी असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यामुळे आठवड्यातुन एकदाच प्रसारण करण्याचे ठरले.

अखेरीस ७ जुलै १९८४ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला.

मनोहर शाम जोशी यांनी ही लिहीलेली ही मालिका अल्पावधीतच लोकांना आपलीशी वाटू लागली. जोशींनी आपल्या लिखणातुन या मालिकेला शब्दशः चार चाँद लावले होते. आजच्या जमान्यात मालिका कोण लिहीत आहे, चित्रपट कोण लिहीत आहे या गोष्टीकडे काहीसा कानाडोळा केला जातो.

पण ‘हमलोग’ साठी जोशी यांचे नाव दिग्दर्शकांच्याही आधी पडद्यावर दिसायचे.

कथा ही अगदी साधी. दिल्लीतल्या एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती. दारुड्या वडिलांमुळे कुटुंबीयांना कसा त्रास सहन करावा लागतो, त्यांचे भावविश्व कसे असते, त्यांना कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो हे अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्यात आले होते.

मालिकेत बऱ्यापैकी कलाकार नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिकून बाहेर आलेले होते. त्यामुळे साहजिकच मालिकेतील अभिनयाचा दर्जा हा बराच वरचा होता.

विनोद नागपाल, जयश्री अरोरा, राजेश पुरी, अभिनव चतुर्वेदी, सीमा भार्गव अशा एकाहून एक सरस कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका सजली होती. त्यातही विजयेंद्र घाटगे व किरण जुनेजा यांच्या पात्रांचीही जोड या मालिकेच्या कथानकाला होती.

शूटिंगसंबंधीत एक खास गोष्ट म्हणजे हे सर्व कलाकार थेट शूटला न जाता त्याऐवजी दिल्ली मंडी हाऊसमध्ये हिमाचल भवनाजवळ भेटायचे. तिथे रंगीत तालीम करुन मगच गुडगावला ज्या ठिकाणी शूट सुरु आहे तिथे जायचे.

मालिकेचे दिग्दर्शन पी. कुमार वासुदेव यांनी केले होते.

मालिका केवळ १७ महिने चालली. यात अर्ध्या तासाचा एक भाग असे एकुण जवळपास १५४ भाग प्रसारित झाले. प्रत्येक भागाच्या शेवटी जेष्ठ अभिनेते अशोक कुमार त्या भागाचे विश्लेषण आणि पुढच्या भागात काय होणार याची तोंड ओळख द्यायचे. हे निवेदनही त्या काळात प्रचंड गाजले होते.

मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला तो १७ डिसेंबर १९८५ या रोजी.

शेवटचा भाग हा खास एक तासाचा होता. त्या भागात काही कलाकारांना आपल्या खऱ्या रूपात पाहता आले. दारुड्या व काहीशा दुराग्रही वडिलांची भूमिका करणारे विनोद नागपाल या भूमिकेमुळे लोकांच्या तिरस्काराचा विषय झाले होते. त्यांना खऱ्या आणि सभ्य रूपात पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते

‘हमलोग’ला संपूर्ण देशभरात विलक्षण प्रतिसाद मिळाला.

इतका की त्या काळात लोक आपापले काम सोडून टिव्हीसमोर बसत असत. कथानकात आणखी वाढ करणे सहज शक्य असतानाही ही मालिका पुढे वाढवण्यात आली नाही.

त्यामुळे मालिका बंद झाल्याची त्या वेळची चुटपुट खरोखरच मनापासून होती.

पुढे अनेक वर्षानी ‘सोनी टीव्ही’ या खासगी वाहिनीने या मालिकेचे भाग विकत घेऊन ते प्रसारित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. आज मालिकांच्या भाऊगर्दीत किती मालिका येतात व जातात त्यातही ‘हमलोग’सारख्या मालिका मात्र लोकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत.

दुरदर्शनवरती पुढे आलेल्या बुनियाद, नुक्कड, यह जो जिंदगी, वागले की दुनिया, तमस, फिर वही तलाश, गुल गुलशन गुलफाम, लोहित किनारे, रामायण, महाभारत यांसारख्या मालिकांवर प्रेक्षकांनी अफाट प्रेम केले.

टिआरपीची गिणतीच नव्हती. कोणतीही मालिका काही अपवाद सोडल्यास अगदी मर्यादित भागांची असायची. त्यामुळे मालिका संपल्यावर प्रचंड हुरहूर जाणवायची.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.