हैद्राबादेत ४ वर्षांच्या लेकराचा मृत्यू झाला तो कुत्र्यांचा हल्ला कसा आणि का झाला?

आरेच्या जंगलात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू किंवा चंद्रपुरात वाघाने एका व्यक्तीवर हल्ला केला अश्या बातम्या वाचनात आल्या तर, त्यात काही वावगं वाटत नाही. कारण हे प्राणी मुळातच हिंस्त्र असतात. पण या सगळ्यांपेक्षा वेगळी आणि विश्वास बसायला कठीण अशी एक बातमी आली,
‘कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या बालकाचा मृत्यू.’

ही बातमी बघून क्षणभर विश्वास बसला नाही. कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू? म्हणजे आपण इन्स्टाग्रामवर लहान बाळांसोबत खेळताना ज्या प्राण्याचे व्हिडीओ बघतो, ज्या प्राण्यासोबतचे फोटो आपण सोशल मीडियावर पोस्ट करतो आणि ज्या प्राण्याला आपण सगळ्यात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखतो त्या प्राण्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झालाय? असे बरेच प्रश्न या बातमीमुळं मनात आले.

हा प्रकार नेमका कसा घडला ते बघुया…

साधारण ४ वर्षांपुर्वी गंगाधर हा हैद्राबादमध्ये आपल्या बायकोसह राहायला आला. इथे आल्यावर काहीतरी काम करायचं म्हणून काम शोधायला सुरूवात केली. त्याला अंबेरपेट भागातल्या कार सर्व्हिस सेंटरमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली.

१९ फेब्रुवारी म्हणजे रविवारी गंगाधर त्याच्या ४ वर्षीय मुलाला प्रदीपला घेऊन नोकरीच्या ठिकाणी गेला होता. तिथे पोहोचल्यावर प्रदीपला त्याच्या वॉचमन केबिन मध्ये थांबवून गंगाधर काहीतरी कामासाठी बाहेर निघून गेला. त्यानंतर लहान प्रदीप हा काही वेळ केबिनमध्ये थांबला आणि त्यानंतर तो बाहेर निघाला.

फिरत फिरत तो पार्किंग एरियामध्ये आला. इथं जे काही झालं ते सगळं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालंय.

ते सीसीटीव्ही फूटेज सध्या व्हायरल होतंय. या व्हिडीओमध्ये ४ वर्षांचा चिमूरडा चालत येताना दिसतोय. तो चालत येत असताना त्याच्या पाठून ३ कुत्रे धावत आले. दोन कुत्रे त्याच्या मागच्या बाजुलाच थांबले… समोर आलेल्या एका कुत्र्याला बघुन घाबरलेलं लेकरू कुत्र्यांच्या शेजारून आपला मार्ग वेगळा करून पळायला लागलं आणि त्याच्या पाठी उभ्या असलेल्या दोनपैकी एका कुत्र्यानं धावत येऊन त्याला पाठच्या बाजुनं डोक्यानं धक्का दिला. ४ वर्षांचा चिमुरडा जमिनीवर पडला. तो खाली पडल्यावर त्याच्यावर या तीनपैकी दोन कुत्र्यांनी हल्ला चढवला त्याला चावायला सुरूवात केली. यातून पण त्या कुत्र्यांना बाजुला सारत प्रदीप पुन्हा उलट्या दिशेनं पळायचा प्रयत्न करत होता. पण परत पुन्हा एकदा त्या तीनपैकी एका कुत्र्यानं पाठून जाऊन प्रदीपच्या कपड्याला धरून मागे खेचत त्याला पुन्हा जमिनीवर पाडलं. आता मात्र या तिन्ही कुत्र्यांनी प्रदीपवर हल्ला चढवला. एका कुत्र्यानं आपल्या जबड्यात प्रदीपचं डोकं धरलं, दुसऱ्यानं हात तर तिसऱ्यानं पाय धरला. हे तिघंही तीन दिशांना या प्रदीपला खेचत होते. त्यानंतर प्रदीपला खेचत काही अंतरापर्यंत घेऊन गेले. दरम्यान, हे सगळं सुरू असताना तिथे आणकी तीन लहान कुत्रेही आले. ही कुत्र्यांची पिल्लं होती. या पिल्लांनी आल्यावर प्रदीपच्या शरीराचा चावा घ्यायला सुरूवात केल्याचं या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसतंय.

या हल्ल्यात प्रदीपचा मृत्यू झाला.

पण मग प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे कुत्र्यासारखा प्राणी माणसावर किंवा माणसाच्या बाळावर हल्ला कसा करू शकतो आणि तोही थेट जीव जाण्याइतका घातक हल्ला?

या बद्दल काहींचं असं म्हणणं आहे की, ४ वर्षीय प्रदीपच्या हातात काहीतरी खाण्याची वस्तू होती. ती खाण्याची वस्तू मिळावी म्हणून या मोकाट कुत्र्यांनी प्रदीपवर हल्ला केला असावा. पण व्हिडीओमध्ये प्रदीपच्या हातात काही असल्याचं दिसत नाहीये.

याबद्दल तज्ज्ञ मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार,

“कुत्रे हे मुळातच हिंस्त्र प्राणी असतात.  आपल्या सहवासात राहून ते शिस्त शिकतात आणि आपल्या लळ्याने ते प्रेमळ बनतात. रस्त्यावरच्या कुत्र्यांना कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग नसतं की शिस्त नसते. शिवाय त्यांना वेळेवर खायलाही मिळत नाही. त्यामुळे माणसाचं बाळ हे त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय नसून त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पिल्लांसाठी फक्त आणि फक्त अन्न असतं.”

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.