पुण्यातल्या या ७ ठिकाणी भूतं आहेत असं गुगल सांगत, खरं काय ते आम्हाला जोशीकाकांनी सांगितलं.  

हंटेटं पेल्सेस इन पुणे. टॉप टेन हंटेट प्लेसस इन पुणे. रिकाम्या वेळेत सर्च मारलं की पुण्यातल्या दहा ठिकाणची यादी येते. काय तर म्हणे या दहा ठिकाणी भूतं आहेत. बऱ्यापैकी या गोष्टी इंग्लिश आणि हिंदी भाषेत आहेत. साहजिक असल्या गोष्टी महाराष्ट्राच्या बाहेरची लोकं जास्त वाचत असणार.

आम्ही पण सर्च मारल्यानंतर भूताटकी असणाऱ्या सात ठिकाणची यादी समोर आली. 

आत्ता काय करायचं. मग आमच्या वरच्या मजल्यावर जोशी काका राहतात. ऑफिसच्या बाहेर काढलेली चप्पल सरळ रेषेत नसली तरी ते आमचा मनापासून अपमान करतात. आम्ही कशाप्रकारे लज्जीत होवू याचा ते हरप्रकारे प्रयत्न करत असतात.

मग म्हणलं ही यादी घ्यावी आणि जोशी काकांना दाखवावी. त्यांच बहुमूल्य मत या यादीसोबत आहे अस मांडाव. काका आमच्या विश्वासाला जागले. काकांनी टाळ्या घावू वाक्य सांगितली. ती यादी आणि काकांची लाईव्ह कॉमेंट्री दोन्ही गोष्टी खाली मांडत आहोत. 

सरळ रेषेत या आणि आनंद घ्या. 

१) शनिवार वाडा : 

इंटरनेट : इंटरनेटच्या मते शनिवार वाड्यामध्ये नारायण पेशव्यांचा आत्मा असून रात्रीच्या वेळी इथून काका मला वाचवा असा आवाज येतो. या ठिकाणी साडेसहा नंतर प्रवेश मिळत नसून आजूबाजूच्या लोकांनी देखील नारायणरावांचा आवाज पोर्णिमेला एेकला असल्याचं सांगितलं आहे. 

जोशी काका : पुर्वींच पु“णे” राहिलं नाही आता. हल्ली गाड्यांच्या हॉर्नमध्ये आवाज तरी येईल का? तो नारायण चांगला माणूस होता. राजकारणाने हाकनाक बळी गेला पोराला. चूक झाली. कसा मुक्त होईल. पिंडाला कावळा शिवला नाही म्हणे त्याचा. वाईट झालं. पण आवाज येण शक्य नाही. पुर्वी यायचा पण पुर्वीच्या पुण्याप्रमाणे आवाज देखील नष्ट झाला. आत्ता काही नसतं तिथे तस. 

२) होळकर ब्रीज खडकी. 

इंटरनेट : होळकर ब्रीज या पुलावर अनेकदा गुढ अपघात झाले आहेत. रात्री अपरात्री प्रवास करत असताना इथे चित्रविचित्र आकृत्या दिसतात. वारंवार अपघात झाल्याचा अनुभव नागरिकांना आहे. 

जोशी काका : कोण म्हणलं तुम्हाला खडकी पुण्यात येतं. खडकी वेगळं पुणे वेगळं. खडकी पुण्यात येत नाही. लकडी पुलाबद्दल विचारा. काय तो पुल. पूरात वाहून गेला होता वो. पुलावर उभा राहिला असता नं तर समजलं असतं. तुमच्या सांगली कोल्हापूरचा पूर काहीच नाही त्या पूरासमोर. वाईट झालं पानशेत फुटलं. 

३) व्हिक्टरी थिएटर कॅम्प. 

इंटरनेट : व्हिक्टरी थेएटर कॅम्पमध्ये असून मोकळ्या वेळी, रात्रीच्या वेळी माणसांच्या बोलण्याचा हसण्याचा आवाज येत असतो. अनेक कर्मचारी ही जागा शापीत असल्याचं सांगतात. रात्री अपरात्री इथे माणसांच्या आकृत्या दिसतात. 

जोशीकाका : हे सगळे इंग्रजांचे चाळे. पुर्वीपासून तिथे भूत असल्याचं सांगतात. कोण जात इतक्या लांब. प्रभात किती सुंदर आहे. शिवाय इतिहास आहे त्या सिनेमागृहाला. असेल खरं इंग्रजी नाव असलं की भूत येणारच. किंवा एखादा इंग्रज राहिला असेल भारत सोडून जायचा. लपून बसला असेल आत. आणि हे सांगत असतील बारामतीकर भूत आहे म्हणून. सगळ्या खेळ्या असतात तुम्हाला सांगतो. 

४) सिंहगड 

इंटरनेट : काही वर्षांपुर्वी या घाटात बसचा अपघात झाला. लहान मुले दगावली. रात्रीच्या वेळी अनेकांना इथे लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज येतो. 

जोशीकाका : कळतय का काय बोलताय. अहो तरुण असताना आम्ही सायकल वरुन भेळ घेवून सिंहगडला जायचो. मस्तपैकी खडकवासलाच्या इथे भेळ खायची आणि पार पुढे गडावर थेट. हल्लीच्या पिढीला चालवत नाही. 

काका भूत आहे का नाही तेव्हडं सांगा. 

भूत का. असेल बाबा. पण ती हल्लीची भूतं असतील. आमच्या काळात तरी नव्हती. पुर्वीचा सिंहगड राहिला नाही आत्ता. 

५) चॉईस होस्टेल कर्वे रोड. 

इंटरनेट : कर्वे रोडवरील प्रसिद्ध अशा चॉईस बॉईज् होस्टेलमध्ये भूत असल्याच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. याठिकाणच्या कॉरिडॉरमध्ये अनेकदा एका मुलीचा रडण्याचा आवाज येतो. 

जोशी काका : मुलांच्या हॉस्टेलमधून मुलींच्या रडण्याचा आवाज येणार नाही तर काय वाघसिंहाचा येईल का?  हाहाहा गंमत केली वो थोडी. पुर्वी डेक्कनहून कर्वे नगरला जाण्यासाठी घोडागाडी असायची. तुम्हाला हा मधला भाग दिसतो ना. तिथे काहीच नव्हतं पुर्वी. सुंदर बंगले झाले कोथरूडमध्ये. पण लोक जायला घाबरायची पुर्वी. स्मशानाच्या जागेवर बंगले उभा केले. पण होस्टेलचं तुमचं तुम्ही बघा. शक्यता तशी कमीच वाटते. 

६) सिम्बॉयसिस रोड विमाननगर.

इंटरनेट : CCD पासून सिम्बॉयसिस कॅम्पसकडे जाणाऱ्या रोडवर रात्री अपरात्री भूत दिसल्याची गोष्टी कॉलेजची मुलं सांगतात. रात्रीच्या वेळी जात असताना अनेकदा मोकळ्या ठिकाणी पाहून कुत्री भूंकत असतात. अनेकदा मध्येच पुर्ण अंधारी येवून अपघात होतात. 

जोशी काका : ते पुणे नव्हे. पुण्याचा बाहेरचा भाग झाला तो. अशा गोष्टी बाहेरचे लोक रचतात आणि पुण्याला बदनाम करतात. पुर्वीचं पुणे म्हणजे फर्ग्युसन आणि सर परशुराम कॉलेज. बस्स. शिक्षणाच बाजारीकरण झालं. यामध्ये अनेक बाहेरचे तरुण आले. त्यांनी मग अफवा पसरवल्या आणि तुमच्यासारख्या अर्धवट पत्रकारांनी त्या छापल्या. 

७) तळजाई टेकडीवरील भूत बंगला. 

इंटरनेट : तळजाई टेकडीवरील या बंगल्यात भूत असल्याचं सांगण्यात येत. अनेकजणांनी या बंगल्यात रात्री राहण्याचा प्रयत्न केला आहे पण कोणीच यशस्वी झालं नाही. लोक अंधार पडल्या पडल्या जवळच्या मैदानातून घरी परततात. 

जोशी काका : असू शकेल. त्या भागात नक्कीच असू शकतं काहीना काही. देवीच मंदीर आहे. पण इकडे पर्वतीवर जायचं ना. तिकडे काय काम आहे. शातंपणे दर्शन घ्यायचं आणि यायचं. पण आमच्या जेष्ठ नागरिकांच्या गटात चर्चा झाली होती एकदा. असू शकेल. भूतांच काही सांगता येत नाही. ते कुठही असू शकतात. 

प्रश्न : काका तुम्हाला भूतांवर विश्वास आहे का ? 

उत्तर : हे काय माझ्या समोर बसलं आहे हाहाहाहा… 

काकूंचा आवाज येताच काका निघून गेले. काकांचा दिवस चांगला गेला. आमचाही गेला. नंतर लक्षात आलं काकू तर मागच्याच वर्षी देवाघरी गेल्या. ऑफीस बंद करुन आम्ही लवकर पळतोय. तुम्ही तुमचं बघा.

दम असला तर हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.